Saturday, September 12, 2026
Homeसातारापाण्याच्या लढ्यासाठी सज्ज फलटण! – हक्काच्या पाण्यासाठी ‘वाटेल ते’ करण्याचा संजीवराजेंचा इशारा

पाण्याच्या लढ्यासाठी सज्ज फलटण! – हक्काच्या पाण्यासाठी ‘वाटेल ते’ करण्याचा संजीवराजेंचा इशारा

फलटण (साहस टाइम्स प्रतिनिधी) – फलटण तालुक्याचे हक्काचे पाणी इतरत्र वळवण्याचा काही मंडळींचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत, “फलटणचे पाणी कुणालाही देऊ देणार नाही. त्यासाठी वाटेल ते करावे लागले तरी करू!” असा स्पष्ट इशारा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

फलटणमधील ‘लक्ष्मीनिवास पॅलेस’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे यांनी जलवाटप, सिंचन क्षेत्रातील घट आणि नागरी विकासाच्या मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडली. यावेळी श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, माजी जि.प. सदस्य धैर्यशील (दत्ता) अनपट, दूध संघ अध्यक्ष धनंजय पवार आणि माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.

संजीवराजेंनी स्पष्ट केले की, “फलटण तालुक्यातील सिंचनाखालील क्षेत्र कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे फलटण, माळशिरस आणि खंडाळा तालुक्यांनी एकत्र येऊन या अन्यायकारक निर्णयाचा विरोध करावा लागेल.”

त्याचबरोबर, फलटण शहरासमोरील कोळकी, जाधववाडी, साखरवाडी आणि विडणी या गावांना नगरपंचायत दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी आपला प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. “फलटणला कोळकीचा भाग जोडण्याचा प्रस्ताव आम्ही रोखला आणि कोळकीचे स्वतंत्र अस्तित्व टिकवले,” अशी आठवणही त्यांनी करून दिली.

यावेळी बोलताना माजी आमदार दीपक चव्हाण यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती व सध्याचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निरा देवधर प्रकल्पाला गती दिल्याची आठवण करून दिली. “२०१४ नंतर केंद्र सरकारकडून एक रुपयाही निधी मिळालेला नव्हता,” असा आरोपही त्यांनी केला.

याशिवाय, गेल्या २५ वर्षांत फलटण-कोरेगाव विधानसभा क्षेत्रात झालेल्या विविध विकासकामांचा आढावा देखील त्यांनी घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments