Sunday, September 13, 2026
Homeसाताराअजित पवारांचा फलटणकरांना विकासाचे आश्वासन, सचिन पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे...

अजित पवारांचा फलटणकरांना विकासाचे आश्वासन, सचिन पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन

फलटण, 19 नोव्हेंबर: फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासाचे मुद्दे उपस्थित करत इथल्या मतदारांना विकासाच्या नव्या पर्वाचे आश्वासन दिले. फलटणच्या विकासाची गती बारामतीप्रमाणेच होणे गरजेचे होते, असे सांगत त्यांनी उपस्थितांना विद्यमान नेतृत्व बदलण्याचे आवाहन केले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित विराट प्रचार सभेत अजित पवार म्हणाले, “आपण 1991 पासून सत्तेत आहोत, परंतु फलटणचा विकास बारामतीसारखा का झाला नाही, हा प्रश्न आहे. स्थानिक सहकारी संस्था, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या माध्यमातून मिळालेल्या संधींचा पुरेपूर उपयोग केला गेला नाही.”

विकासाच्या संधीचा लाभ घ्या
पवार यांनी सांगितले की, “फलटणचा ठप्प झालेला विकास गतिमान करण्याची, सहकारी संस्थांना पूर्ववैभव प्राप्त करून देण्याची आणि शेतीला प्रतिष्ठा मिळवून देण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून आहे. सचिन पाटील यांना विधानसभेत पाठवून मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलण्याचे आश्वासन मी देतो.”

श्रीराम साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा कधी होणार?
अजित पवार यांनी श्रीराम साखर कारखान्याच्या व्यवस्थापनावर सवाल करत, “सन 2021 मध्ये कारखाना चालवायला देण्याचा प्रस्ताव शासनाने स्वीकारला असताना, सभासदांच्या हिताला तडा जाईल अशा पद्धतीने कारखाना चालवायला दिला गेला. हा कारखाना पुन्हा सभासदांच्या मालकीचा होण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल,” असे आश्वासन दिले.

बारामतीप्रमाणे सुविधा फलटणला का नाहीत?
“बारामतीमध्ये प्रत्येक नागरी सुविधा दिली जाऊ शकते, तर फलटणमध्ये ती का नाही? स्थानिक नेतृत्वाचा अभाव हे यामागचे कारण आहे. त्यामुळे नेतृत्व बदलण्याची ही वेळ आहे,” असे पवार म्हणाले.

समाज घटकांचा पाठिंबा आणि विकासाची हमी
माळी, होलार समाज आणि प्रहार जनशक्ती पक्षाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानून, पवार यांनी त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. तसेच सुभेदार मल्हारराव होळकर यांचे स्मारक उभारण्याचा मनोदय व्यक्त केला.

“पाच वर्षांत चित्र बदलेल”
“सर्व नागरी, शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा फलटणमध्ये उभारण्यासाठी महायुती सरकार पुन्हा सत्तेत येताच पाच वर्षांत आवश्यक ती सर्व कामे पूर्ण केली जातील,” असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments