Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्ररसिक स्पेशल: लोकसभेचा निकाल अन् शहरी - ग्रामीण सत्तास्पर्धा

रसिक स्पेशल: लोकसभेचा निकाल अन् शहरी – ग्रामीण सत्तास्पर्धा

रसिक स्पेशल:  लोकसभेचा निकाल अन् शहरी – ग्रामीण सत्तास्पर्धा

[ad_1]

डॉ. प्रकाश पवार4 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील दोन्ही बाजूच्या राजकीय पक्षांचा जनाधार एक तर शहरी वा ग्रामीण अशा दोन भागांत विभागल्याचे लोकसभेच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. हा पाया अशा विशिष्ट भागात विस्तारणे त्या पक्षांसाठी फायद्याचे असले, तरी ते त्यांच्या विस्तारावर मर्यादा आणणारेही आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बाब प्रत्येक पक्षासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. या निवडणूक काळात महाराष्ट्राचे राजकारण कमालीचे ढवळून निघालेच; शिवाय आपल्याकडील राजकीय पक्षांच्या प्रभाव क्षेत्रांची नव्याने रचना होत असल्याचे दिसून आले. म्हणजे महाराष्ट्राचे हे राजकारण शहरी आणि ग्रामीण अशा दोन स्तरांमध्ये विभागले आहे. शहरी मतदारसंघांमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात सत्तास्पर्धा दिसली, तर ग्रामीण आणि निमशहरी मतदारसंघांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांचा प्रभाव दिसून आला. म्हणजेच, दोन वेगवेगळ्या आघाड्यांचे शहरी आणि ग्रामीण असे दोन आधार दिसून येतात. आणि हेच या निवडणुकीचे एक खास वैशिष्ट्य म्हणून पुढे आले आहे. त्याचवेळी, नेतृत्वाची स्पर्धा देखील जास्त गुंतागुंतीची झालेली दिसते आणि हासुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीतून पुढे आला आहे.

ग्रामीण, निमशहरी भागातील सत्तास्पर्धा

या निवडणुकीने महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि निमशहरी भागातील राजकारणात मोठाच फेरबदल झाला आहे. ग्रामीण भागातील पक्षीय स्पर्धेमध्ये काँग्रेस हा प्रभावशाली पक्ष म्हणून पुन्हा पुढे आल्याचे दिसते. या अर्थाने, महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणातील पक्षीय स्पर्धा बदलली आहे. गेल्या दहा वर्षांत भाजप हा सर्वात जास्त मते आणि जागा जिंकणारा पक्ष होता. या लोकसभा निवडणुकीत भाजपकडील हे स्थान जागांच्या संदर्भात काँग्रेसकडे सरकले आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त जागा जिंकणारा (४८ पैकी १३) पक्ष म्हणून काँग्रेस नव्याने उदयास आला आहे. सांगलीतून अपक्ष म्हणून विजयी झालेल्या विशाल पाटील यांची जागाही तशा अर्थाने काँग्रेसचीच आहे. ‘प्रदेश’ हा घटक काँग्रेसच्या या नवीन विस्ताराचा मुख्य आधार आहे.

● काँग्रेसने रामटेक, भंडारा – गोंदिया, गडचिरोली – चिमूर, चंद्रपूर, अमरावती या जागा जिंकत विदर्भातील आपला सामाजिक आधार पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातूनच या पक्षाने विदर्भात भाजपच्या पुढे नवे आव्हान उभे केले आहे.

● विदर्भाच्या सोबतच मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर आणि जालना या तीन मतदारसंघांतही या पक्षाने दमदार शिरकाव केला आहे. विशेषतः अशोक चव्हाण यांनी पक्षांतर केल्यानंतरही वसंत चव्हाण यांनी नांदेड मतदारसंघ जिंकला.

● उत्तर महाराष्ट्र विभाग हा काँग्रेस पक्षाचा तिसरा आधार बनल्याचे दिसत आहे. कारण नंदुरबार आणि धुळे या दोन जिल्ह्यांमध्ये भाजपचा भौगोलिक विस्तार झालेला असतानाही तेथे काँग्रेसला यश मिळाले. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या तीन प्रदेशांमध्ये मिळून काँग्रेसचे दहा उमेदवार निवडून आले.

● या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा चौथा भौगोलिक आधार ठरल्याचे स्पष्टपणे दिसते. कारण सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या तीन मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत.

● मुंबईसह कोकण हा काँग्रेसचा सर्वात जास्त पोकळ आधार आहे. कारण या विभागातील केवळ उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या निवडून आल्या. तरीही महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागातून काँग्रेसचा एक तरी उमेदवार निवडून आला आहे, हे विशेष.

शहरी भागातील सत्तास्पर्धा :

महाराष्ट्राच्या शहरी भागातील राजकीय प्रक्रिया ग्रामीण भागापेक्षा वेगळ्या पद्धतीने घडली. शहरी भागात शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप अशा मुख्य तीन राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा होती.

● मुंबई आणि मुंबईच्या अवतीभवतीच्या सहापैकी ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या तीन जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाने जिंकल्या. याशिवाय, उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असला, तरी वाद शिल्लक राहिला आहे. उत्तर मुंबई हा एकच मतदारसंघ भाजप जिंकू शकला, तर उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसचा विजय झाला आहे. म्हणजेच थोडक्यात, मुंबईकेंद्रित शहरी भागावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा प्रभाव टिकून राहिला आहे.

● शहरी भागाचा दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे ठाण्याच्या अवतीभवतीचा प्रदेश. ठाणे शहराच्या परिघात एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या समर्थकांचा मोठा प्रभाव आहे. परिणामी या भागातील कल्याण आणि ठाणे या जागा शिवसेनेच्या शिंदे गटाने जिंकल्या. ठाण्याचा प्रभाव रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागापर्यंत पडत गेला. यामुळे तिथे भाजपच्या दोन आणि अजित पवार गटाची एक अशा तीन जागा निवडून आल्या. केवळ भिवंडीची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला मिळाली. एकूणच या विभागात भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद दिसून आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सुनील तटकरे यांची ताकद दिसून आली. म्हणजे कोकणाच्या शहरी भागावर महायुतीचा विशेष प्रभाव पडलेला दिसतो.

● शहरी भागाचा तिसरा टप्पा म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड. पुणे भाजपने आणि मावळ शिवसेनेच्या शिंदे गटाने जिंकले. यामुळे या तिसऱ्या शहरी भागात भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचा प्रभाव दिसतो. शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांचा प्रभाव या तिसऱ्या शहरी भागात पडला नाही.

● चौथ्या प्रकारचा शहरी भाग नाशिक, छ. संभाजीनगर आणि नागपूर हा होता. नागपूर भाजपने आणि छ. संभाजीनगर शिवसेनेच्या शिंदे गटाने जिंकून घेतले, तर नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आला. म्हणजेच, चौथ्या प्रकारच्या शहरी भागात भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटाचाही प्रभाव दिसून आला. परंतु, शहरी भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन पक्षांचा प्रभाव फार दिसून आला नाही. म्हणजेच, शहरी भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांचे सामाजिक आधार अस्थिर स्वरूपाचे आहेत.

नेतृत्वाचीही नवी स्पर्धा

यापूर्वी महाराष्ट्रात असलेल्या नेतृत्वाच्या स्पर्धेचा विचार करता; शरद पवार, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अशा तीन नेत्यांमध्ये ती विशेषत्वाने होती. या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन नेत्यांनी त्यामध्ये भर घातली. यामुळे एकूणच पाच नेत्यांमध्ये सत्तेची अंतर्गत स्पर्धा सुरू झाली. या सत्तास्पर्धेत काँग्रेस हा तुलनेने प्रभावी नेतृत्व नसणारा पक्ष होता. परंतु, नेतृत्व प्रभावी नसतानाही या पक्षाला मतदारांचा सर्वांत चांगला प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वापुढे आव्हान उभे राहिले. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मात्र जनमानसातून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मोठ्या संकटावर मात करून पुढे आले आहे. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व त्यांच्या स्वतःच्या कौशल्यावर टिकून राहिलेले दिसते.

एकूणच, महाराष्ट्रातील दोन्ही बाजूच्या राजकीय पक्षांचा जनाधार एक तर शहरी किंवा ग्रामीण अशा दोन भागांत विभागल्याचे या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. हा पाया अशा विशिष्ट भागात विस्तारणे एका अर्थाने त्या त्या पक्षासाठी फायद्याचे असले, तरी ते त्यांच्या व्यापक विस्तारावर मर्यादा आणणारेही आहे. विशेषत: आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बाब प्रत्येक पक्षासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

(संपर्कः prpawar90@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments