Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रवेध मुत्सद्देगिरीचा...: मिर्झा राशिद अली बेग : राजशिष्टाचाराचा उद्गाता

वेध मुत्सद्देगिरीचा…: मिर्झा राशिद अली बेग : राजशिष्टाचाराचा उद्गाता

[ad_1]

मुंबई4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

राजशिष्टाचार हा परराष्ट्र धोरणातील फार संवेदनशील घटक मानला जातो. तो अदृश्य स्वरुपात परराष्ट्र धोरणाला प्रभावित करत असतो. मुत्सद्देगिरीतील समीकरणे घडवण्याची आणि बिघडवण्याची ताकद या राजशिष्टाचारात असते. संधी आणि आव्हाने यांचे संतुलन साधत विदेशी नेत्यांचा दौरा यशस्वीरीत्या पार पाडणे, तसेच कमी कालावधीत नेमकेपणाने आपल्या देशाचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सामर्थ्य दाखवण्याची जबाबदारी ही राजशिष्टाचार विभागाची असते. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा राजशिष्टाचाराचे महत्त्व अधोरेखित करण्याचे श्रेय मिर्झा राशिद अली बेग यांना जाते.

१८५९ मध्ये जन्मलेले बेग हे इंग्लंडच्या रॉयल मिलिटरी कॉलेजमधून पदवी प्राप्त करणाऱ्या पहिल्या भारतीय तुकडीचे पदवीधर होते. १९३० मध्ये लष्करी सेवेचा राजीनामा देऊन ते मोहम्मद अली जिनांचे स्वीय सहायक बनले. १९४२ मध्ये त्यांनी भारतीय विदेश सेवेत प्रवेश केला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी गोवा, पाँडेचेरी, थायलंड, फिलिपाइन्स आणि इराणमध्ये आपली सेवा बजावली. परंतु, भारतीय परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने १९५५ ते १९६१ या काळातील त्यांची कारकीर्द विशेष गाजली. या काळात ते भारतीय परराष्ट्र सेवेत राजशिष्टाचार विभागाचे प्रमुख होते.

भारतीय परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने १९५० चे दशक अनेक अर्थाने ऐतिहासिक होते. पंतप्रधान पं. नेहरू यांनी जागतिक राजकारणात भारताचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्याचा धडाका लावला होता. याचाच भाग म्हणून त्यांनी क्रुश्चेव्ह आणि बल्गॅनिन यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. जागतिक राजकारण आणि देशांतर्गत राजकारणाच्या दृष्टीने सोव्हिएत महासंघाचे असणारे महत्त्व पाहता त्यांना प्रभावित करणे गरजेचे होते. तसेच सोव्हिएत दौऱ्यात झालेल्या आपल्या अविस्मरणीय स्वागताच्या पार्श्वभूमीवर सोव्हिएत महासंघाच्या या दोन्ही नेत्यांचे अभूतपूर्व स्वागत व्हावे, अशी नेहरूंची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी बेग यांच्यावर होती.

बेग यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते, ते म्हणजे ही भेट फक्त राजकीय न राहता भारतीय संस्कृतीचे दर्शन त्यातून घडले पाहिजे. भारताची सांस्कृतिक विविधता पाहता ही गोष्ट त्या काळी तितकी सोपी नव्हती. बेग यांनी पत्नी तारा यांच्या सहाय्याने ही जबाबदारी लीलया पेलली. सोव्हिएत नेत्यांच्या स्वागतासाठी त्यांनी राष्ट्रपती भवनाची निवड केली. या स्वागत समारंभात बेग यांनी आदिवासी नृत्य आणि अभिजात भारतीय नृत्याच्या कार्यक्रमांचे आयोजन केले. हा बेग यांचा मास्टरस्ट्रोक होता. मृणालिनी साराभाई यांनी तेवणाऱ्या हजारो दिव्यांच्या साक्षीने कार्यक्रमाला प्रारंभ केला, तेव्हा जमलेल्या समुदायाने सोव्हिएत नेत्यांना आपल्या घोषणांनी अक्षरशः मंत्रमुग्ध केले. पालम विमानतळापासून ते कॅनॉट प्लेसपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूचा जनसमुदाय भारत-सोव्हिएत मैत्री जणू काही बळकट करत होता. याच दौऱ्यात क्रुश्चेव्ह यांनी काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे ठणकावून सांगितले, हे विशेष.

इतकेच नव्हे, तर बेग यांनी सुरू केलेल्या तीन प्रथा आजही विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी वापरल्या जातात. आता पाहुण्यांच्या आगमनावेळी जे दिमाखदार गालिचे अंथरलेले दिसतात, ते वापरण्याची सुरूवात बेग यांनीच केली. विदेशी नेत्यांच्या मागे जो त्यांच्या देशाचा झेंडा डौलाने फडकत असतो, ती नाविन्यपूर्ण कल्पनाही बेग यांचीच. डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी तर बेग यांना खादीचे झेंडे बनवण्याची सूचना केली. त्यावेळी खादीचा असणारा तुटवडा आणि पाहुण्यांची मांदियाळी यातून मार्ग काढत त्यांनी खादीच्या रुपात भारतीय झेंडा फडकवण्याची कामगिरी केली. बऱ्याचदा विदेशी पाहुण्यांच्या नावाचा नेमका उल्लेख करणे अवघड होते. त्यातून मानपानाचे प्रसंगही उद्भवतात. हे टाळण्यासाठी नेत्यांच्या समोर त्यांच्या नावाची पाटी लावण्याचे श्रेयही बेग यांचेच. आपल्या कारकिर्दीत बेग यांनी दलाई लामा, आयसेन हॉवर, चाऊ-एन-लाय, हो ची-मिन्ह, राणी एलिझाबेथ (द्वितीय), घानाचे राष्ट्राध्यक्ष नक्रूमाह, गमाल अब्दुल नासीर, राजे सौद, इराणचे शाह, जपानचे राजपुत्र अकिहितो तसेच डेन्मार्क, स्वीडन आणि फिनलंडचे पंतप्रधान यांच्या स्वागत-आदरातिथ्याचे नेमके नियोजन करीत त्या त्या देशांबरोबरचे संबंध बळकट करण्याला मोठा हातभार लावला होता. विदेशी नेत्यांच्या भव्य-दिव्य स्वागताची परंपरा अलीकडेच सुरू झाली असे मानणाऱ्या बहुसंख्य लोकांना बेग यांनी या प्रथेची सुरूवात केली होती, याची कल्पनाच नाही. जागतिक नेत्यांच्या स्वागत, आदरातिथ्य आणि मानपानातील एक छोटीशी चूकही संपूर्ण परराष्ट्र धोरणाचे संदर्भ बदलू शकते. अशा बिकट काळात बेग यांनी ‘अतिथी देवो भवो’ या भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करत भारतीय परराष्ट्र धोरणात बहुमूल्य योगदान दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments