Saturday, September 12, 2026
Homeसाताराफलटण-कोरेगाव निवडणुकीतील पराभवाचा धडा; राजे गटाची नवीन रणनीती?

फलटण-कोरेगाव निवडणुकीतील पराभवाचा धडा; राजे गटाची नवीन रणनीती?

फलटण :- फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सचिन पाटील यांनी विजय मिळवला. मात्र, राजे गटासाठी ही निवडणूक अपेक्षेपेक्षा निराशाजनक ठरली. काल झालेल्या संवाद मेळाव्यानंतर विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी “झालेल्या चुका मान्य करून संघर्षाला सुरुवात. सुरक्षित, आधुनिक, संपन्न सातारा जिल्ह्यासाठी” असे मत व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त केले.

राजकीय पुनरुत्थानाची तयारी?

आगामी महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून ताकदीने मैदानात उतरण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांनी कंबर कसली आहे का, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार यंत्रणेत ते सक्रिय दिसले नसले तरी पडद्यामागून काम करत तालुक्यातील गावागावांमध्ये त्यांनी खाजगी बैठका घेतल्या होत्या. मात्र, त्याचा राजे गटाला अपेक्षित फायदा झाला नाही.

राजे गटासाठी नवी दिशा?

निवडणुकीतील अनुभवातून धडा घेत, रामराजे आता स्वतः पुढाकार घेऊन राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी पुढे येतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी त्यांनी अधिक सक्रिय भूमिका बजावत गटबांधणीसाठी व्यापक पातळीवर प्रयत्न सुरू केल्यास आगामी निवडणुकांमध्ये राजे गटाला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.

राजकारणाचे नवे समीकरण

सातारा जिल्ह्यातील राजकारणात सुरक्षितता, आधुनिकता, आणि संपन्नता यावर भर देत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नवीन रणनीती राबवावी लागणार आहे. आगामी काळातील त्यांचा सक्रिय सहभाग राजे गटाला नवसंजीवनी देईल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments