ज्या भूमीला बाबासाहेबांच्या पाऊलखुणांचा स्पर्श, त्याच ठिकाणी समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न
संत गाडगे महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वास्तव्याच्या ठिकाणी शिबिराचे आयोजन
पंढरपूर (प्रतिनिधी) : समता सैनिक दलाच्या पंढरपूर शाखेच्या वतीने आंबेडकर नगर येथील गौतम विद्यालयात बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. संत गाडगे महाराज आणि बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वास्तव्याच्या स्मृती जपणाऱ्या या भूमीत शिबिराचे आयोजन झाल्याने या प्रशिक्षणाला विशेष ऐतिहासिक व वैचारिक महत्त्व प्राप्त झाले.
शिबिराची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना महिला समता सैनिक निर्मला आठवले, सैनिक कविता भोसले, सुवर्णा भोसले आणि पुष्पा काटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष आयु. जितेंद्र आठवले, अॅड. अनिल कांबळे, मेजर यशवंत साबळे आणि मच्छिंद्र जगताप यांच्या हस्ते समता सैनिक दलाच्या ध्वजाला सलामी देण्यात आली.
शिबिरामध्ये समता सैनिक दलाची कार्यपद्धती, शिस्त, संघटनात्मक बांधणी, सामाजिक बांधिलकी तसेच समाजामध्ये समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले. पहिल्या सत्रात परेड तसेच विविध प्रकारचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या सत्रात समता सैनिक दलाची आचारसंहिता, बौद्धिक मार्गदर्शन, लाठी-काठी प्रशिक्षण आणि स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेण्यात आले.
आयु. दादासाहेब भोसले यांचे सैनिकांना मार्गदर्शन
समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तथा राज्य संघटक, पुणे व सातारा जिल्हा प्रभारी आयु. दादासाहेब भोसले यांनी या प्रशिक्षण शिबिरास विशेष भेट देऊन उपस्थित सैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी समता सैनिक दलाचे महत्त्व, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, संघटनात्मक भूमिका आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
समता सैनिक दल ही केवळ शिस्त आणि प्रशिक्षणाची संघटना नसून समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांवर आधारित सामाजिक परिवर्तनाची सक्षम संघटनात्मक शक्ती आहे, असे आयु. दादासाहेब भोसले यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आणि सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयातून समता सैनिक दलाची झालेली जडणघडण समजून घेणे आणि त्याच विचारांशी प्रामाणिक राहून कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 20 मार्च 2027 ला समता सैनिक दलाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे हे वर्ष समता सैनिक दलाचे शताब्दी वर्ष असून 20 मार्च 2027 ला समता सैनिक दलाचे लाखो सैनिक महाड या ठिकाणी मानवंदना देतील. यान दलाचे प्रमुख म्हणून समता सैनिक दलाचे प्रमुख व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर हे समता सैनिक दलाचे नेतृत्व करतील. त्यामुळे समता सैनिक दलाच्या वतीने संपूर्ण राज्यभर समता सैनिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून गाव तिथे सैनिक ही संकल्पना राबविण्यात येत आहे. अशी माहिती दादासाहेब भोसले यांनी दिली.
आयु. भोसले यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये समता सैनिक दलाच्या इतिहासाविषयी अभिमान आणि संघटनेच्या कार्याविषयी अधिक बांधिलकी निर्माण झाली. त्यांची शिबिरातील भेट प्रशिक्षणार्थींसाठी विशेष प्रेरणादायी ठरली.
या प्रशिक्षण शिबिरात पंढरपूर, माळशिरस, माढा, सांगोला आणि करमाळा या तालुक्यांमधील सुमारे १२० सैनिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा, सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष आयु. जितेंद्र आठवले यांच्या हस्ते झाले. अॅड. अनिल कांबळे आणि मेजर यशवंत साबळे, केंद्रीय शिक्षक यांनी प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षणार्थींना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन समता सैनिक दल, पंढरपूर शाखा, जिल्हा सोलापूर (पश्चिम) तसेच पंढरपूर, माळशिरस, माढा, सांगोला आणि करमाळा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष समाधान जाधव, प्रमोद वनसाळे, हनुमंत बंगाळे, मोहन गौडदौरू, अविकांत चंदनशिवे, सुनील वाघमारे, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे आकाश वाघमारे, दत्ता सरवदे, नरेंद्र सरवदे, सरचिटणीस बाळासाहेब गायकवाड, जिल्हा कोषाध्यक्ष नागेश लोंढे, राजेंद्र सर्वगोड, शहराध्यक्ष राहुल सर्वगोड, ‘जोशाबा’ संपादक श्रीकांत कसबे, सैनिक आकाश शेळके, दिनेश धनवडे, बाबासाहेब प्रक्षाळे, सागर शेजाळ, दत्ता भोसले, नितीन साळवे, सैनिक अमर शेंबडे यांच्यासह समता सैनिक दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समता सैनिक दलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी समाजामध्ये समता, बंधुता, न्याय, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर आधारित प्रशिक्षित व संघटित कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला शिस्तबद्ध आणि सक्षम कार्यकर्त्यांची जोड देणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
शिबिराची सांगता समता सैनिक दलाच्या ध्वजाला जनरल सलामी देऊन करण्यात आली. त्यानंतर ध्वज खाली उतरवून उपस्थित प्रशिक्षणार्थींनी शपथ घेतली आणि सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि मानवमुक्तीच्या कार्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला.
