Tuesday, September 15, 2026
Homeसाताराआगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज - कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्हाधिकारी व पोलिस...

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज – कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्हाधिकारी व पोलिस यंत्रणांची ठोस तयारी

सातारा: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भगवान कांबळे, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण आणि विविध विभागांचे नोडल अधिकारी यांच्यासह सर्व प्रांताधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी डूडी यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सर्व संबंधित विभागांनी सज्ज राहण्याचे निर्देश दिले. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर तिचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व विभागांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाला आतापासूनच आवश्यक ते प्रशिक्षण द्यावे, असे सांगण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महसूल, पोलीस, आरटीओ, उत्पादन शुल्क, जीएसटी अशा महत्त्वाच्या विभागांतील अधिकाऱ्यांचे पथक नेमले जाणार आहे.

निवडणूक काळात अवैध दारू, रोख रक्कम आणि इतर बेकायदेशीर साधनांचा वापर होऊ नये यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश देखील दिले गेले. लिकर उत्पादन, पुरवठा आणि विक्रीचा अहवाल १ ऑक्टोबरपासून सादर करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्ह्यातील औषध निर्मिती कंपन्यांच्या नियंत्रणासाठी अन्न व औषध विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, तसेच त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवून योग्य निरीक्षण करावे, असे आदेश देखील देण्यात आले.

पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी संभाव्य निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने तातडीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यासाठी सर्व प्रांत अधिकाऱ्यांनी सोनार संघटना, व्यापारी संघटना, ट्रॅव्हल संघटना आणि लिकर संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी त्यांना नियमांची माहिती द्यावी, असे सांगितले.

निवडणूक प्रचारासाठी वापरली जाणारी विनापरवाना वाहने, मॉडिफाय केलेली वाहने, विनापरवाना बॅनर व पोस्टर यांच्यावर कठोर कारवाई करावी. याशिवाय, टोल नाक्यावर लक्झरी वाहनांची काटेकोर तपासणी करण्याचे आदेशही दिले गेले. एमआयडीसी परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवून त्याद्वारे मॉनिटरिंग करणे आणि बंद असलेल्या उद्योगांवर देखील लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डूडी यांनी दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments