Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रवेब वॉच: 'आट्टम'मध्ये जेव्हा समूह चर्चेतून मानसिकता उलगडू लागते...

वेब वॉच: ‘आट्टम’मध्ये जेव्हा समूह चर्चेतून मानसिकता उलगडू लागते…

[ad_1]

सुहास किर्लोस्कर9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

एखादी घटना घडल्यावर त्याविषयी आजूबाजूचे लोक, मित्रमंडळी, नातेवाईक व्यक्त होतात. काही जण तत्परतेने मत मांडतात, काही जण विचार करून बोलतात. काही जण मौन सोडत नाहीत. अशा लोकांशी चर्चा सुरू झाल्यावर हळूहळू लक्षात येते की, काहींच्या प्रतिक्रिया उत्स्फूर्त आहेत, काहींना विचार करायचे वावडे आहे, काही जण दुसऱ्याची बाजू ऐकून घ्यायलाच तयार नाहीत, काही मुद्देसूद चर्चा करायला तयार नसतात, तर काही जण वर्षानुवर्षांपासून पूर्वग्रहदूषित मते बाळगून आहेत.

मग कोणीतरी चर्चा करण्याऐवजी एकदम धमकावायला सुरूवात करतो, ज्याची परिणीती नंतर शारीरिक हिंसेमध्ये होऊ शकते. चर्चेचा मूळ विषय बाजूला पडतो आणि काही जण आपले व्यक्तिगत हेवेदावे त्यात आणून जुने हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न करतात. अशी चर्चा बघणे, ऐकणे हा इतरांसाठी औत्सुक्याचा, काही वेळा मनोरंजनाचाही विषय होऊ शकतो. पण, अशा चर्चेची पटकथा लिहिणे आव्हानात्मक असते. कारण त्यामध्ये अनेक व्यक्तींच्या विभिन्न स्वभाव वैशिष्ट्यांचे दर्शन घडवावे लागते. त्यामधील पात्रे तेवढ्या कालावधीसाठी स्वभावाशी सुसंगत वागतात, अशा पद्धतीने लेखन करावे लागते. अशाच एका चर्चेवर लिहिलेला ‘आट्टम’ हा मल्याळम चित्रपट प्राइमवर रिलीज झाला आहे.

आनंद एकार्शी लिखित-दिग्दर्शित ‘आट्टम’ (खेळ) चित्रपटाच्या सुरूवातीला एका नाटकात अभिनय करणाऱ्या तेरा व्यक्ती एकत्र येतात आणि नाटकाची पूर्वतयारी करतात असे दिसते. प्रत्येक पात्राच्या पहिल्या काही वाक्यांमधून त्या व्यक्तीचा स्वभाव समजू लागतो. एकमेकांशी होणाऱ्या संवादांमधून त्यांचे आपसातील संबंध कसे आहेत, याचाही अंदाज येतो. नाटकाच्या प्रयोगानंतरची पार्टी झाल्यावर एक प्रसंग घडतो आणि त्याला अनुसरून या तेरा कलाकारांमध्ये चर्चा घडत राहतात. सुरूवातीला दोघे-तिघे एकेका गटामध्ये चर्चा करतात आणि त्यानंतर निर्णय काय घ्यावा, यासाठी तेरा जण एकत्र येतात. यातून एक वेगळेच नाट्य उभे राहते, कारण चर्चेदरम्यान सर्वांना मिळणाऱ्या संधीचे सूतोवाच होते. पैसा आणि प्रसिद्धी याचे चित्र दिसू लागताच चर्चेचा नूर बदलतो. अशा प्रकारे ही चर्चा आणि चित्रपट वेगवेगळी वळणे घेत राहतो.

संवाद ही या चित्रपटाच्या पटकथेची जमेची बाजू असली, तरीही दिग्दर्शक आनंद यांनी त्याचे चित्रीकरण करताना कॅमेऱ्याचा वापर अतिशय उत्तम पद्धतीने केला आहे. बहुतांश प्रसंग बंदिस्त खोल्यांमध्ये घडत असले, तरी ते कधीही नाटकाचे चित्रीकरण वाटत नाही, हे विशेष. अनिरुद्ध अनीश यांची सिनेमॅटोग्राफी यासाठीच विशेष उल्लेखनीय आहे. चर्चेला सुरूवात होत असतानाच नारळ पडल्याचा आवाज होतो आणि जणू कोर्टातले न्यायाधीशच हातोडा आपटून चर्चा सुरू करण्याचे आदेश देतात, असा भास होतो. असे अनेक प्रसंग बारकाईने बघण्यासारखे आहेत. महेश भुवानंद यांचे संकलन प्रवाही आहे. काही प्रसंग संवादातूनच जोडले आहेत. सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. त्यामध्ये झरीन शिहाब, विनय फोर्ट आणि कलाभवन यांनी पकडलेली कॅरेक्टर खासच आहेत. चित्रपट चर्चेवर आधारित असला, तरी पुढे काय होईल, याची उत्सुकता कायम राहते. कारण ठराविक काळानंतर चर्चेला नाविन्यपूर्ण वळण मिळत राहते. जफर कलीम यांनी लिहिलेली, हरिहरन यांनी गायलेली.. कोई पत्ता हिले, हवा तो चले.. कौन अपना है, ये पता तो चले.. ही गजल समर्पक आहे.

‘आट्टम’सारख्या प्रयोगशील चित्रपटांची निर्मिती मल्याळम चित्रपटसृष्टीतहोत राहते, याचे प्रत्यंतर सातत्याने येते. ‘ट्वेल्व्ह अँग्री मेन’ या नाटकावर आधारित याच नावाचा इंग्रजी चित्रपट अनेक कारणांसाठी बघावा असा आहे. त्याचे हिंदी रुपांतर बासू चटर्जी यांनी ‘एक रुका हुआ फैसला’ या नावाने केले होते, परंतु मूळ इंग्रजी चित्रपट बघितल्यावर हिंदी चित्रपट तेवढी उंची गाठू शकला नाही, असे वाटत राहते. कोणत्याही चर्चेदरम्यान वेगवेगळे मुद्दे येत राहतात आणि त्यातून माणसाचे खरे रंग दिसू लागतात. याच संकल्पनेवर आधारित यास्मिन रझा यांनी लिहिलेले ‘गॉड ऑफ कार्नेज’ हे फ्रेंच नाटक उल्लेखनीय आहे. त्यावर आधारित ‘कार्नेज’ हा इंग्रजी चित्रपटही आवर्जून बघावा असा आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या भांडणातून झालेल्या किरकोळ मारामारीच्या निमित्ताने त्यांचे पालक एकमेकांना भेटतात आणि त्यांच्यातील चर्चेदरम्यान त्यांचे खरे रंग दिसू लागतात. निरंजन पेडणेकर यांनी फ्रेंच नाटकाचे ‘उच्छाद’ या नावाने उत्तम मराठी रुपांतर केले आणि अनुपम बर्वे यांनी ते दिग्दर्शित केले आहे. राजकीय, सामाजिक घटनांच्या निमित्ताने समाजात आणि समाज माध्यमांवर वेगवेगळ्या चर्चा होत राहतात. त्यातून अनेकांचे वेगवेगळे रंग आपल्याला दिसतात. अशावेळी ‘आट्टम’सारख्या कलाकृती आपल्याला सारासार विचार करण्यास प्रवृत्त करतात. आपण दुसऱ्याच्या मतांचा आदर करायला शिकतो.

(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments