
१५ वर्षांनंतर न्यायाचा विजय! कोठडीतील मृत्यूप्रकरणी तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिसांना जन्मठेप
वाशिम | प्रतिनिधी : गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी पोलिस कोठडीत करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याच्या गाजलेल्या प्रकरणात वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत रिसोडचे तत्कालीन ठाणेदार आणि अन्य आठ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल १५ वर्षे, १ महिना आणि २३ दिवसांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर पीडित कुटुंबाला अखेर न्याय मिळाला.
जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावला. न्यायालयाने दोषी ठरविलेल्यांमध्ये तत्कालीन ठाणेदार माधव माणिक धांडे यांच्यासह मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कणिराम जाधव या नऊ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
काय होते संपूर्ण प्रकरण?
९ मे २०११ रोजी रिसोड पोलिसांनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील पारधी वस्तीवर धाड टाकली होती. चोरीच्या संशयावरून बेग्या पवार या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर कोठडीत अमानुष मारहाण केल्याचा आरोप होता. या मारहाणीनंतर १० मे २०११ रोजी त्याचा मृत्यू झाला.
घटनेची गंभीर दखल घेत तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. सीआयडीने अवघ्या ३४ दिवसांत तपास पूर्ण करून आरोपी पोलिसांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आणि सप्टेंबर २०११ मध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
शवविच्छेदन अहवाल ठरला निर्णायक
शवविच्छेदन अहवालानुसार बेग्या पवारच्या शरीरावर ४४ मारहाणीच्या खुणा आढळल्या होत्या. अमानुष मारहाण, अतिरक्तस्राव आणि मानसिक धक्का यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमूद केले. या वैद्यकीय पुराव्याने न्यायालयीन सुनावणीत महत्त्वाची भूमिका बजावली.
४७ साक्षीदारांच्या साक्षींचा महत्त्वाचा आधार
या प्रकरणात सरकार पक्षाने एकूण ४७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. मृताचे आई-वडील, पत्नी, पोलिस कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी आणि पुरावे न्यायालयाने महत्त्वाचे मानले.
‘तो फक्त पारधी होता म्हणून मारला’ – आईचा आक्रोश
निकालानंतर बेग्या पवारची आई कलाबाई, वडील नैनू आणि पत्नी संजीवनी पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांचे आभार मानले.
बेग्याच्या आईने भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, “माझ्या मुलावर यापूर्वी एकही गुन्हा दाखल नव्हता. तो फक्त पारधी समाजातील होता म्हणून त्याला चोर ठरवून मारून टाकले.”
आरोपींना निलंबित केले, काही पुन्हा सेवेत
गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर त्यापैकी काहींना पुन्हा सेवेत घेण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार, चार आरोपी सध्या सेवेत कार्यरत होते.
न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारा निर्णय
या निकालामुळे कायद्याच्या राज्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. खाकी गणवेश परिधान केलेला अधिकारी असो किंवा सामान्य नागरिक—कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, हा स्पष्ट संदेश या निर्णयातून गेला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याने न्यायव्यवस्थेवरील सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.










