
स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; अॅड. कांचन कन्होजा खरात यांची मागणी
फलटण | प्रतिनिधी :- महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेबाबत गंभीर आक्षेप नोंदवत, संबंधित महावितरण अधिकाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अॅड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महावितरणकडून वीज ग्राहकांना संदेश पाठवून तसेच प्रत्यक्षात कार्यरत वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, स्मार्ट मीटरबाबत देशभरातून विविध आक्षेप नोंदविण्यात आले असून, अशा परिस्थितीत ही मोहीम कोणत्या कायदेशीर आधारावर राबविण्यात येत आहे, याबाबत स्पष्टता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अॅड. खरात यांनी असा आरोप केला आहे की, स्मार्ट मीटर बसविण्याबाबत पूर्वीच्या निर्णयांमध्ये बदल झाल्यानंतर तसेच राज्य सरकारने सक्ती नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही काही अधिकारी ग्राहकांना संदेश पाठवून मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू ठेवत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली.
तसेच, राज्य सरकारकडून स्पष्ट आदेश मिळेपर्यंत स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी. याशिवाय, उपलब्ध स्मार्ट मीटर सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयाने स्वयंसंज्ञान (सुओ मोटू) दखल घ्यावी, राज्य सरकारला आवश्यक निर्देश द्यावेत आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही अॅड. कांचनकन्होजा खरात यांनी केली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अॅड. सौ. रेश्मा पठाण या देखील उपस्थित होत्या.










