श्रीराम सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी सभासदांनी एकजूट दाखवावी; आठ दिवसांत शेअर्स पूर्ण करा, गरज पडल्यास आंदोलनाचे नेतृत्व करेन : रामराजे नाईक निंबाळकर

0
1
श्रीराम सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी सभासदांनी एकजूट दाखवावी; आठ दिवसांत शेअर्स पूर्ण करा, गरज पडल्यास आंदोलनाचे नेतृत्व करेन : रामराजे नाईक निंबाळकर

श्रीराम सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी सभासदांनी एकजूट दाखवावी; आठ दिवसांत शेअर्स पूर्ण करा, गरज पडल्यास आंदोलनाचे नेतृत्व करेन : रामराजे नाईक निंबाळकर

फलटण | प्रतिनिधी

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याचा निर्णायक टप्पा समोर असताना ऊस उत्पादक शेतकरी सभासदांची अत्यंत महत्त्वपूर्ण व तातडीची बैठक फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात पार पडली. कारखान्यासमोरील कायदेशीर अडचणी, आगामी गाळप हंगाम, आर्थिक परिस्थिती आणि भविष्यातील नियोजन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभासदांना थेट आणि स्पष्ट शब्दांत आवाहन करताना सांगितले की, श्रीराम सहकारी साखर कारखाना हा एकेकाळी राज्यातील आदर्श कारखाना होता. हा कारखाना चालवण्याची जबाबदारी स्वीकारताना केवळ आर्थिक बाजू न पाहता श्रीमंत मालोजीराजे यांनी उभा केलेला हा सहकाराचा वारसा पूर्वीच्या वैभवात टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला.

ते म्हणाले, “तुमच्या कुटुंबांचे भविष्य सुरक्षित राहावे म्हणून मी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून रात्रंदिवस काम केले. मात्र आता या कारखान्याच्या भवितव्याचा अंतिम निर्णय सभासदांनी घ्यायचा आहे. जर आजही ठाम भूमिका घेतली नाही, तर मी या भानगडीत पडणार नाही. मात्र अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी वेळ आली तर रस्त्यावर उतरायलाही मी तयार आहे.”

रामराजे नाईक निंबाळकर यांनी कारखान्याच्या आर्थिक उभारणीसाठी महत्त्वाचा प्रस्ताव मांडत सांगितले की, प्रत्येक सभासदाने पुढील आठ दिवसांत १५ हजार रुपये भरून आपले शेअर्स पूर्ण करावेत. यामुळे सुमारे १२ कोटी रुपयांचे भागभांडवल उभे राहील. त्यानंतर कारखान्याचे निव्वळ मूल्य वाढेल आणि बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारेन. त्यानंतर श्रीराम कारखाना पुन्हा दिमाखात सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला खूश करण्यासाठी सत्तेचा वापर करून न्याय प्रक्रियेत अडथळे निर्माण केले जात असतील, तर न्याय मिळवण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय उरणार नाही. पुन्हा कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यास सभासदांनी रस्त्यावर उतरावे आणि त्या आंदोलनाचे नेतृत्व मी स्वतः करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, गेल्या अनेक दशकांत त्यांच्या कुटुंबाने जनतेची निस्वार्थ सेवा केली. दोन धरणे, औद्योगिक प्रकल्प, कमिन्स कंपनी आणि अडचणीत असलेला श्रीराम कारखाना उभा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कोरोना काळातही हजारो नागरिकांना मदत करण्यात आली. मात्र त्यानंतरही झालेला निवडणुकीतील पराभव हा वैयक्तिक नसून विकासाच्या राजकारणाचा पराभव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आदर व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, त्यांना वैयक्तिक विरोध नाही आणि ते देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता ठेवतात. मात्र गरीब सभासदांच्या संसाराशी निगडित असलेल्या श्रीराम कारखान्याबाबत अन्याय होऊ देऊ नये, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारकडे केले.

यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण यांनीही राज्य शासनाच्या भूमिकेवर टीका करताना आरोप केला की, काही स्थानिक व्यक्तींच्या दबावामुळे कारखान्याच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेत आणि नवीन करारामध्ये कायदेशीर अडथळे निर्माण केले जात आहेत. हे राजकीय कारस्थान उधळून लावण्यासाठी सर्व सभासदांनी एकत्र येणे गरजेचे आहे. श्रीराम कारखान्याचे धुराडे पुन्हा पेटवणे हीच तालुक्याच्या आर्थिक भवितव्याची शेवटची मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सहकार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, शेतकऱ्यांना योग्य दर आणि कामगारांना वेळेवर वेतन मिळावे या उद्देशाने सहकारी साखर कारखाने उभे राहिले. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे सहकार क्षेत्र अडचणीत आले आहे. श्रीराम कारखाना वाचवण्यासाठी सर्व सभासदांनी मतभेद विसरून एकत्र यावे आणि गरज पडल्यास संघर्षासाठी तयार राहावे, असे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध मान्यवरांनी कारखान्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक संतोष खटके यांनी केले. कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी कारखान्याच्या निवडणुकीपासून ते सध्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम, प्रशासकीय पत्रव्यवहार आणि कायदेशीर प्रक्रियेची सविस्तर माहिती सभासदांसमोर मांडून सद्यस्थिती स्पष्ट केली.

या बैठकीला सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यासह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.