बारामती : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक (पीए) अजित दशावतारे यांच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. आईसोबत झालेल्या वादानंतर घराबाहेर पडलेल्या मुलीने शेजारील पाच मजली इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत व्यक्त होत असलेल्या हत्या की आत्महत्या, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
दि. २२ ऑगस्ट रोजी रात्री संबंधित मुलीचा तिच्या आईसोबत वाद झाला होता. आई रागावल्याने मुलगी घरातून बाहेर पडली. बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
मुलगी बेपत्ता असल्याने पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. मात्र तिचा ठावठिकाणा न लागल्याने तिचे अपहरण झाल्याच्या संशयातून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
दरम्यान, दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी रुई परिसरात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृत मुलगी हीच बेपत्ता असलेली मुलगी असल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेनंतर मुलीसोबत नेमके काय घडले, याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. आमदार रोहित पवार यांनीही संबंधित कुटुंबीयांची भेट घेऊन घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली होती.
पोलिसांनी उपलब्ध माहिती, घटनास्थळाची पाहणी आणि तपासातील विविध बाबींच्या आधारे चौकशी केली. या तपासातून दि. २२ ऑगस्टच्या रात्री आईसोबत वाद झाल्यानंतर मुलगी शेजारील पाच मजली इमारतीवर गेली आणि तेथून उडी मारून तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणाची माहिती देण्यासाठी पोलिसांकडून मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम, बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार आणि शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी उपस्थित होते.
