एंजल!: गोष्ट सांगतो ऐका…

0
15
एंजल!:  गोष्ट सांगतो ऐका…


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Special Listen To The Story… | Angel Written By Arvind Jagtap

अरविंद जगताप5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आई म्हणाली, ‘नातू म्हणतोय तर बसवा दीड दिवसाचा गणपती.’ विलास-वैजयंतीच्या मनात इच्छा असायची. यावेळी कारण मिळालं. फक्त अडचण एकच होती…

वैजयंती आणि विलासचं लग्न होऊन बारा वर्षे झाली. मग मुलगा झाला. चेतन नाव ठेवलं त्याचं. घर दोन खोल्यांचं असलं, तरी आता आनंद मोठा होता. राहून राहून विलासच्या आईला म्हणजे माधवीला त्याच्या वडिलांची आठवण यायची. जयंतराव पाच-सहा वर्षापूर्वी अपघातात गेले. माधवीही त्यांच्यासोबत होत्या. त्यांना पाठीला मार लागला होता. तेव्हापासून एका जागेवर असतात. फार हालचाल जमत नाही. पण, बसल्या बसल्या सगळ्या घरात लक्ष ठेवतात. चेतन आता आठ वर्षांचा झाला. माधवीआजी दिवसातून दोनदा तरी त्याला म्हणते, ‘तुझे आजोबा असते तर किती खुश झाले असते..’ नातवाचं कौतुक करत राहणं, नवऱ्याची आठवण काढत दिवस काढणं एवढंच त्यांचं जग आहे. विलास एका छोट्या कंपनीत कामाला आहे. वैजयंती घरीच असते. चेतनचं करता करता दिवस कसा जातो, तिला कळत नाही. त्यात चेतनचा रोज एक हट्ट असतो…

आता तीन – चार दिवसांपासून चेतनने एकच हट्ट धरलाय.. घरी गणपती बसवायचा. त्याच्या सगळ्या मित्रांच्या घरी मोठा गणपती असतो. प्रसाद असतो, लायटिंग असते, खूप डेकोरेशन असतं. तो विसरून जाईल दोन दिवसात म्हणून आधी सगळ्यांनी सोडून दिलं. पण, चेतन एकच हेका धरून बसला होता. खरं तर विलासच्या मोठ्या भावाकडं गणपती असतो. म्हणून मग विलास घरी गणपती बसवत नाही. एकाच शहरात असल्यामुळं दर्शनाला मोठ्या भावाकडं जाऊन येतात. मोठा भाऊ दिनेश वकील आहे. वकिली विशेष चालत नसली, तरी बायको शिक्षिका असल्याने संसार ठीक चालू आहे. मोठा भाऊ असल्यानं देवांची जबाबदारी दिनेशकडं आणि आईची जबाबदारी विलासकडं आहे. पण, यावेळी विलासच्या मुलाने गणपती बसवायचा हट्टच धरलाय. विलासची आई म्हणाली, ‘नातू एवढा म्हणतोय तर बसवा दीड दिवसाचा गणपती.’ विलास आणि वैजयंतीच्या पण मनात इच्छा असायची. यावेळी कारण मिळालं. फक्त अडचण एकच होती. गणपती बसवायला जागा नव्हती. दोन खोल्यांचं घर. त्यात स्वयंपाकघर. चौघांनाच पुरेशी जागा नव्हती. त्यात गणपतीची सजावट. तेवढी जागा कुठून आणायची?

विलास आणि वैजयंती काही खासगी बोलायचं असलं की गार्डनमध्ये चालायला जायचे. आजही गेले. दोघांनी ठरवलं की, विलासच्या आईचा छोटा पलंग आहे, तिथं गणपती मांडता येईल. दीड दिवसाचा प्रश्न आहे. दोन दिवस आईला मोठ्या भावाकडं पाठवता येईल. पण, आईला हे सांगितल्यावर तिला वाईट तर वाटणार नाही? वैजयंती म्हणाली, ‘मोठ्या मुलाकडंच तर जायचंय, त्यात काय वाईट वाटायचं?’ विलासने मोठ्या भावाला फोन केला. दोन दिवस आईला तुझ्याकडं पाठवतो. मोठा भाऊ ‘नाही’ म्हणाला. त्याचे सासू-सासरे येणार होते. त्याच्या घरात जागाच नाही उरणार. विलासची मोठीच अडचण झाली. पण, वैजयंती काही ऐकायला तयार नव्हती. तिला मुलाचा हट्ट पुरवायचाच होता. आणि खूप दिवसांपासून डोक्यात होतंच की, कधी तरी सासू नसताना दोन दिवस राहायचं आरामात..

तिला विलासच्या मोठ्या भावाचा खूप राग यायचा. त्याने कधीही आईला त्याच्याकडं घेऊन जायचा विषय काढला नाही. जणू काही आई ही त्याची जबाबदारीच नव्हती. वैजयंतीने विलासला जवळपास धमकीच दिली.. ‘यावेळी गणपती बसणार म्हणजे बसणार. तुमच्या भावाला सांगा..’ विलासलाही भावाचा रागच आला होता. त्याने एरवी कधीच आग्रह केला नव्हता. आई विलासकडेच होती. पहिल्यांदाच तो आईला घेऊन जाण्याविषयी भावाला बोलला होता. आणि दीड दिवसाचाच तर प्रश्न होता. पण, भाऊ तयार नव्हता. गणपती एक दिवसावर आले, पण तोडगा सापडत नव्हता. विलास वैतागून भावाला भेटायला गेला.

विलासच्या भावाने त्याची परिस्थिती सांगितली.. त्याचे सासू-सासरे पहिल्यांदाच त्याच्याकडं येणार होते. इस्टेटीत हिस्सा मागितला म्हणून त्यांनी आपल्या मुलीशी बोलणं सोडून दिलं होतं. आठ – दहा वर्षे त्यांचा अबोला होता. पण, गेल्या आठवड्यात पुन्हा बोलणं सुरू झालं. विलासच्या भावाचं पाठीचं ऑपरेशन झालं होतं. त्या निमित्ताने सासू – सासरे फोनवर बोलले. मग हळूहळू बोलणं वाढलं. राग निवळला. आणि गणपतीत सासू – सासरे विलासच्या भावाकडे येणार, असं ठरलं.

भावाचं सगळं काही सुरळीत होतंय, तर विलास तरी पुढं काय बोलणार? चहा घेऊन परत निघाला. बायकोला काय सांगायचं, हा प्रश्न होताच. विलास बस पकडायची सोडून पायीच चालू लागला. आपल्या गरिबीला दोष देऊ लागला. पण, स्वतःच्या गरिबीवर माणूस किती विचार करणार? विलासच्या डोक्यात आयडिया येऊ लागल्या. मावस बहिणीची सासू ज्या वृद्धाश्रमात आहे, तिथं ठेवायचं का आईला दोन दिवस? तिला कंपनीही मिळेल. हा विचार आपल्या मनात यावा, याचंच वाईट वाटलं त्याला. पण, दुसरा पर्याय नव्हता. एक तर गणपती बसवायचा विचार आपल्या मुलाच्या मनात यायलाच नको होता. पण, बाकी मुलांच्या घरात एवढी सजावट करतात, एवढे पाहुणे येतात, ते त्याने बघितलं होतं. आपल्या घरीही कधीतरी असा गणपती असावा, असं त्याला वाटण्यात त्याची तरी काय चूक? विलास थेट वृद्धाश्रमाला जाणाऱ्या बसमध्ये बसला. शहरापासून दीड तासावर होता वृद्धाश्रम. तिथं पोचायला संध्याकाळ झाली. तिथं सगळी बोलणी करून पुन्हा गणपतीची खरेदी करायची होती. वेळ कमी होता. विलास वृद्धाश्रमात गेला. पण, तिथं सांगितलं की, असं अचानक कुणाला आणता येत नाही. आधी सगळ्या प्रोसेस असतात. फी असते. त्यात एक आठवडा जाईल. आणि असं दोन दिवस ठेवता येत नाही.

विलास निराश होऊन बाहेर पडला. उदास मनानं घरी गेला. दार उघडल्याबरोबर पोरगा गळ्यात पडेल आणि सजावटीचं सामान आणायला चला म्हणेल. त्याला काय उत्तर द्यायचं, हा प्रश्नच होता. पण, दार उघडल्यावर तसं काही घडलं नाही. सगळे आपापल्या कामात होते. चेतन अभ्यास करत होता. वैजयंती स्वयंपाक करत होती. विलासला काय बोलावं, सुचत नव्हतं. अचानक चेतन त्याच्या जवळ आला. त्यानं विलासची आई झोपलेली होती, त्या भिंतीकडं बोट दाखवलं. भिंतीवर त्यानं कागदावर काढलेला गणपती लावला होता. एवढं छान चित्र बघून विलासला कौतुक वाटलं. चेतन म्हणाला, ‘सगळ्यांच्या आधी आपला गणपतीबाप्पा आला.. आजीने एकशेएक रुपये बक्षीस दिलं मला!’ विलास त्याला म्हणाला, ‘तुला सजावट करायची होती ना?’ चेतन म्हणाला, ‘आहे ना.. ही काय..’ चेतनने आजीकडं बोट दाखवलं. म्हणाला, ‘कुणाच्याच गणपतीपाशी एंजल नसते. माझ्या गणपतीपाशी ही एंजल आहे..’ नातवानं आजीला मिठी मारली. आजीला एंजलच म्हणायचा तो. तिनंच चित्र काढायला शिकवलं होतं ना त्याला.. विलास आणि वैजयंती एकमेकांकडं बघत राहिले. आपल्या घरात ‘एंजल’ आहे, हे विसरलेच होते ते!

(संपर्क- jarvindas30@gmail.com)



Source link