समता नगर, विडणी येथे वर्षावास प्रवचन मालिकेतील पाचवे पुष्प; आयु. अविनाश अहिवळे यांचे प्रतिपादन
फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व व भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका माजी कार्यकारिणी यांच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील पाचवे पुष्प समता नगर, विडणी येथे संपन्न झाले. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण विभागाचे अभियंता आयु. अविनाश अहिवळे यांनी ‘देशाच्या जडणघडणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान’ या विषयावर प्रवचनातून बाबासाहेबांच्या राष्ट्रनिर्मितीतील बहुआयामी योगदानाचा सविस्तर आढावा घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य केवळ भारतीय संविधान निर्मितीपुरते मर्यादित नसून, सामाजिक न्याय, शिक्षण, जलसंपदा, विद्युत, औद्योगिक विकास, कामगार कल्याण, महिला हक्क आणि लोकशाही या विविध क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान आधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे आयु. अहिवळे यांनी सांगितले.
बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या विविध संस्था व त्यांच्या उद्दिष्टांची माहिती देताना त्यांनी शोषित, वंचित व पीडित समाजाच्या उद्धारासाठी तसेच महिलांच्या हक्कांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळावर असताना त्यांनी जलसंपदा व ऊर्जा विकासासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकताना दामोदर, कोसी व सोन नदी खोरे प्रकल्प, जलविद्युत निर्मिती, विद्युत ग्रीड व्यवस्था आणि राष्ट्रीय ऊर्जा नियोजन यामध्ये बाबासाहेबांची दूरदृष्टी स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.
कामगारांच्या हक्कांसाठी केलेल्या कायदेशीर तरतुदी, महिला सक्षमीकरणासाठी घेतलेली भूमिका तसेच भारतीय संविधानाच्या माध्यमातून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना दिलेले अधिष्ठान याबाबतही त्यांनी विवेचन केले. महाड चवदार तळे सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन आणि अस्पृश्यतेविरुद्धच्या विविध संघर्षांचा संदर्भ देत बाबासाहेबांचा लढा हा केवळ एका समाजासाठी नव्हे, तर मानवी प्रतिष्ठा व सामाजिक न्यायासाठीचा व्यापक संघर्ष होता, असे अहिवळे यांनी स्पष्ट केले.
BSI मिशन 25 अंतर्गत गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार
यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या BSI मिशन 25 अंतर्गत गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मंथन व एमटीएस परीक्षेत यश मिळविल्याबद्दल आरोही व अपेक्षा यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या गुरुकुल प्रकल्पाच्या समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल आयुष्यमान विठ्ठल निकाळजे सर यांचा, तर मार्गदर्शनाबद्दल आयुष्यमान सोमीनाथ घोरपडे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष महावीर भालेराव सर, माजी सरचिटणीस बाबासाहेब जगताप सर, माजी कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे सर, संघटक आनंद जगताप तसेच प्रवचनकार आयु. अविनाश अहिवळे उपस्थित होते.
वर्षावास प्रवचन मालिकेच्या माध्यमातून बुद्धांचा धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, सामाजिक समता, विवेकवाद आणि संविधानिक मूल्यांचा जागर करण्याचा प्रयत्न सुरू असून, या प्रवचनाला समता नगरमधील बौद्ध उपासक-उपासिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या शेवटी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी कोषाध्यक्ष आयुष्यमान विठ्ठल निकाळजे सर यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांचं ‘चांदण्याची छाया’ हे अतिशय सुंदर असे भीम गीत सादर करून वातावरण मंत्रमुग्ध केले.
