Sunday, August 30, 2026
Homeफलटणश्रीमंत रामराजेंच्या आवाहनाला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; श्रीराम कारखान्यासाठी अवघ्या काही दिवसांत सुमारे...

श्रीमंत रामराजेंच्या आवाहनाला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; श्रीराम कारखान्यासाठी अवघ्या काही दिवसांत सुमारे १ कोटींचे भागभांडवल जमा

रामराजेंच्या आवाहनाला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; श्रीराम कारखान्यासाठी अवघ्या काही दिवसांत सुमारे १ कोटींचे भागभांडवल जमा

फलटण | प्रतिनिधी  श्रीराम सहकारी साखर कारखाना पुन्हा स्वबळावर सुरू करण्याच्या दिशेने सभासदांनी मोठे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सभासदांनी अवघ्या काही दिवसांत शेअर्स रकमेपोटी सुमारे एक कोटी रुपये जमा केले आहेत. कारखाना प्रशासनाने ही माहिती देत सभासदांचा वाढता उत्साह आणि सहभाग अधोरेखित केला आहे.

कारखाना कार्यालयात दररोज सभासदांची मोठी गर्दी होत असून, रोख रक्कम, ठेवी तसेच इतर माध्यमांतून भागभांडवल जमा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. अनेक सभासदांनी आपली शेअर्स रक्कम पूर्ण केली असून, आणखी अनेक जण भागभांडवल भरण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत आहेत.

दरम्यान, जवाहर सहकारी साखर कारखान्याचा भाडेकरार संपुष्टात आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेत साखरवाडी येथील श्री दत्त इंडिया साखर कारखान्यास भागीदारी तत्त्वावर कारखाना चालविण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला होता. मात्र, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या निवेदनानंतर नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येईपर्यंत कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये आणि भाडेपट्टा नूतनीकरणाला स्थगिती द्यावी, अशी टिप्पणी शासन स्तरावर नोंदविण्यात आली. त्यामुळे श्रीराम–दत्त इंडिया भागीदारीचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असून, आगामी गळीत हंगामाबाबत सभासद, कामगार आणि व्यापारी वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या सभासद मेळाव्यात श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सभासदांना शेअर्स रक्कम पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. “आपणच आपला कारखाना चालवू. कोणालाही कारखाना चालविण्यास देण्याची गरज नाही. आवश्यक भागभांडवल वित्तीय संस्थांकडून उभारण्याची जबाबदारी मी घेतो. तुम्ही शेअर्स भरा, येणारा गळीत हंगाम सुरू करण्याची जबाबदारी माझी,” असे त्यांनी ठामपणे सांगितले होते.

या आवाहनानंतर सभासदांचा प्रतिसाद लक्षणीय वाढला असून, आजअखेर सुमारे एक कोटी रुपयांचे भागभांडवल जमा झाले आहे. कारखाना प्रशासनाच्या माहितीनुसार, दिवसेंदिवस वाढणारा प्रतिसाद पाहता ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाच्या निर्णयामुळे भागीदारीचा प्रस्ताव प्रलंबित असला तरी सभासदांनी श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत स्वबळावर कारखाना उभा करण्याचा निर्धार केला आहे. “आपला कारखाना आपणच उभा करायचा” हा संकल्प आता प्रत्यक्ष कृतीत उतरू लागल्याचे चित्र दिसत असून, वाढते भागभांडवल आणि कारखाना कार्यालयात होणारी सभासदांची गर्दी यावरून कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी सभासदांचा उत्साह स्पष्टपणे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments