भरदिवसा गोळीबारासह कोयत्याने हल्ला; हत्या प्रकरणातील साक्षीदाराला लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती, घटनास्थळावरून बंदूक व दोन मॅगझिन जप्त केल्याची माहिती
पुणे | प्रतिनिधी :- पुण्यातील शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ जवळ हा प्रकार घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर भरदिवसा गोळीबार केला. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर कोयत्यानेही हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
मृत व्यक्ती ही यापूर्वीच्या एका हत्या प्रकरणातील साक्षीदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे जुन्या वैमनस्याचा किंवा साक्षीदाराला लक्ष्य करण्याचा हेतू होता का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या संभाव्य कारणाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
घटनास्थळावरून बंदूक आणि मॅगझिन जप्त?
या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांनी तपास सुरू केल्याचे वृत्त आहे. हल्लेखोरांकडील बंदूक आणि दोन मॅगझिन घटनास्थळावर आढळल्याची माहिती दिली जात आहे. हल्लेखोरांची संख्या, त्यांची ओळख आणि हल्ल्याचे नेमके कारण याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.
न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
न्यायालयासारख्या संवेदनशील आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणाच्या परिसरात भरदिवसा गोळीबार व प्राणघातक हल्ला झाल्याच्या वृत्तामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालयात दररोज मोठ्या संख्येने वकील, पक्षकार आणि नागरिकांची ये-जा असते. अशा ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
पोलिस तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण, हल्लेखोरांची ओळख आणि मृत व्यक्तीची अधिकृत ओळख स्पष्ट होणार आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे संपूर्ण पुणे शहराचे लक्ष लागले आहे.
.
