वेध मुत्सद्देगिरीचा…: ‘सुबिमल दत्त’ पं. नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाचे भाष्यकार

0
24
वेध मुत्सद्देगिरीचा…:  ‘सुबिमल दत्त’ पं. नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाचे भाष्यकार


  • Marathi News
  • Opinion
  • ‘Subimal Dutt’ Pt. Commentator On Nehru’s Foreign Policy Rasik Article By Rohan Chaudhary

डॉ. रोहन चौधरी7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपल्या परराष्ट्र धोरणाविषयी भारतीयांच्याच मनात असंख्य गैरसमज आहेत. त्यातही भारतीय परराष्ट्र धोरणाचे प्रवर्तक मानले जाणाऱ्या पं. जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी तर गैरसमजुतीचा एक मोठा इतिहास आहे. भारतीय नागरी सेवा परीक्षा (ICS) उत्तीर्ण झालेले, सर्वात दीर्घकाळ भारतीय परराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी सांभाळणारे, सोव्हिएत महासंघ, जर्मनी आणि बांगलादेश येथे राजदूत म्हणून आपली सेवा बजावणारे सुबिमल दत्त यांनी हा गैरसमज दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तर केलाच; परंतु त्याचबरोबर पं. नेहरूंचे नवे पैलूही समोर आणले.

पं. नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाची चर्चा प्रामुख्याने १९४७ नंतरच्या म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळासंदर्भातच होते. परंतु, ‘विथ नेहरू इन द फॉरेन ऑफिस’ या आपल्या पुस्तकात दत्त यांनी नेहरूंचे स्वातंत्र्यपूर्व काळाच्या परराष्ट्र धोरणातील योगदान आणि भारताची जागतिक राजकारणात अपेक्षित असणारी भूमिका याविषयी अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण केले आहे. स्वातंत्र्यापूर्वीपासून जागतिक राजकारणातील भारताच्या भूमिकेविषयी नेहरूंचा असणारा आग्रह, समकालीन जागतिक राजकारणाचे आकलन आणि स्वातंत्र्यानंतर तिला मूर्त स्वरूप आणण्याचे त्यांचे प्रयत्न यांचे महत्त्व आजही भारतीय परराष्ट्र धोरणासाठी दिशादर्शक आहेत. ते शब्दबद्ध करण्याचे मोलाचे कार्य दत्त यांनी केले आहे.

परराष्ट्र धोरणातील नेहरूंच्या योगदानाची सुरुवात परराष्ट्र मंत्रालयाच्या पुनर्रचनेपासून होते. १९४१ पर्यंत मोठ्या संख्येने भारतीय लोक विदेशात; त्यातही प्रामुख्याने ब्रिटिश वसाहतीत राहत असले, तरीही त्यांचे प्रश्न भारत सरकारच्या अखत्यारीत न येता ते त्या देशाचा अंतर्गत प्रश्न मानले जात. याचाच अर्थ, त्या भागात स्थायिक झालेले लोक भारतीय असले, तरी भारतीय नागरिक म्हणून त्यांची जबाबदारी ही भारत सरकारची न राहता त्या देशाच्या शिक्षण आणि आरोग्य विभागाची असायची. १९४१ मध्ये नेहरूंच्या आग्रहास्तव ‘प्रवासी भारतीय व्यवहार’ या विभागाची स्थापना करण्यात आली. दत्त यांच्या मते, नेहरूंच्या या पुढाकारामुळेच परदेशस्थित भारतीयांना ‘भारत’ या एका झेंड्याखाली सामावून घेणे सोपे झाले. ब्रिटिशांच्या जाचक अटींपासून न्याय मिळवण्यासाठी भारताबाहेर वास्तव्याला असणाऱ्या भारतीयांना ‘भारत’ नावाचा हक्काचा मंच निर्माण झाला. परिणामी ते देखील भारतीय स्वातंत्र्याशी जोडले गेले.

भारत जागतिक राजकारणाचे नेतृत्व जणू काही आजच करत आहे, असा आविर्भाव आणणाऱ्यांसाठी दत्त यांचे हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते, नेहरूंना जागतिक राजकारणाची आवड तरुणपणापासूनच होती. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात परराष्ट्र धोरणाचा मसुदा तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. १९२९ च्या अधिवेशनात म्हणजेच स्वातंत्र्याच्या दोन दशकांपूर्वी त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, भारताचा जागतिक दृष्टिकोन कसा असेल, याची मांडणी केली होती. चीन, तुर्की, इजिप्त, रशिया आणि पाश्चिमात्य देशांप्रमाणेच भारत हा जागतिक चळवळीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपल्या स्वतःच्या देशात आपल्यासमोर कितीही भीषण समस्या असल्या, तरी जगाचे नेतृत्व करण्यापासून आपण पळ काढू शकत नाही. आपण आपल्याच समस्यांत दंग राहून जागतिक बदलांकडे दुर्लक्ष केले, तर आपला विनाश अटळ आहे, अशी नेहरूंची धारणा होती. दत्त यांच्या मते, नेहरूंच्या या धारणेने भारतीय परराष्ट्र धोरणाला तात्त्विक आयाम तर दिलेच, पण त्याचबरोबर जागतिक राजकारणात भारत नेतृत्व करू शकतो, हा आत्मविश्वासही दिला.

भारताच्या परराष्ट्र धोरणासाठीच नव्हे, तर जगभरातील देशांना लष्कराच्या बळाऐवजी विचारधारेच्या सामर्थ्यावर जागतिक राजकारणात प्रभाव निर्माण करता येतो, हा विश्वास निर्माण होण्यासाठी नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास आजही तितकाच महत्त्वाचा आहे. दत्त यांच्यासारख्या दीर्घकाळ परराष्ट्र सचिव राहिलेल्या मुत्सद्द्याने नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर पुस्तक लिहिण्याला एक वेगळे महत्त्व आहे. जगातील कोणत्याही कार्यक्षम व्यक्तीच्या वाट्याला अपमान, अवहेलना येत असतेच. खोट्या, चुकीच्या माहितीद्वारे अशा व्यक्तींची राजकीय कारकीर्द संपवण्याचाही वारंवार प्रयत्न होत असतो. तो होऊ नये किंवा झाला तर सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची तजवीज करणे, हे देखील मुत्सद्द्यांचे प्रमुख कार्य असते. दत्त यांचे पुस्तक हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणूनच ही जाणीव असणारा मुत्सद्दी लेखक म्हणून सुबिमल दत्त यांची इतिहासात नोंद होईल.

(संपर्कः rohanvyankatesh@gmail.com)



Source link