रसिक स्पेशल: येऊ दे बरकत पेरणीला!

0
20
रसिक स्पेशल:  येऊ दे बरकत पेरणीला!


समीर गायकवाड10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पर्जन्याच्या पावलांनी निसर्ग नवी स्वप्नं पेरायला सिद्ध झालाय. मग आता आपल्या भौतिक जगातही सुखी, शांत-संपन्न समाजासाठी नव्या, सर्वसमावेशक राजकीय इच्छाशक्तीची, विचारधारेची पेरणी व्हायला हवी. तसे झाले तर लोकशाहीचे पीकही तरारून येईल.

यंदाचा उन्हाळा अत्यंत प्रखर होता. उकाड्याने जिवाची घालमेल होत होती. दिवसा घराबाहेर फिरणे असह्य झाले होते. ग्रामीण भाग असो की शहरी; सगळीकडे उन्हाचा तडाखा होता. नद्यांचे प्रवाह कोरडे पडले, कित्येक धरणं रिकामी होण्याच्या स्थितीत आली. दुपार तप्त कोरड्या हवेची असे नि धग टिकून असणारी संध्याकाळ अंधार उरात घेऊन येई. किमान सकाळी तरी थोडी शीतलता असावी, असं राहून राहून वाटायचं. पण, ते सुखही नशिबी नव्हतं. केवळ मध्यरात्रीचे काही तास वगळता दिवसभर उष्म्याची काहिली होती. माणसालाच याची झळ बसली, असेही नव्हते.

आख्खे चराचरच जणू होरपळून निघाले होते. निळे, निरभ्र आकाश आणि पूर्ण ताकदीने आग ओकणारा सूर्य हेच चित्र गेले तीन महिने देशभर दिसत होते. या उन्हाळ्यातली धग काहीशी वेगळीच होती. माणसं म्हणत की यंदाचा उन्हाळा काही वेगळाच आहे, थोडं उन्हात गेलं तरी पोळून निघतंय! पण, या काळात एवढीच धग आपल्या देशात नव्हती. आणखी एक ‘हीट वेव्ह’ आपल्याकडं सुरू होती. ती म्हणजे निवडणुकांच्या धामधुमीची लाट! गेले अडीच महिने आपल्या देशात निवडणुकांचा धुरळा उडाला होता. सभा, बैठका, पत्रकार परिषदा, वाद – प्रतिवाद, आश्वासने नि त्यांची पोलखोल, वृत्तवाहिन्यांवरची भांडणे नि जिकडे तिकडे सुरू असलेल्या राजकारणाच्या गप्पा यांमुळे साऱ्या वातावरण वेगळ्याच ज्वराने तापले होते. बाहेर निसर्गाच्या तप्त झळा आणि अंतर्बाह्य शेकून काढणारा निवडणुकीचा मोसम असा एक वेगळाच सिलसिला साऱ्या देशाने या निमित्ताने अनुभवला.

राजकारणी लोकांच्या भाषणांनी देश ढवळून निघाला. काही ठिकाणी सामाजिक सलोख्याचे पापुद्रे खरवडून निघाले, तर काही वक्तव्यांतून विषमतेचे विखार पसरले. वेगवेगळ्या अस्मितांचे दंभ कुरवाळले गेले, भिन्न पद्धतीने विभाजन करण्याकडे नि त्यायोगे आपली मतपेढी घट्ट करण्याचे घाट घातले गेले. जाती-धर्मभेदाच्या भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न केला गेला. आरोप – प्रत्यारोपांची राळ उडवली गेली. एकमेकांचा आब न राखता अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका-टिप्पणी केली गेली. धनसंपत्तीची लयलूट झाली. मते मिळावीत म्हणून सामान्य मतदारांना असंख्य आमिषे दाखवली गेली. आपणच जनतेचे तारणहार आहोत, हे सिद्ध करण्यासाठी समोरच्याचे वस्त्रहरण करण्याच्या नादात अनेकदा आपलेच कपडे फाडून टाकण्याचे प्रकारही घडले.

वय, ज्येष्ठता, योग्यता, व्यासंग, बुध्दिमत्ता, पात्रता आणि कुवत यांचा विचार न करता कुणीही कुणावरही तुटून पडत होते. सोशल मीडियाच्या बोलभांड चावडीवर तर अक्षरशः सुंदोपसुंदी माजली होती. राजकीय प्रवक्ते भान सुटल्यासारखे वागत होते नि शीर्ष पातळीवरच्या नेत्यापासून ते गल्लीतल्या पुढाऱ्यापर्यंत अनेकांच्या जिभा घसरत होत्या. सारे वातावरण एकदम कलुषित नि कोलाहलग्रस्त झाले होते. चराचरात उन्हाची जीवघेणी भाजणी आणि भौतिक जगात निवडणुकीची असह्य कराल घुसळण यांमुळे अनेकांना हा काळ अगदीच अंगावर येणारा असा वाटला, तर त्यात नवल ते काय! पण, हे चित्रही चिरंतन नसते. त्यात बदल होत असतातच. हरेक रात्र कधी न कधी सरते आणि नव्याने सूर्य उगवतो, नव्या उमेदीने नवा उष:काल होतो. आशेची पालवी पल्लवित करणारा नवा प्रकाश प्रत्येकाच्या अंगणात येतो, तेव्हा गेलेल्या दिवसाचे मळभ नकळत गळून पडते. तद्वतच हे दिवसही मागे पडतील, अशीच साऱ्यांना आशा आहे.

ही आशा म्हणजे केवळ दिवास्वप्ने नव्हेत. निसर्गाचे परिवर्तन चक्र अव्याहतपणे फिरत असते. ऋतुचक्र हा त्याचाच भाग होय. एव्हाना उन्हे सरलीत. आता पाऊस जोर धरेल नि पावसाचे दिवस संपताच थंडी अवतरेल. थंडीला कवेत घेण्यासाठी उन्हे पुन्हा अवतरतील.. हे चक्र सतत येत राहील. भौतिक जगाचेही अगदी तसेच आहे. कधी एका विचासरणीची सरशी होते, तर विरोधात असणाऱ्या विचारधारेलाही कधी कधी चांगले दिवस येतात. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणताही पक्ष, कोणताही विचार वा कोणतीही व्यक्ती जन्माला आलेली नसते, याचे भान काळाला असते. मात्र, मानवी समुदायाला ते असेलच असे नाही. त्यामुळे अहंकार, उन्मत्तता नि अनिर्बंध अधिकाराचे डोहाळे लागतात, जे पुढे जाऊन कधी ना कधी ध्वस्त होतात. हे देखील एक चक्र आहे, जे आपल्या नकळत वर्षानुवर्षे, शतकानुशतके फिरते आहे. आताचा काळही याला अपवाद असू शकत नाही. सगळीकडे असलेली अस्वस्थता नक्कीच लयाला जाईल नि सुखाचे, शांतीचे, सामंजस्याचे, प्रेमाचे, सौहार्दतेचे दिवस येतील. समता, बंधुता, स्वातंत्र्याचे ध्वज दिमाखात फडकत राहतील. असेच आनंददायी बदल चराचरातही घडतील. पण, यात एक मेख आहे. ऋतुचक्रातील बदल निसर्ग स्वतःच घडवून आणतो. माणसाला मात्र आपल्या अधिभौतिक जगातल्या परिवर्तनासाठी काही अंशी का होईना, पण स्वत: झटावे लागते.

जसे माणसाचे गाऱ्हाणे होते, तसे ऊन-पावसाचेही होते. उन्हे सरत नव्हती नि पावसाचे आगमन लांबत होते. पण, गेल्या दोनेक दिवसांपासून चित्र बदलतेय. होय – नाही म्हणत म्हणत अखेर ढगांमधले भांडण संपले. बऱ्याच काळापासूनचा अबोला मिटलाय अन् आता त्यांचं मनोमिलन झालंय. त्यांच्या मिलनासाठी आसुसलेल्या विजा रोषणाई करताहेत. बघता बघता या जलार्द्र ढगांच्या मिलनाला धुमारे फुटले अन् पावसाचा जन्म झाला. पर्जन्याचे थेंब ढगांमधून अगदी नाचत नाचत बाहेर पडलेत. या नाचऱ्या थेंबांना वारा आपल्या झोक्यावर मनमोकळे झुलवतोय. हवेतल्या धुलिकणांनी त्या थेंबांना मायेने ‘गंध-पावडर’ लावलीय. इथं धरतीवर कासावीस झालेल्या सगळ्या भूमिपुत्रांनी आपल्या डोळ्याच्या घंगाळात हे थेंब अलगद झेललेत. त्यामुळं त्यांच्या डोळ्यातलं पाणी आणखीनच खारं झालंय. गावाकडं माहेरवाशिणीसारखं डोळ्यात पाणी आणून पावसाचं स्वागत होतंय. तुलनेने शहरातला पाऊस तसा अरसिक. त्याचं स्वतःच असं काही वेगळेपणच नाही. तो कधी असा मनाशी गुजगोष्टीही करत नाही. तो देखील शहरी झालाय. तोंडदेखलं पडून जातो. त्याच्यात कोसळण्याची विशेष उर्मी अशी नसतेच. येतो आणि पडून जातो. या शहरी भागात मॉन्सून वगैरे नावानं त्याचं रुक्ष वर्णन होत राहतं. गावात पाऊस आला की, पांडुरंगाला दह्यादुधाचा अभिषेक होतो. घरी काही तरी गोडधोड होतं. घरधनी धोतराच्या सोग्याला डोळे पुसत पुसत आभाळाकडं बघून काहीबाही पुटपुटतो. त्याचं ते पुटपुटणं एखाद्या अभंगाच्या ओवीसारखं असतं…

पावसाच्या आगमनानं निसर्ग अशी कूस बदलतोय. त्यामुळं भौतिक जगातील आपण साऱ्यांनीही आता निवडणुकीत वाढलेल्या राजकारणाच्या गर्मीतून बाहेर पडत नव्या वाटेवर पावलं टाकली पाहिजेत. गाव-शिवारातील नांगरुन ठेवलेली शेतं नवं पीक फुलवण्यासाठी सज्ज झालीत. आपण साऱ्यांनीही आता राजकीय द्वेषाचा वाफसा बाहेर काढून चांगल्या भविष्यासाठी मनाची मशागत केली पाहिजे. मनाच्या मातीमध्ये प्रगतीच्या, संपन्नतेच्या, भरभराटीच्या स्वप्नांची बीजे पेरायला हवीत. अशोक कोळी यांच्या ‘धूळपेरणी’ या कवितेच्या ओळी इथं आठवताहेत…

असो बरकत

धूळपेरणीला

लागला मातीचा

जीव झुरणीला…

पर्जन्याच्या पावलांनी निसर्ग नवी स्वप्नं पेरायला सिद्ध झालाय. मग आता आपल्या भौतिक जगातही सुखी, शांत-संपन्न समाजासाठी नव्या, सर्वसमावेशक राजकीय इच्छाशक्तीची, विचारधारेची पेरणी व्हायला हवी. तसे झाले तर लोकशाहीचे पीकही तरारून येईल. त्यासाठी मातीप्रमाणेच आपल्या जनसमूहाचाही जीव झुरणीला लागलाय. म्हणून निर्मिकाला एकच मागणे.. अंतरीचे द्वेष गाडू देत धरणीला, येऊ दे बरकत पेरणीला !

(संपर्कः sameerbapu@gmail.com)



Source link