
लंडनच्या ‘ग्लोबल वारी’चे फलटणमध्ये जल्लोषात स्वागत; विठ्ठल भक्तीचा अनोखा संगम
फलटण | प्रतिनिधी वारकरी परंपरेचा जागतिक स्तरावर होत असलेला विस्तार अधोरेखित करणाऱ्या लंडनच्या ‘ग्लोबल वारी’चे फलटण शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. लंडनहून मुंबई, त्यानंतर आळंदी असा प्रवास करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरकडे निघालेल्या या वारीने फलटणकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
लंडन येथील विठू माऊली मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या ग्लोबल वारीचा दि. १३ जुलै रोजी फलटण शहरातील उपळेकर महाराज मंदिरात मुक्काम होता. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. लंडनहून आलेल्या वारकऱ्यांसह स्थानिक भाविकांनी विठ्ठलनामाचा गजर करत भक्तिमय वातावरण निर्माण केले.
वारीतील पालखी आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली. अनेकांनी पालखीचे पूजन करून वारकऱ्यांचे स्वागत केले. परदेशात राहूनही भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि विठ्ठल भक्ती जपणाऱ्या या उपक्रमाचे फलटणकरांनी कौतुक केले.
ग्लोबल वारीमुळे वारकरी संप्रदायाचा संदेश केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता जगभर पोहोचत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. लंडनसारख्या परदेशात विठ्ठल भक्तीची परंपरा जोपासली जात असून, त्यातून भारतीय संस्कृतीचे जतन आणि प्रसाराचे महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
फलटणमधील मुक्कामानंतर ही ग्लोबल वारी पुढील प्रवासासाठी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली.










