Tuesday, August 11, 2026
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीला धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासारख्या फायरब्रँड नेतृत्वाची गरज"

महाविकास आघाडीला धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासारख्या फायरब्रँड नेतृत्वाची गरज”

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रतिकूल परिस्थितीतही विचारांची लढाई; विरोधकांना आक्रमक नेतृत्वाची गरज असल्याची चर्चा

सोलापूर | प्रतिनिधी. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी भाजपला थेट आव्हान देणाऱ्या आणि संघर्षाची भूमिका घेणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे.

सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था आमदारकीच्या निवडणुकीत पक्षश्रेष्ठी आणि शरद पवार यांच्या आदेशानुसार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान उभे होते. भाजपने केवळ आपल्या पक्षातीलच नव्हे, तर महाविकास आघाडीतील काही आमदारांनाही आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवल्याचे चित्र निर्माण झाले होते.

जिल्ह्यातील ११ आमदार एका बाजूला आणि धैर्यशील मोहिते-पाटील दुसऱ्या बाजूला, अशी परिस्थिती असतानाही त्यांनी संघर्षाची भूमिका कायम ठेवली. ६१६ मतदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे केवळ २९ मते असतानाही उमेदवार वसंत नाना देशमुख यांना ११८ मते मिळाली. हा निकाल विचारांची ताकद आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे प्रतीक मानला जात आहे.

राजकारणात सत्ता, संख्या आणि संसाधनांच्या जोरावर समीकरणे बदलली जात असली, तरी विचारांची लढाई लढण्यासाठी धैर्य, स्पष्ट भूमिका आणि जनतेशी थेट नाळ असलेले नेतृत्व आवश्यक असते. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी ही निवडणूक केवळ राजकीय स्पर्धा म्हणून न पाहता विचारांची लढाई म्हणून लढल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.

सध्याच्या राजकीय वातावरणात विरोधकांच्या भूमिकेला धार देणारे, अन्यायाविरोधात आवाज उठवणारे आणि कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारे नेतृत्व म्हणून धैर्यशील मोहिते-पाटील यांचे नाव राज्याच्या राजकारणात ठळकपणे पुढे येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्रातील लोकशाही अधिक सक्षम राहण्यासाठी सत्तेला प्रश्न विचारणारे आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे नेतृत्व आवश्यक असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments