
फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने BSI मिशन 25 अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु.महावीर भालेराव व सरचिटणीस आयु.बाबासाहेब जगताप कोषाध्यक्ष आयु.विठ्ठल निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम संपूर्ण तालुका भर घेतले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु.रामचंद्र मोरे यांनी समता नगर(विडणी) येथे माघ पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आपल्या निवेदनात माघ पौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट करताना आयु. रामचंद्र मोरे म्हणाले, बौद्ध धम्मातील माघ पौर्णिमा (माघ पूजा) हा केवळ धार्मिक विधींचा दिवस नसून धम्माचे सखोल चिंतन, मनन आणि आत्मपरिक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. या दिवशी तथागत गौतम बुद्धांनी १,२५० अर्हंत भिक्षूंना कोणत्याही आमंत्रणाविना एकत्र येताना पाहिले आणि ओवाळ पाटीमोक्षाचा (ओवाद पाटीमोक्ष) उपदेश दिला. यात पाप टाळणे, कुशल कर्म करणे आणि चित्त शुद्ध करणे हा धम्माचा सार सांगितला आहे.
माघ पौर्णिमा ही संघाच्या ऐक्याचे, शिस्तीचे आणि विवेकपूर्ण जीवनाचे प्रतीक आहे. या दिवशी उपासक-उपासिकांनी पंचशीलासोबत अष्टशीलाचे पालन करून आपल्या आचरणाकडे प्रामाणिकपणे पाहावे, अहिंसा, करुणा, मैत्री व समतेचा मार्ग स्वीकारावा. उपोसथ व्रत, गाथांचे सूत्रपठण, धम्मचर्चा यांद्वारे मन शुद्ध करून समाजहिताचा विचार करण्याची प्रेरणा या दिवसातून मिळते.
माघ पौर्णिमा ही प्रत्येक बौद्धासाठी स्वतःच्या विचारांचा, कृतींचा आणि जीवनदृष्टीचा पुनर्विचार करून विवेक जागृत करण्याची संधी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी मोठ्या संख्येने समता नगर येथील बौद्ध उपासक – उपासिका, बालक बालिका, अबाल वृद्ध मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते.








