काश्यप बंधूंचे धम्मात आगमन, अंगुलीमालाचे हृदयपरिवर्तन, प्रथम धम्मसंगीती आणि अनाथपिंडकाच्या धम्मयोगदानावर सोमीनाथ घोरपडे यांचे विवेचन
विडणी, ता. फलटण : संघमित्र तरुण मंडळ, विडणी आणि भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुका माजी कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे विडणी येथे वर्षावास प्रवचन मालिकेअंतर्गत श्रावणी पौर्णिमेनिमित्त धम्मप्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा, शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी ‘श्रावणी पौर्णिमेचे बौद्ध धम्मातील महत्त्व’ या विषयावर सविस्तर धम्मप्रवचन केले.
आपल्या प्रवचनातून आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी श्रावणी पौर्णिमा ही केवळ धार्मिक तिथी किंवा उत्सवाचा दिवस नसून, बौद्ध धम्माच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांचे स्मरण, त्यामागील धम्मविचारांचे चिंतन आणि त्या विचारांचे वर्तमान जीवनाशी नाते जोडण्याची संधी असल्याचे स्पष्ट केले.
काश्यप बंधूंच्या परिवर्तनातून विवेकाचा संदेश :
प्रवचनामध्ये उरुवेला काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप या तीन बंधूंच्या धम्मप्रवेशाचा विशेष उल्लेख करण्यात आला. बाह्य कर्मकांड, तपश्चर्या आणि अग्निपूजेच्या परंपरेत असलेल्या काश्यप बंधूंनी तथागत बुद्धांच्या धम्माचा स्वीकार केला. या घटनेचे विश्लेषण करताना घोरपडे यांनी बाह्य अग्नीपेक्षा मनातील राग, द्वेष, मोह आणि तृष्णेचा अग्नी अधिक घातक असल्याचे सांगितले.
बुद्धांचा धम्म हा अंधश्रद्धा किंवा बाह्य कर्मकांडाचा मार्ग नसून अनुभव, विवेक, प्रज्ञा, नैतिकता आणि करुणेच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करण्याचा मार्ग आहे, असा संदेश त्यांनी दिला.
अंगुलीमालाच्या हृदयपरिवर्तनातून करुणेची शक्ती –
अंगुलीमालाच्या जीवनातील परिवर्तनाचा संदर्भ देताना घोरपडे यांनी हिंसेच्या मार्गावर गेलेल्या व्यक्तीमध्येही परिवर्तनाची क्षमता असते, हा बुद्धांचा मानवतावादी दृष्टिकोन स्पष्ट केला. बुद्धांनी अंगुलीमालाच्या हिंसेला हिंसेने उत्तर दिले नाही, तर प्रज्ञा आणि करुणेच्या माध्यमातून त्याच्या अंतःकरणात परिवर्तन घडवून आणले.
“अंगुलीमाल, मी थांबलो आहे; तू अजून थांबलेला नाहीस.” या बुद्धवचनाच्या माध्यमातून हिंसा, द्वेष आणि अशांततेपासून थांबणे म्हणजेच खऱ्या अर्थाने जीवनाकडे वळणे होय, असे त्यांनी स्पष्ट केले.
अंगुलीमालाच्या परिवर्तनाचा आजच्या सामाजिक जीवनाशी संबंध जोडताना त्यांनी सांगितले की, माणसाच्या भूतकाळातील चुका किंवा कर्मे त्याच्या संपूर्ण जीवनाचे अंतिम स्वरूप ठरवत नाहीत. योग्य दृष्टी, प्रज्ञा, नैतिक आचरण आणि धम्माच्या मार्गाने वर्तमानातील जीवनाला नवी दिशा देता येते. क्रौर्यापासून करुणेकडे, हिंसेपासून अहिंसेकडे आणि अशांततेपासून शांततेकडे जाणे हाच अंगुलीमालाच्या जीवनाचा मूलभूत संदेश आहे, असे त्यांनी सांगितले.
अंगुलिमाल सुत्तातून सत्यवचन आणि अभयाचा संदेश –
अंगुलिमालाच्या परिवर्तनानंतरच्या जीवनातील अंगुलिमाल सुत्त किंवा अंगुलिमाल परित्त याचेही त्यांनी महत्त्व स्पष्ट केले.
या सुत्ताचा बौद्ध परंपरेतील प्रसूतीच्या वेळी तसेच भय, संकट आणि आजारपणाच्या प्रसंगी मानसिक आधार व अभयाच्या भावनेसाठी केला जाणारा उपयोग याबाबतही त्यांनी माहिती दिली. अंगुलिमालाच्या पूर्वायुष्यातील हिंसा आणि नंतरच्या नैतिक जीवनातील झालेला बदल हा सच्चकिरियेच्या आशयाला विशेष अर्थ प्राप्त करून देतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
अनाथपिंडकाचे १६० सुत्तांचे पाठांतर आणि धम्मयोगदान-
प्रवचनामध्ये श्रावस्तीतील धम्मनिष्ठ उपासक अनाथपिंडक अर्थात सुदत्त यांच्या धम्मकार्याचाही उल्लेख करण्यात आला. अनाथ, गरजू आणि दुःखी लोकांसाठी आपले जीवन व संपत्ती समर्पित करणाऱ्या अनाथपिंडकाने जेतवनासाठी केलेले योगदान आणि बुद्धांच्या धम्मप्रसारातील त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला.
अनाथपिंडकाने एका श्रावण पौर्णिमेला १६० सुत्ते तोंडपाठ करून दाखविल्याचा संदर्भ देत, केवळ श्रद्धा ठेवणे पुरेसे नसून धम्माचा अभ्यास, श्रवण, आचरण आणि समाजहितासाठी त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे, असा संदेश घोरपडे यांनी दिला. संपत्तीचा खरा उपयोग वैयक्तिक उपभोगापेक्षा समाजकल्याण, दुःखितांची सेवा आणि धम्माच्या वृद्धीसाठी करण्यात आहे, ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
प्रथम धम्मसंगीतीतून धम्मसंरक्षणाचा संदेश –
तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर धम्म-विनयाच्या संरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रथम धम्मसंगीतीचे महत्त्वही त्यांनी विशद केले. बुद्धांच्या शिकवणीचे शुद्ध स्वरूप पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संघाने सामूहिकरीत्या केलेला हा प्रयत्न होता. स्थविर आनंद यांनी बुद्धांच्या धम्मोपदेशांचे, तर स्थविर उपाली यांनी विनयाचे संगायन केल्याचा संदर्भ देत धम्म हा कोणत्याही एका व्यक्तीची मालमत्ता नसून पुढील पिढ्यांपर्यंत तो शुद्ध स्वरूपात पोहोचविणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.
श्रावणी पौर्णिमा : स्मरण, चिंतन आणि – आत्मपरीक्षणाची तिथी
श्रावणी पौर्णिमेच्या विविध घटनांचे विश्लेषण करताना घोरपडे यांनी या सर्व घटनांमध्ये ‘परिवर्तन’ हे समान धम्मसूत्र असल्याचे सांगितले. काश्यप बंधूंच्या जीवनात अंध कर्मकांडापासून विवेक आणि प्रज्ञेकडे परिवर्तन झाले; अंगुलीमालाच्या जीवनात हिंसेपासून करुणेकडे परिवर्तन झाले; अनाथपिंडकाच्या जीवनातून धम्मनिष्ठ गृहस्थ जीवनाचा आदर्श समोर आला आणि प्रथम धम्मसंगीतीतून धम्माच्या संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्पष्ट झाली.
त्यामुळे श्रावणी पौर्णिमा ही केवळ उत्सव साजरा करण्याची तिथी नसून धम्म समजून घेण्याची, स्वतःच्या आचरणाचे आत्मपरीक्षण करण्याची आणि पुढील पिढीपर्यंत बुद्धांचा विवेकी, नैतिक व समताधिष्ठित धम्म पोहोचविण्याची प्रेरणा देणारी तिथी आहे, असे त्यांनी सांगितले.
वंदना सूत्र व धम्मकार्याची भूमिका
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुका माजी संस्कार सचिव तथा बौद्धाचार्य आयु. अमोल भोसले यांनी वंदना सूत्राचे सामुदायिक पद्धतीने पठण करून घेतले.
आजच्या पौर्णिमेचे महत्त्व आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुका माजी पदाधिकारी यांच्या वतीने फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव यांनी केले. तालुक्यात माजी पदाधिकाऱ्यांच्या वतीने सुरू असलेल्या धम्मकार्याची भूमिका आणि त्यामागील उद्देश त्यांनी स्पष्ट केला. धम्मकार्य हे केवळ कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजामध्ये प्रज्ञा, समता, बंधुता, नैतिकता आणि संघटनभावना निर्माण करणारे असावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव, माजी सरचिटणीस आयु.बाबासाहेब जगताप, प्रचार व पर्यटन विभागाचे माजी उपाध्यक्ष आयु.रामचंद्र मोरे, माजी संस्कार सचिव आयु.बजरंग गायकवाड, आयु. अमोल भोसले, धम्ममित्र आयु. धाईंजे सर, संघमित्र तरुण मंडळाचे कैलास जगताप तसेच संघमित्र तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते, बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिका आणि धम्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथेने करण्यात आली. कार्यक्रमानंतर संघमित्र तरुण मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व उपासक-उपासिकांसाठी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली.
या कार्यक्रमातून श्रावणी पौर्णिमेच्या ऐतिहासिक घटनांचे स्मरण करण्याबरोबरच त्या घटनांमधील प्रज्ञा, करुणा, अहिंसा, नैतिकता, धम्मसंरक्षण आणि सामाजिक जबाबदारी हे मूलभूत मूल्य आजच्या समाजजीवनात रुजविण्याचा संदेश देण्यात आला.
