Tuesday, September 15, 2026
Homeसातारानीरा नदीच्या साक्षीने पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात भव्य स्वागत!

नीरा नदीच्या साक्षीने पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात भव्य स्वागत!

फलटण :‘माऊली माऊली’च्या गजरात, टाळमृदुंगाच्या निनादात, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज पुणे जिल्ह्याची सीमा ओलांडत सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. नीरा नदीवरील दत्त घाटावर माऊलींच्या पवित्र पादुकांना नीरास्नान घालून हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यात आला. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हरिनामाचा जयघोष आसमंत दुमदुमवत होता.

या पवित्र प्रसंगानंतर पालखी सोहळा लोणंदकडे मार्गस्थ झाला असून सायंकाळी लोणंद येथे मुक्कामी पोहोचला आहे. बुधवारी वाल्हे येथे मुक्काम झाल्यानंतर आज सकाळी पालखी वाल्हे येथून मार्गस्थ होऊन नीरा येथे दुपारी थांबली आणि तद्नंतर सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामी पोहोचली.

पादुकांना नीरा नदीच्या पाण्यात स्नान घालण्याची परंपरा अतिशय प्राचीन असून आषाढी वारीतील तीन पवित्र स्नानांपैकी हे एक अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नीरा नदी ओलांडताना पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर होणारे हे स्नान हजारो वारकऱ्यांसाठी भक्तिभावाचा केंद्रबिंदू असतो.

पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पोलीस दलाने पालखीला मानवंदना दिली आणि पालखी सोहळ्याचे व वारकऱ्यांचे उस्फूर्त स्वागत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा हा सातारा जिल्ह्यातील पहिला मुक्काम भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments