Thursday, September 10, 2026
Homeसाताराप्रेमसंबंधासाठी अभियंता पतीचा काटा; पत्नी, प्रियकर आणि साथीदाराचा थरारक कट उघडसाडी खरेदीतून...

प्रेमसंबंधासाठी अभियंता पतीचा काटा; पत्नी, प्रियकर आणि साथीदाराचा थरारक कट उघडसाडी खरेदीतून झालेली ओळख ठरली जीवघेणी; कराड पोलिसांनी अवघ्या सहा तासांत उकलला खुनाचा गुन्हा

कराड | प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने रचलेला थरारक खुनाचा कट कराड शहरात उघडकीस आला आहे. अभियंता लक्ष्मण मंडले यांच्या हत्येप्रकरणी पत्नी सारिका मंडले, तिचा कथित प्रियकर प्रथमेश थोरात, त्याचा मित्र आकाश होनसूरे आणि सारिकाचा भाऊ संग्राम चव्हाण यांना अटक करण्यात आली असून या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये सारिका मंडले यांची कार्वे नाका परिसरातील साडी विक्रेता प्रथमेश थोरात याच्याशी ओळख झाली. साड्यांच्या खरेदीदरम्यान झालेली ही ओळख पुढे मोबाईल संपर्क, व्हॉट्सअॅप चॅटिंग आणि नंतर प्रेमसंबंधांपर्यंत पोहोचली. वयाचे अंतर दुर्लक्षित करून दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.
दरम्यान, लक्ष्मण मंडले हे ठाण्यात अभियंता म्हणून कार्यरत होते. ते सुट्टीच्या दिवशी कराडला येत असत. मात्र पती-पत्नीमधील मतभेद वाढत असल्याने सारिका पतीपासून दुरावत गेली. प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याचे तिने प्रियकराला सांगितले आणि त्याला संपविण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
महिनाभरापासून सुरू होते नियोजन
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खुनाचा कट सुमारे महिनाभरापूर्वीच आखण्यात आला होता. प्रथमेश थोरात याने आपला मित्र आकाश होनसूरे याला या कटात सहभागी करून घेतले. खून करण्यासाठी तब्बल तीन लाख रुपयांची व्यवस्था करण्यात आल्याचेही समोर आले आहे. अपघाताचा बनाव रचून कारने चिरडून हत्या करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी स्वतंत्र अल्टो कार खरेदी करण्यात आली होती.
लाईव्ह लोकेशनवरून ठेवली हालचालींवर नजर
५ जून रोजी लक्ष्मण मंडले ठाण्याहून कराडकडे रवाना झाले. ही माहिती त्यांनी स्वतः पत्नीला दिली होती. त्यानंतर सारिकाने ती माहिती प्रियकराला पुरवली. पती कुठे पोहोचले याची माहिती मिळवण्यासाठी ती सतत संपर्कात होती. पोलिसांच्या मते, हा संपर्क काळजीपोटी नसून त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी होता.
पहाटे सुमारे ५.२० वाजता लक्ष्मण मंडले कोल्हापूर नाका परिसरात उतरून घराकडे पायी जात असताना दबा धरून बसलेल्या आरोपींनी कारने त्यांना जोरदार धडक दिली. ते वाचण्याची शक्यता राहू नये म्हणून कार पुन्हा रिव्हर्स घेऊन त्यांच्या अंगावरून घालण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून उघड झाला कट
सुरुवातीला हा अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना संशय आला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा बदलली. संशयाची सुई पत्नी सारिकाकडे वळल्यानंतर पोलिसांनी चौकशीचा फास आवळला आणि संपूर्ण कट उघडकीस आला.
भावाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
या प्रकरणात सारिकाचा भाऊ संग्राम चव्हाण यालाही अटक करण्यात आली आहे. बहिणीचे कथित प्रेमसंबंध असताना भाऊ या कटात कसा सहभागी झाला, याबाबत पोलिस तपास सुरू आहे. कौटुंबिक वाद किंवा इतर काही कारणे सांगून त्याला या कटात सामील करण्यात आले का, याचा शोध घेतला जात आहे.
पोलिस निरीक्षकांचे वक्तव्य
कराड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी सांगितले की, हा साधा अपघात नसून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेला खून आहे. आरोपींनी महिनाभरापासून कट रचला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या सहा तासांत मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. गुन्हेगार कितीही चलाखीने कट रचला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, हे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
विश्वासघाताची शोकांतिका
प्रेमसंबंधासाठी रचलेल्या या कटात एका अभियंता पतीचा जीव गेला, तर पत्नी, प्रियकर आणि त्यांचे साथीदार तुरुंगात पोहोचले. एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या घटनेने समाजमन हादरले असून विश्वासघाताच्या या कथेला कराडमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments