Monday, September 7, 2026
Homeफलटणनाईकबोमवाडी महाराष्ट्रातील अग्रगण्य औद्योगिक शहर म्हणून उभे राहणार; फलटण जिल्ह्यासाठीही साथ द्या...

नाईकबोमवाडी महाराष्ट्रातील अग्रगण्य औद्योगिक शहर म्हणून उभे राहणार; फलटण जिल्ह्यासाठीही साथ द्या – रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण : जोपर्यंत मी उभा आहे, तोपर्यंत आपला तालुका हिरवागार झाला पाहिजे, तालुक्यात सुसज्ज प्रशासकीय इमारती उभ्या राहिल्या पाहिजेत आणि फलटणचा स्वतंत्र जिल्हा झाला पाहिजे, यासाठी जनतेने माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. तसेच नाईकबोमवाडी हे येत्या काळात महाराष्ट्रातील अग्रगण्य औद्योगिक शहर म्हणून उभे राहील, हा माझा शब्द असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नाईकबोमवाडी येथे धोम-बलकवडी उजवा कालवा किलोमीटर १२८ ते १४७ या टप्प्यातील बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, सातारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, विकास नाळे, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, विलासराव नलावडे, मिलिंद नेवसे, संजय कापसे, सचिन रणवरे, बापूराव चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, अडचणी निर्माण करणाऱ्यापेक्षा त्या अडचणी सोडवणारा नेहमीच मोठा असतो, यावर माझा विश्वास आहे. शंभू महादेवाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे या परिसरात विकासाची नवी पहाट उगवणार आहे. नाईकबोमवाडी परिसरात शंभर टक्के उद्योग येतील आणि येत्या काळात हा संपूर्ण भाग नंदनवन झाल्याचे चित्र जनतेला पाहायला मिळेल.

नाईकबोमवाडीचे दिवस आता सर्वार्थाने बदलणार असून परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा तसेच देवस्थानांशी संबंधित विविध प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. औद्योगिक विकासाबरोबरच स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांवर टीका करताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विकासकामांचा उल्लेख केला. जे होणार नाही, असे काहीजण वारंवार सांगत होते; मात्र अशक्य वाटणारी कामेही प्रत्यक्षात पूर्ण होत असल्याचे आज दिसत आहे. फलटण-दहिवडी रस्ता, बारामती रस्ता आणि पालखी मार्ग ही कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. ज्यांनी एकेकाळी या विकासकामांना विरोध केला, तेच लोक आज सोबत उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

नाईकबोमवाडी येथे एमआयडीसी होऊ नये यासाठी काहींनी बैठका घेऊन विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र विकासकामे रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपेक्षा विकासासाठी ताकद देणारे नेतृत्व आपल्या पाठीशी असल्यामुळे ही कामे शक्य होत असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

माझ्या विरोधात नॅरेटिव्ह तयार करण्यात काहींनी तब्बल वीस वर्षे घालवली, अशी टीकाही त्यांनी केली. जलसंपदा मंत्री असूनदेखील निरा-देवघरचे पाणी खंडाळ्याच्या पुढे आणण्यासंदर्भात पूर्वीच्या काळात अपेक्षित निर्णय झाले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

दुष्काळी भागातील पाणी बारामतीकडे जात असल्याचा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की, मी खासदार झाल्यानंतर अवघ्या १२ दिवसांत ते पाणी बंद करून दाखविले. मात्र आज परिस्थिती बदलली असून हाच रणजितसिंह नाईक निंबाळकर बारामती तालुक्यासाठीही पाण्याचे नवीन स्रोत शोधून देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

२,३०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार – आमदार सचिन पाटील

यावेळी आमदार सचिन पाटील यांनी आपल्या भाषणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाणीप्रश्नावरील पाठपुराव्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, बारामतीकडे जाणारे पाणी थांबविण्याच्या भूमिकेमुळे रणजितदादांना राजकीयदृष्ट्या मोठी किंमत मोजावी लागली आणि त्यांना खासदारकी गमवावी लागली. मात्र पराभवानंतरही ते थांबले नाहीत.

तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून रखडलेले पाणी मिळाले पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे आणि दुष्काळी भागातील शेती बहरली पाहिजे, या उद्देशाने त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, असे सचिन पाटील यांनी सांगितले.

धोम-बलकवडीचा कालवा परिसरातून गेला असला तरी नाईकबोमवाडी परिसरातील अनेक गावांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नव्हता. या भागातील तब्बल नऊ गावे पाण्यापासून वंचित राहिली होती. या प्रश्नाची दखल घेत बंदिस्त पाइपलाइन वितरण व्यवस्था मंजूर करून घेण्यात आली असून या योजनेमुळे सुमारे २,३०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पामुळे परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. दुष्काळी भागातील शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, सातारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे आणि यशवंत कारंडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धोम-बलकवडी उजवा कालवा किलोमीटर १२८ ते १४७ या टप्प्यातील बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेच्या भूमिपूजनामुळे नऊ गावांच्या पाणीप्रश्नाच्या सोडवणुकीला नवी दिशा मिळाली असून, येत्या काळात नाईकबोमवाडी परिसराच्या कृषी आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments