Saturday, September 12, 2026
Homeफलटणविभाजनाच्या प्रवृत्तीला छेद देत बुद्धाच्या दिशेने समाजाला घेऊन जाण्याची गरज” : नितीन...

विभाजनाच्या प्रवृत्तीला छेद देत बुद्धाच्या दिशेने समाजाला घेऊन जाण्याची गरज” : नितीन चंदनशिवे

आरडगाव येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म व लोकशाही’ विषयावर धम्मसंवाद! वर्षावास-२०२६ अंतर्गत आयोजन; भिक्खू संघ, बुद्धविहार, अभ्यासिका आणि सामाजिक ऐक्यावर नितीन चंदनशिवे यांचे परखड भाष्य

फलटण : आरडगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ : भारतीय बौद्ध महासभा, आरडगाव यांच्या वतीने वर्षावास-२०२६ ‘धम्मसंकल्प अभियान’ अंतर्गत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म व लोकशाही’ या विषयावर विशेष धम्मसंवादाचे आयोजन पंचशील बुद्धविहार, आरडगाव येथे करण्यात आले. धम्मविचार, सामाजिक परिवर्तन, भिक्खू संघाची भूमिका आणि बुद्धविहाराच्या माध्यमातून समाजप्रबोधन या विषयांवर यावेळी सखोल विचारमंथन झाले.

कार्यक्रमात दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी आपल्या मनोगतातून वर्तमान सामाजिक परिस्थितीवर परखड भाष्य केले. समाजामध्ये निर्माण होत असलेल्या उपवर्गीकरणाच्या प्रवृत्तीमुळे समाजामध्ये फूट निर्माण होण्याचा धोका त्यांनी अधोरेखित केला. समाजाला विविध गटांमध्ये विभागण्याऐवजी सर्वांना सोबत घेऊन बुद्धाच्या दिशेने, समता, बंधुता, प्रज्ञा आणि करुणेच्या मार्गाने पुढे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
भिक्खू संघाची भूमिका मांडताना त्यांनी धम्माच्या प्रसारासाठी भिक्खू संघ आणि धम्मानुयायी यांच्यातील सुसंवाद महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. बुद्धविहार हे केवळ धार्मिक कार्यक्रमांचे ठिकाण न राहता अभ्यास, वाचन, चिंतन, धम्मसंवाद आणि सामाजिक प्रबोधनाचे केंद्र बनले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आरडगाव येथील बुद्धविहारात सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेचेही नितीन चंदनशिवे यांनी विशेष कौतुक केले. बुद्धविहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देणे ही पुढील पिढीच्या वैचारिक जडणघडणीच्या दृष्टीने महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. बुद्धविहारातून धम्मासोबतच शिक्षण आणि वाचनाची चळवळ उभी राहिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या मनोगताचा समारोप करताना नितीन चंदनशिवे यांनी त्यांच्या प्रसिद्ध ‘कांबळे’ या कवितेचे सादरीकरण केले. कवितेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विषमता, माणसामाणसांमध्ये निर्माण होणारे अंतर आणि विभागणीच्या मानसिकतेवर अत्यंत मार्मिक भाष्य केले. सर्व समाजाला सोबत घेऊन बुद्धाच्या विचारांच्या दिशेने वाटचाल करण्याचा संदेश त्यांच्या मांडणीतून प्रभावीपणे व्यक्त झाला.

भिक्खू संघाच्या वतीने नालासोपारा मुंबई येथून आलेले भंते कश्यप जी आणि नागपूर येथून आलेले भंते नागप्रकाश यांनी आपली मांडणी केली. बुद्धांचा धम्म हा केवळ श्रद्धा किंवा कर्मकांडाचा विषय नसून प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री आणि समतेच्या आचरणातून जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धम्माचा अभ्यास करून तो प्रत्यक्ष जीवनात उतरविण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मा. अशोकभाऊ गायकवाड (बापू) यांनी आरडगाव येथील मंडळाच्या कार्याचे आणि कार्यक्रमाच्या नियोजनाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले. विशेषतः प्रमोद काकडे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी पुढील धम्मकार्य आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. आरडगावमध्ये धम्मविषयक उपक्रम सातत्याने सुरू राहणे ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमामुळे आरडगाव परिसरात धम्मसंवाद, सामाजिक प्रबोधन, वाचन-अभ्यास आणि बुद्धविहारकेंद्रित विधायक उपक्रमांना नवी दिशा मिळाली. सर्वांना सोबत घेऊन समता, बंधुता आणि माणूसपणाच्या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर

यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर ती प्रकाश टाकणारी नाटिकेचे सादरीकरण ही करण्यात आले.
मा. अशोकभाऊ गायकवाड (बापू), भंते नागप्रकाश, भंते धम्मानंद, प्रा. विनोद वामाडे, सचिन मून, दंगलकार नितीन चंदनशिवे, स्वागताध्यक्ष प्रकाश कदम, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, तालुका अध्यक्ष भीमराव लोंढे, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष महावीर भालेराव, सरचिटणीस बाबासाहेब जगताप, संस्कार सचिव बजरंग गायकवाड, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, संघटक राजेंद्रकुमार गायकवाड, साहित्यिक तानाजी जगताप, सामाजिक कार्यकर्ते बी. टी, जगताप रिपब्लिकन पक्षाचे विजय येवले, संजय निकाळजे, राजू मारुडा, बहुजन समाज पक्षाचे प्रेम मोरे, बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते, तालुका पदाधिकारी अरविंद निकाळजे, संघटक विजय भोसले, आयोजक भारतीय बौद्ध महासभा आरडगावचे अध्यक्ष राजेश अशोक काकडे, उपाध्यक्ष निलेश यादव काकडे, सचिव सचिन काकडे, कार्याध्यक्ष विकास कांबळे तसेच प्रमोद काकडे व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि धम्मप्रेमी उपासक – उपासिका. सूत्रसंचालन सतीश काकडे, निमंत्रक भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा व फलटण तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments