सशक्त व सर्वसमावेशक नेतृत्वाच्या माध्यमातून क्रीडा शिक्षकांच्या प्रश्नांना मिळणार नवी दिशा
फलटण : पुणे जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या सहसचिवपदी श्री. सदाशिव सावंत सर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राहून शिक्षक, विद्यार्थी आणि क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी योगदान देणारे सदाशिव सावंत सर यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सशक्त, अभ्यासू आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून सावंत सर यांची ओळख असून, त्यांच्या निवडीमुळे पुणे जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षकांच्या विविध प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फुटेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शारीरिक शिक्षणाला शालेय जीवनात अधिक महत्त्व प्राप्त करून देणे, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविणे तसेच क्रीडा शिक्षकांच्या समस्या व मागण्यांसाठी संघटितपणे काम करणे, यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होणार असल्याचे मत शिक्षक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
श्री. सदाशिव सावंत सर यांच्या या निवडीबद्दल विविध संस्था, शिक्षक, सहकारी आणि मित्रपरिवाराच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
