Sunday, September 13, 2026
Homeसाताराआषाढी वारी पार्श्वभूमीवर फलटणमध्ये प्रशासनाची लगबग; वारकऱ्यांसाठी रस्ते, पाणी व स्वच्छतेवर विशेष...

आषाढी वारी पार्श्वभूमीवर फलटणमध्ये प्रशासनाची लगबग; वारकऱ्यांसाठी रस्ते, पाणी व स्वच्छतेवर विशेष भर


फलटण प्रतिनिधी :- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा यंदा ८ जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान करणार असून १७ जुलै रोजी हा सोहळा फलटण येथे मुक्कामी येणार आहे. या पार्श्वभूमीवर फलटण शहरात वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आतापासूनच प्रशासकीय पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. यासाठी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या.
या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांचे अधिकारी, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला.
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. तसेच वारकऱ्यांसाठी मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यास सांगितले. शहरात स्वच्छतेच्या कामात कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा आढळल्यास ती सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही नगराध्यक्षांनी यावेळी दिला.
दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबतच महानुभाव पंथीयांची फलटण शहरात दरवर्षी होणारी ‘घोडा यात्रा’ही अत्यंत प्रसिद्ध आहे. ‘दक्षिण काशी’ अशी ओळख असलेल्या फलटणमध्ये या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दाखल होत असतात. त्यामुळे या यात्रेच्या नियोजनाबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहरात येणाऱ्या भाविकांना मुक्काम, पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा योग्यरित्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध तयारी करावी, असे स्पष्ट निर्देश नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments