
श्रीराम कारखान्याच्या खाजगीकरणाला विरोध; सहकारी तत्त्वावर चालवण्यासाठी आम्ही सहकार्याला तयार – रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण | प्रतिनिध. श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे खाजगीकरण होऊ नये आणि कारखाना सहकारी तत्त्वावरच चालवला जावा, अशी ठाम भूमिका मांडत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विद्यमान व्यवस्थापनावर जोरदार टीका केली. कारखान्याच्या भवितव्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, विश्वासराव भोसले, नरसिंह निकम, तुकाराम शिंदे, माणिकराव सोनवलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
नाईक निंबाळकर म्हणाले की, श्रीराम कारखाना खासगी तत्त्वावर चालविण्यास देऊ नये, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. कारखान्याच्या गळीत हंगामावर कोणत्याही प्रकारचा स्थगिती आदेश नसल्याने विद्यमान व्यवस्थापनाने तो स्वतः चालवून दाखवावा किंवा राज्यातील एखाद्या सहकारी कारखान्याच्या सहकार्याने चालवावा. कारखान्याचे सहकारपण टिकवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कोणत्याही स्तरावर चर्चेस तयार आहोत.
कारखाना विक्रीसाठी छुपे प्रयत्न सुरू असल्याची शंका व्यक्त करत त्यांनी सांगितले की, भागीदारी कराराला अनेक सभासदांचा विरोध होता. प्रशासकांनी कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्याऐवजी तो सतत भाडेतत्त्वावर चालविला. आता पडद्यामागून हालचाली करून कारखाना खासगी कंपनीकडे सोपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
कारखान्याची २१ एकर जमीन विकण्यात आली, तरीही कारखाना आर्थिक अडचणीत असल्याचा दावा करत त्यांनी व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रशासक नेमल्यानंतर नियमानुसार निवडणुका होणे अपेक्षित होते; मात्र कायद्याच्या तरतुदींचा आधार घेत कारखान्याचा ताबा कायम ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी बोलताना शिवरूपराजे खर्डेकर यांनी कारखाना बंद पडावा अशी आमची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. “आमचा विरोध कारखान्याच्या खाजगीकरणाला आहे. कारखाना सहकारी तत्त्वावर चालविण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत. गरज भासल्यास मुख्यमंत्री स्तरावरही पाठपुरावा करू,” असे ते म्हणाले.
अॅड. नरसिंह निकम यांनी २०३६ पर्यंत वैध असलेला करार असताना जवाहर कारखान्याने श्रीराम कारखाना अचानक का सोडला, असा प्रश्न उपस्थित केला. या निर्णयामागे आर्थिक हितसंबंध असल्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी सर्वसामान्य सभासद व कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. यासंदर्भातील शासन निर्णयही त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केला.
विश्वासराव भोसले यांनी शासनाच्या नियमांनुसार लवाद प्रक्रिया पूर्ण करूनच पुढील निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. भागीदारी करार मोडून नवीन खासगी करार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी कारखाना शासनाच्या धोरणानुसारच चालविण्याची मागणी केली.
पत्रकार परिषदेत उपस्थित नेत्यांनी एकमुखाने श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे सहकारी स्वरूप कायम ठेवण्याची आणि शेतकरी, सभासद तसेच कामगारांच्या हिताला प्राधान्य देण्याची मागणी केली.










