Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रडायरीची पाने: ...अन् शेवट गोड झाला!

डायरीची पाने: …अन् शेवट गोड झाला!

[ad_1]

इंद्रजित भालेराव4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सहा परळ्या, सहा झाकण्या एका फडक्यात नीट बांधून ठेवल्या. आजी म्हणाली, ‘आताच कशाला शाळेत घेऊन जातोस? शाळा सुटल्यावर ये आणि घेऊन जा…’

आज आपण घरात प्रामुख्यानं स्टेनलेस स्टीलची भांडी वापरतो. पण, काही काळापूर्वी स्टील हे वापरात नव्हतंच. त्याआधी घरात बहुतेक पितळेची भांडी असत. काही तांब्याचीही असत. पण, तांबे पितळेपेक्षा महाग असल्यामुळं घरातली बहुतेक भांडी पितळेची असत. माझ्या लहानपणी स्टेनलेस स्टीलचं एकही भांडं आमच्या घरात नव्हतं. पितळेची ताटं, वाट्या आणि पेले थोड्या फार प्रमाणात होते. पण, जास्तीत जास्त वापरली जायची, ती मातीची म्हणजे खापराची भांडी. तेव्हा आमच्या घरात मातीची भांडी भरपूर वापरात होती. खेड्यापाड्यात पूर्वी हीच भांडी वापरली जात. त्यांचे इतके प्रकार होते की, दासोपंतांसारख्या पंडित कवीने पाणी साठवण्याच्या मातीच्या भांड्यांना मराठीत असलेल्या अठ्ठावीस नावांची यादी दिली आहे. केवळ पाणी साठवण्याच्या भांड्याचे इतके प्रकार होते. मातीची अशी कितीतरी प्रकारची भांडी होती. मातीची भांडी वापरणं हे गरिबीचं लक्षण असलं, तरी दासोपंतांनी ही जी यादी दिली होती, ती मराठी भाषेची श्रीमंती सांगण्यासाठी. एकेकाळी गावगाड्यात कुंभार बांधव हेच सगळ्यात मोठे भांड्यांचे कारखानदार होते.

ही अगदी पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सार्वजनिक पंगतीतही ग्लास, ताट, वाट्या नव्हत्या. मातीचीच ताटं असायची, त्यांना ‘परळी’ म्हणायचे. त्यांचा आकार जास्त मोठा असेल, तर ‘परळ’ म्हटलं जायचं. मातीचीच वाटी असायची, तिला ‘झाकणी’ असं म्हटलं जायचं. लहानपणी मी नेहमीच परळीत आणि झाकणीत जेवलो आहे. शेतात एक बिनगी, एक झाकणी आणि एक परळी नेहमीच ठेवलेली असायची. घरून बांधून नेलेली भाकर त्या परळीत सोडून खायची. झाकणीनं बिनगीतलं पाणी प्यायचं. ती बिनगीवर झाकायला उपयोगी पडायची, म्हणूनच तिला झाकणी म्हणायचे. ती जड असल्यामुळं वारं आलं तरी उडून जात नसे. पाण्याची बिनगी उघडी पडत नसे. जड असल्यामुळं कावळा तिला सहज लोटू शकत नसे. ही झाकणी भाजी खाण्यासाठीही वापरली जायची. आजूबाजूला काही नसेल, तर याच झाकणीत दूध काढून चहाही करता येत असे. गाडगेबाबांच्या डोक्यावर नेहमीच जे खापर दाखवलं जायचं, ती झाकणीच असायची. गाडगेबाबा तिचा उपयोग भिक्षा मागण्यासाठी, नंतर जेवण्यासाठी, नंतर पाणी पिण्यासाठी आणि नंतर टोपी म्हणून डोक्यावर ठेवण्यासाठी करायचे.

मी लहानपणी आजोळी शिकायला होतो. माझ्या गावापासून तीन किलोमीटरवरचं आहेरवाडी नावाचं हे गाव होतं. एकदा असाच मृगाचा पाऊस सुरू झाला. आमची शाळा नुकतीच सुरू झाली होती. मी आठ- नऊ वर्षांचा असेन तेव्हा. आम्ही आठ-दहा मुलं गावावरून सोबतच जात-येत असू. रसाळीचे दिवस होते. घरातली सगळी पितळेची भांडी रसाने कळकून जायची. त्यामुळं रस खाण्यासाठी झाकण्या आणि परळ्या लागायच्या. म्हणून मग मला आईनं सांगितलं.. ‘आज आहेरवाडीहून येताना सहा झाकण्या आणि सहा परळ्या घेऊन ये. त्या आधी दुपारी आजीकडं जा आणि तिला घेऊन कुंभाराकडं जा. आजी तुला परळ्या, झाकण्या घेऊन देईल. त्या घेऊन शाळेत ये आणि शाळा संपल्यावर डोक्यावर नीट घेऊन घरी ये. रस्त्यानं फुटणार नाहीत, याची काळजी घे..’ सांगितल्याप्रमाणं मी दुपारच्या सुटीत जेवण करून आजीकडं गेलो.

तिला घेऊन कुंभाराकडं आलो. खरं तर कुंभारदादाचं घर आमच्या शाळेपासून जवळ होतं. आजीचं घर खूप दूर होतं. पण, मला झाकण्या, परळ्या पारखून देण्यासाठी कुणा वडीलधाऱ्या माणसाची गरज होती. त्याप्रमाणं दुपारी आजी माझ्यासोबत आली. तिनं कुंभारदादाला झाकण्या, परळ्या दाखवायला सांगितलं. आपल्या बोटाच्या टिचकीनं आजीनं परळ्या, झाकण्या वाजवून पाहिल्या. ज्यांचा टन.. टन.. असा आवाज आला, त्या बाजूला काढल्या.

सहा परळ्या, सहा झाकण्या एका मोठ्या फडक्यात नीट बांधून ठेवल्या आणि आजी मला म्हणाली, ‘आताच कशाला शाळेत घेऊन जातोस? शाळा सुटल्यावर ये आणि घेऊन जा.’ त्याप्रमाणं कुंभारदादाच्या घरीच ते फडक्यात बांधलेलं गाठोडं ठेवून दिलं. मी शाळेत आलो. आभाळ भरून आलेलं होतं. शाळा सुटेपर्यंत हळूहळू थेंब पडायला सुरूवात झाली. त्यामुळं शाळा सुटल्यावर मुलं थांबायला आणि माझ्यासोबत कुंभाराकडं यायला तयार नव्हती. सगळे जण पावसाच्या भीतीनं पळत गावाकडं निघाले. मला तर कुंभाराच्या घरी जाणं भाग होतं. त्यामुळं मी एकटाच तिकडं गेलो. ते ओझं डोक्यावर घेऊन गावाबाहेर रस्त्याला लागलो. तोपर्यंत सारी मुलं दूर निघून गेली होती. मी सहा झाकण्या आणि सहा परळ्यांचं माझ्या वयाच्या मानानं बऱ्यापैकी असलेलं ओझं घेऊन निघालो. ती सगळी भांडी मातीची असल्यामुळं जाडजूड असत. त्यांचं वजनही बऱ्यापैकी असे. काखेला दप्तर आणि डोक्यावर हे गाठोडं घेऊन मी निघालो.

डोक्यावरचं हे ओझं नाजूक असल्यामुळं मला पळताही येत नव्हतं. पळालो आणि ठेच लागून पडलो, तर सगळीच्या सगळी भांडी चकणाचूर होण्याची भीती होती. म्हणून मी आपला सावध पावलं टाकीत घराकडं निघालो. शिवेपर्यंत कसाबसा आलो आणि अचानक झाकोळून आलं. एकदम अंधार पडला. मागे – पुढे पाहतो तर कोणीच दिसेना. आजूबाजूला कुणाची झोपडी किंवा आखाडाही नव्हता. मी आपला कचाकचा वाट तुडवत सारखा चालतच होतो. आणि अचानक पावसानं झोडपायला सुरबवात केली. विजा कडाडू लागल्या. अशावेळी कुठल्याही झाडाखाली थांबू नये, असं लहानपणापासून सांगण्यात आलं होतं. झाडाखाली थांबलो तर झाडावर वीज पडू शकते, म्हणून झाडाखाली थांबलो नाही. मी आपला पावसानं झोडपताना चालतच राहिलो.

डोक्यावरच्या परळ्या आणि झाकण्या पावसानं भिजून, त्यात पाणी मुरल्यामुळं आणखी जड झाल्या होत्या. ओढ्याजवळ येईपर्यंत ओढ्यालाही गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं होतं. तसाच चिखला – पावसात, हे सगळं पार करत अन् देवाचं नाव घेत मी शेवटी कसाबसा घरी आलो. पुस्तकं प्लास्टिकच्या पिशवीत घालून दप्तरात ठेवली होती. ती पावसाच्या तडाख्यातून कशीबशी वाचली. तोपर्यंत अंधार पडून गेला होता. घरी सगळे माझी वाटच बघत होते. सगळ्यांना चिंता वाटत होती. मी आल्यावर सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. कपडे काढून मला हातपाय धुवायला लावले. दुसरे कपडे घातले. झाकण्या आणि परळ्या आईनं स्वच्छ धुऊन घेतल्या. लगेच मला जेवायला वाढलं. सगळा शीणभाग निघून जावा, असं जेवण माझ्या समोरच्या परळीत आईनं वाढलेलं होतं. परळीत पुरणाच्या पोळ्या आणि झाकणीत आंब्याचा रस होता. हे जेवण माझं सगळ्यात आवडतं होतं, त्याचा आस्वाद जणू माझ्यासाठी स्वर्गीय आनंद होता. माझ्या कष्टाचा असा शेवट गोड झाला होता.

(संपर्कः inbhalerao@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments