Thursday, September 10, 2026
Homeमहाराष्ट्रचिखली-कुदळवाडीत अनधिकृत बांधकामांवर पालिकेची धडक कारवाई; दगडफेकीत १९ जण जखमी

चिखली-कुदळवाडीत अनधिकृत बांधकामांवर पालिकेची धडक कारवाई; दगडफेकीत १९ जण जखमी

पिंपरी | प्रतिनिधी. पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली, कुदळवाडी आणि पवारवस्ती परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात मंगळवारी (दि. ९) पहाटे मोठी कारवाई केली. कडक पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मशीद, मंदिरासह एकूण ११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. मात्र, कारवाईदरम्यान स्थानिकांनी विरोध करत दगडफेक केल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या घटनेत १८ पोलीस कर्मचारी आणि एका नागरिकासह एकूण १९ जण जखमी झाले.
महापालिकेच्या ‘क’ व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सुमारे २८ हजार चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा कारवाईत सहभागी होता. सुरक्षेच्या दृष्टीने घटनास्थळी चार अग्निशमन वाहने आणि दोन रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
अनधिकृत बांधकामांबाबत शून्य सहनशीलता : आयुक्त
शहरातील अनधिकृत बांधकामांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला. कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहतील. नागरिकांनी कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिकांचा विरोध, दगडफेक
पालिकेकडून वारंवार याच परिसरात कारवाई केली जात असल्याचा आरोप करत काही स्थानिकांनी कारवाईला विरोध दर्शविला. यावेळी झालेल्या गोंधळात दगडफेक झाली. जखमी झालेल्या पोलीस कर्मचारी व नागरिकांवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अनधिकृत धार्मिक स्थळांवरही कारवाई सुरू राहणार
महापौर रनी लांडगे यांनी सांगितले की, कारवाईदरम्यान काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. शहरातील इतर अनधिकृत धार्मिक स्थळे आणि बांधकामांवरही नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उल्लेखनीय म्हणजे, २०२५ मध्ये याच परिसरातील चार हजारांहून अधिक अनधिकृत गोदामांवर महापालिकेने कारवाई केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी चार अनधिकृत प्रार्थनास्थळांवरही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे सातत्याने याच भागाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments