Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्र१५ ऑगस्ट शाहीर वामनदादा कर्डक जयंती

१५ ऑगस्ट शाहीर वामनदादा कर्डक जयंती

फलटणः  वामन तबाजी कर्डक हे वामनदादा कर्डक नावाने प्रसिद्ध. ते मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते. कर्डकांनी डॉ. आंबेडकरांवर १०,००० हून अधिक गीते रचली आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखाणातून महाराष्ट्राच्या घरांघरांत खेड्यापाड्यात, वाडीतांड्यांत पोहचवण्याचे काम केले. बुद्ध, फुले, आंबेडकरांचा विचार हा वामनदादांचा श्वास होता, ऊर्जाकेंद्र होते. हे विचार प्रभावीपणे प्रसारित करत वामनदादा जीवनाच्या शेवटापर्यंत फिरत राहिले. त्यामुळे समाज जागृत होत राहिला. वामन कर्डक यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मधील देशपंडी या छोट्याशा खेड्यात झाला. वडील तबाजी कर्डक, आई सईबाई, मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री असा वामनदादांचा परिवार होता. त्यांच्या घरी १८ एकर शेती होती. धान्य घरात यायचे तरीही हंगाम संपला की आईने डोंगरात जाऊन लाकडे गोळा करून मोळी बांधून ते जळतण सिन्नर बाजारात विकायचे. वडील टेंभुर्णीच्या पानाच्या विड्या करून विकायचे व हेडीचा धंदा करायचे. सर्वांनी कष्ट केल्यावरही आषाढ श्रावणात आबाळ व्हायची. कधी तरवट्याची भाजी, माठाची भाजी, कधी भाकरीच खावी लागायची. कर्डकांनी लहानपणी गुरे चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे, शिवडी येथे गिरणी कामगाराची नोकरी करणे, मातीकाम, सिमेंट कॉंक्रीटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रूट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑईल मिलमध्ये नोकरी, इत्यादी कामे केली. त्यांना वाचनाचा छंद होता तसेच त्यांनी लल्लाट लेखया नाटकात घुमा या पात्राची भूमिका केली होती. वयाच्या १९-२०व्या वर्षी वामनचे लग्न अनुसया नावाच्या मुलीशी झाले. पुढे त्यांच्या कुटुंबात मीरा नावाच्या मुलीने जन्म घेतला. वामनदादांचे जीवन सुखात गेले नाही. बायको त्यांना सोडून गेली आणी पुढे आजारपणात मीराचेही निधन झाले. हा त्यांचा जीवनाला फार मोठा धक्का होता, ते मीराचे दुःख कधीही विसरू शकले नाहीत.

मुंबईला प्रयाण
मुलगी मीराच्या निधनानंतर पुढे आई सोबत पोटाची खळगी भरण्याकरिता वामनदादा मुंबईत आले. त्यांनी गिरणी कामगार म्हणून काम केले. कोळशाच्या वखारीत कोळसा उचलला. चिक्की विक्रीचा, आईस फ्रूट विक्रीचा धंदा केला. मिळेत ते काम केले. नंतर त्यांना टाटा कंपनीत नोकरी मिळाली. शिवडीच्या बीडीडी चाळीत राहत असतांना ते समता सैनिक दलात सामील झाले. इथपर्यंत वामनदादांना अक्षरांचा परिचय नव्हता. एकदा त्यांच्या चाळी मधील एका मानसाने वामनदादांना पत्र वाचायला सांगितले. दादांना पत्र वाचता लिहिता येत नव्हते. याचे त्यांना खूप वाईट वाटले. शिक्षण नसल्यामुळे आपण लिहू-वाचू शकत नाही हे त्यांना अवघड वाटू लागले व ते रडू लागले. आणि ते देहलवी नावाच्या मास्तरांकडून बाराखडी, मुळाक्षरे शिकली. जोडाक्षरे ते दुकानाच्या पाट्या, बोर्ड वाचून शिकले. हळू-हळू त्यांचे लेखन वाचन वाढू लागले. सोबतच ते विविध खेळही खेळायचे व व्यायामही करायचे.
आंबेडकरी चळवळीत सहभाग
त्यावेळी आंबेडकरी चळवळ सर्वत्र वेगाने जोर धरू लागली. आंबेडकरांचे अनुयायी समतेच्या लढ्यात उतरले होते. वामनदादाही बाबासाहेबांच्या सभेला जात. समता सैनिक दलातील तरुणांसोबत काठीला काठी लावून बाबासाहेबांना सभास्थानी जायला रस्ता करून देत. नायगाव येथे १९४३ साली वामन कर्डक यांनी बाबासाहेबांना पहिल्यांदा पाहिले होते.
कवी
वामन कर्डक यांचे मराठी व हिंदी वाचन बरेच पुढे गेले होते. त्यांना चित्रपट कथाकार, अभिनेता व्हायची खूप इच्छा होती. ते अनेक चित्रपट कंपन्यांमध्ये गेले. पण त्यांना मिनर्व्हा फिल्म कंपनीत एक्ट्रा म्हणून प्रवेश मिळाला. ते कारदार स्टुडिओ, रणजीत स्टुडिओ यांमध्येही कामाला जायचे. जेव्हा काम नसेल तेव्हा ते राणी बागेत तासनतास बसायचे. असेच १९४३ मध्ये राणी बागेत बसले असता वामनदादा कर्डक यांनी पहिले हिंदी गीताचे विडंबन गीत करायचे सुचले व ते त्यांनी ३ मे १९४३ रोजी चाळीतील लोकांसमोर गाऊन दाखवले. लोकांना प्रशंसा केली, टाळ्या वाजवल्या आणि वामन कर्डक कवी झाले. त्यानंतर २००४ पर्यंत कर्डकांनी गीतलेखनाचा व गायनाचा कार्यक्रम चालू ठेवला. त्यांची प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजारावर गीतरचना आहे. त्यांनी काही चित्रपट गीतेही लिहिलेली आहेत. त्यानंतर चाळीसगाव, मनमाड, टिळकनगर येथे त्यांनी आंबेडकरांच्या भाषणांच्या दरम्यान कवितांचे गायन केले.

काव्यसंग्रह

वाटचाल (गीतसंग्रह) १९७३

मोहळ (गीतसंग्रह) १९७६

हे गीत वामनाचे (गीतसंग्रह) १९७७

गद्य

माझ्या जीवनाचं गाणं (आत्मकथन) १९९६

ध्वनिफिती व चित्रपट गीते

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट

भीमज्योत

जय भीम गीते

सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला (चित्रपट- सांगत्ये ऐका)

चल गं हरणे तुरू तुरू (चित्रपट- पंचारती)

ह्यो ह्यो पाहुणा शकुचा मेहुणा (संगीत- मधुकर पाठक; स्वर- श्रावण यशवंते)

पुरस्कार व सन्मान

दिल्लीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप.

महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार.

महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे तीन वर्ष सदस्यत्व.

महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्यत्व.

औरंगाबाद येथे पहिला भव्य नागरी सत्कार (१९८७).

प्रा. ऋषिकेश कांबळे संपादित पहिल्या लोकशाहीर वामन कर्डक गौरव अंकाचे प्रकाशन (१९८७).

मधुकर भोळे संपादित वामन दादा कर्डक गौरव ग्रंथाचे प्रकाशन (२००१)

प्रा. डॉ. परशुराम गिमेकर संपादित ‘वामनदादा कर्डक यांची गीत रचना’ लेख संग्रहाचे प्रकाशन.

साहित्य, संस्कृती मंडळाची ‘उत्कृष्ट कविरत्‍न’ ही गौरववृत्ती.

’युगांतर प्रतिष्ठान’ तर्फे ‘युगांतर पुरस्कार’ (१९९७).

जामखेडच्या भाई फुटाणे प्रतिष्ठानचा ‘संत नामदेव पुरस्कार’

मुंबईच्या बौद्ध कलावंत संगीत अकादमीचा ‘भीमस्मृती पुरस्कार’

मराठवाडा ‘अस्मितादर्श पुरस्कार’

१९९३ मध्ये, वर्धा येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

औरंगाबादच्या वामनदादा कर्डक प्रतिष्ठान या संस्थेने भरविलेले पहिले अखिल भारतीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन, १५ मे २००८ रोजी औरंगाबाद येथे झाले. डॉ. यशवंत मनोहर संमेलनाध्यक्ष होते.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments