Sunday, September 13, 2026
Homeफलटणआयु. विठ्ठल निकाळजे व आयुनि छाया गायकवाड यांचा कृतज्ञता गौरव मानपत्र प्रदान...

आयु. विठ्ठल निकाळजे व आयुनि छाया गायकवाड यांचा कृतज्ञता गौरव मानपत्र प्रदान सोहळा संपन्न

आयु. विठ्ठल निकाळजे व आयुनि छाया गायकवाड यांचा कृतज्ञता गौरव मानपत्र प्रदान सोहळा संपन्न

आयु. विठ्ठल निकाळजे व आयुनि छाया गायकवाड यांचा कृतज्ञता गौरव मानपत्र प्रदान सोहळा संपन्न
फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याची माजी कार्यकारिणी व भारतीय बौद्ध महासभा परिवार (BBM Family) यांच्या वतीने आयुनि छाया राजेंद्रकुमार गायकवाड मॅडम व आयु. विठ्ठल बाबुराव निकाळजे सर यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला कृतज्ञता गौरव मानपत्र प्रदान सोहळा फलटण येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तींना कृतज्ञता गौरव मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात शुभेच्छा व्यक्त करताना भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी पदाधिकारी धम्ममित्र आयु. सतीश कांबळे म्हणाले, “हा गौरव सोहळा आपल्या संपूर्ण आयुष्याचा मोठा कालखंड शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित करणाऱ्या आणि अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविणाऱ्या शिक्षणमहर्षींचा आहे. त्यांना पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आता त्यांनी मनसोक्त, मनमोकळे व स्वच्छंदी जीवन जगावे. ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ या उक्तीप्रमाणे मौनामध्ये मोठी शक्ती असते आणि ती विपश्यनेतून प्राप्त होते. म्हणून विपश्यना साधना करून आनंदी जीवन जगावे. भगवान बुद्धांच्या धम्मविचारांकडे जाण्यासाठी तोच एक राजमार्ग आहे.”

भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आज आपण ज्यांचा सन्मान करीत आहोत, ती दोन्ही कुटुंबे धम्माच्या विचारांनी समाजप्रबोधनाची परंपरा जपणारी आहेत. आदरणीय छाया गायकवाड मॅडम यांना त्यांचे वडील स्वर्गीय आर. टी. रणवरे यांच्या विचारांचा वारसा लाभला असून त्या शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक चळवळींमध्ये कायम सक्रिय राहिल्या आहेत. तसेच आयु. विठ्ठल निकाळजे सर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून तब्बल ३१ वर्षे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावली. अनेक विद्यार्थ्यांना घडविले, शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला व विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. या दोन्ही कुटुंबांचा धम्म चळवळीतील सहभाग प्रेरणादायी असून भविष्यातही ते धम्मकार्यामध्ये सक्रिय राहतील, असा विश्वास आहे.”

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक, समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तसेच सातारा व पुणे जिल्हा प्रभारी आयु. दादासाहेब भोसले यांनी केंद्र व राज्याच्या वतीने शुभेच्छा देताना सांगितले की, “अनेक जण सेवानिवृत्तीनंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये रमून जातात; मात्र या दोन्ही सत्कारमूर्तींनी आपल्या उज्ज्वल शैक्षणिक कारकिर्दीसोबतच भारतीय बौद्ध महासभेच्या धम्मकार्यामध्ये सक्रिय योगदान दिले आहे. भविष्यातही ते फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेतील, याची खात्री आहे.”

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी संस्कार उपाध्यक्ष आयु. बजरंग गायकवाड सर यांनी आपल्या मनोगतात दोन्ही सत्कारमूर्तींना पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी जीवनातील प्रत्येक संकटाचा सामना तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्मविचारांच्या आधाराने करावा, धम्मकार्याशी निष्ठा कायम ठेवावी तसेच जगातील विविध बौद्ध राष्ट्रांना भेटी देत आनंदी, समाधानी आणि अर्थपूर्ण जीवन जगावे, असे मार्गदर्शन केले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप सर यांनी दोन्ही सत्कारमूर्तींना शुभेच्छा देत कृतज्ञता गौरव मानपत्राचे वाचन केले. त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक, शैक्षणिक व धम्मकार्यामध्ये सक्रिय राहून समाजासाठी प्रेरणादायी कार्य करावे तसेच निरोगी, सुखी व समाधानी आयुष्य लाभावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

सत्काराला उत्तर देताना आयु. विठ्ठल निकाळजे सर म्हणाले, “या सत्काराने मी भारावून गेलो आहे. माझ्या संपूर्ण ३१ वर्षांच्या कारकिर्दीत माझी पत्नी व माझी मुले कायम माझ्या सोबत राहिली आहेत. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर जगण्याची प्रेरणा मला आयुष्यमान दादासाहेब भोसले यांच्याकडून मिळाली. आम्हीही जुन्या परंपरांमध्ये अडकलो होतो; परंतु त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही धम्म चळवळीमध्ये सक्रिय झालो. येणाऱ्या काळामध्ये बौद्ध स्थळांना भेटी देणे, विपश्यना करणे आणि धम्म चळवळीमध्ये सक्रिय योगदान देण्याचा माझा मनोदय आहे. या सत्काराबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे.”

आयुनि छाया राजेंद्रकुमार गायकवाड म्हणाल्या, “हा सत्कार माझ्यासाठी खूप खास आहे. तुम्ही सर्वांनी इतक्या आपुलकीने व प्रेमाने आमच्या घरी येऊन केलेला हा सत्कार मनाला भावणारा आहे. तुम्ही आमच्या कुटुंबावर दाखवलेले प्रेम निश्चितच आम्हाला नवी ऊर्जा देणारे आहे. या सत्काराबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. येणाऱ्या काळात आपल्या सर्वांसोबत धम्म चळवळीमध्ये सक्रिय सहभागी होऊन बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर चळवळ अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न करणार आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व बौद्ध पद्धतीने विधी संचालन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव यांनी केले. त्यांनी सत्कारमूर्तींच्या कुटुंबियांचे धम्म चळवळीतील योगदान अधोरेखित करत भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रसार व प्रचार करण्यामध्ये भविष्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच दोघांनाही उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, कौटुंबिक सुख-समृद्धी आणि आनंदमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक तथा समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर, सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी आयु. दादासाहेब भोसले, सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव, माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप, माजी कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे, माजी संस्कार उपाध्यक्ष आयु. बजरंग गायकवाड, संस्कार सचिव आयु. अमोल भोसले, माजी संघटक आयु. अमोल काकडे, माजी संघटक आयु. आनंद जगताप, धम्ममित्र विजयकुमार जगताप, धम्ममित्र सतीश कांबळे, साप्ताहिक साम्राज्य नायकचे संपादक प्रशांत सोनवणे, आयु. विकास गायकवाड (फौजी), माजी प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, माजी कायदेशीर सल्लागार ॲड. चंद्रशेखर मोरे, धम्ममित्र विजय निकाळजे, आयुनि पारिजातका जगताप, आयुनि साळूताई उर्फ भाग्यश्री निकाळजे, आयुनि योगिता घोरपडे तसेच इतर पदाधिकारी, धम्ममित्र, हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments