Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रकबीररंग: बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड खजूर...

कबीररंग: बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड खजूर…

कबीररंग:  बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड खजूर…

[ad_1]

हेमकिरण पत्की8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

कबीर म्हणतात, किती सहज असतं आपण कोण आहोत ते आपल्याला कळणं! पण विचार-भावनांच्या मनातील गुंत्यांमुळं आपल्याला कुठं कळत असतं आपलं खरं स्वरूप, आपलं खरं मूल्य! आपल्या बोलण्या- वागण्याविषयीच्या इतरांनी व्यक्त केलेल्या शब्दांतून, प्रतिसादांतून, कौतुक-उपेक्षेतून आपण आपली प्रतिमा पाहत असतो. यातूनच आपल्या वाट्याला मान-अपमान येतात. त्यांना सामोरं जाण्यात आपली केवढी तरी ऊर्जा वाया जाते. स्वतःला जाणून घेताना आपल्या पायांखालची वाट भ्रांतीत बुडून जाते. आपण जे नाही आहोत, ते स्वतःला समजायला लागतो. कधी आपण आहोत त्याहून खुजे होतो, तर कधी मानाच्या, मोठेपणाच्या गोष्टी करायला लागतो. हा मान, हा मोठेपणा आपल्याला आपल्या असण्यापासून दूर नेतो. समाजातील आपला वावर नुसता नावलौकिकासाठीचा, नुसत्या प्रतिष्ठेचा होऊन बसतो.

आपण ना आपले राहतो ना समाजाचे. या अशा जीवनविरोधी मानीपणाबद्दल कबीर दोह्यांतून आपला भाव व्यक्त करतात, तेव्हा त्यांच्या शब्दांत दांभिकता संपवणारी धार असते. सद्हेतूनं ओथंबलेला कळवळा असतो. कबीर आपल्या दोह्यांतून सांगतात…

बडा हुआ तो क्या हुआ,

जौरे बडी मति नाहिं।

जैसे फूल उजारि का,

मिथ्या होय झरि जाहिं।।

कबीर म्हणतात, या भौतिक जगात पैशानं, प्रतिष्ठेनं, कलागुणानं, अनुभवानं माणूस कितीही मोठा असला, तरी काय झालं? हे मोठेपण समाजाशी जोडलेलं हवं. नुसतं एका माणसाचं मोठेपण वाढवणारं असता कामा नये. ‘ही अवघी पृथ्वी माझी, मी पृथ्वीचा’ हा भाव माणसाच्या मनात असावा. नाहीपेक्षा त्याचं जगणं जंगलातील आपलं व्यापक असणं न उमजलेल्या फुलासारखं हेतू नसलेलं होऊन जातं. त्याला स्वतःच्या जगण्याचा अर्थ उमगत नाही आणि जंगलातील इतर सजीवांनाही त्याचं आयुष्य आधाराचं होऊ शकत नाही. कबीर म्हणतात, मानीपण हे असं आत्मघातक आणि समाजघातक असतं.

पैसा, प्रतिष्ठा, अधिकार यांतून मान मिळवलेला माणूस श्रेष्ठ असेलही; पण समाजाला त्याच्या व्यक्तिगत यशाहून अधिक व्यापक असलेल्या सद्गुणांचा उपयोग होत असतो. व्यक्तिगत प्रगती साधलेल्या माणसाचं मन दुसऱ्यांसाठी प्रेमानं भरून येणारं, करुणेनं काठोकाठ वाहणारं नसेल, तर तो माणूस खजुराच्या झाडासारखा असतो, असं ते म्हणतात.

बड़ा हुआ तो क्या हुआ,

जैसे पेड खजूर।

पंथी को छाया नहीं,

फल लागै अति दूर।।

खजुराचं झाड खूप उंच असतं. त्याची फळं शेंड्याला लखडलेली असतात आणि त्याच्या पानांची सावली फक्त त्याच्या बुडाला वेटाळून घेणारी असते. कबीर म्हणतात, अगदी तसंच तथाकथित मोठेपण असलेल्या माणसाचं असतं. तो म्हणायला मोठा असतो. त्याच्या ठायीच्या सद्गुणांचा अज्ञानी जनांना उपयोग होत नाही की त्याच्या जिव्हाळ्यानं कुणाच्या मनाचा दाह शमत नाही. कबीरांना अशा वृत्तीच्या माणसाचं मोठेपण पोकळ वाटतं. आपल्याला नुसतं लोकांमध्ये प्रतिष्ठित व्हायचं नसेल आणि प्राणाला कुंपण घालणाऱ्या उपाधींना जाणून घ्यायचं असेल, तर कबीर सांगतात…

कबीर अपने जीवते,

ये दो बांता धोय।

मान बडाई कारने,

अछता मूल न खोय।।

आपण कुणी तरी मोठे असल्याचा गर्व आणि कुणा मोठ्याचा आश्रित असल्याचा अहंकार दोन्हींचाही आपल्याला त्याग करावा लागेल. या दोन्ही गोष्टी आपलं खरं स्वरूप झाकोळून टाकणाऱ्या आहेत. आपल्यातील माणूसपण संपवणाऱ्या आहेत. एवढंच नाही, तर आपल्याला जन्म-मृत्यूच्या येरझारीनं बांधून टाकणाऱ्या आहेत. या मान- प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनेपायी आपण खऱ्या जीवनाला पाठमोरे होतो, हे आपल्या ध्यानात आणून देण्यासाठी कबीरांचे दोहे आहेत. त्यांच्या चिंतनात राहून तसं वागणं हा आपल्यासाठी सदाचार आहे.

(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments