शेअर बाजारात नवा अध्याय: ‘क्लोजिंग ऑक्शन’ प्रक्रियेमुळे पारदर्शकता आणि अचूकतेला बळ; वाचा डॉ. व्ही. शन्मुगम यांचा लेख

0
2
शेअर बाजारात नवा अध्याय:  ‘क्लोजिंग ऑक्शन’ प्रक्रियेमुळे पारदर्शकता आणि अचूकतेला बळ; वाचा डॉ. व्ही. शन्मुगम यांचा लेख


  • Marathi News
  • Opinion
  • India Stock Market Closing Auction Process Explained; Dr. V. Shanmugam Analysis

9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारतात आतापर्यंत व्यवहाराच्या अखेरच्या अर्ध्या तासातील खंड-भारित सरासरीच्या (Volume Weighted Average Price) आधारे क्लोजिंग किंमत निश्चित केली जात होती. मात्र, प्रथमच लंडन, फ्रँकफर्ट, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कसारख्या आघाडीच्या जागतिक बाजारपेठांप्रमाणे क्लोजिंग ऑक्शन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या पद्धतीत दिवसअखेरीस बाजारातील सर्व खरेदी-विक्रीचे आदेश एकत्रित केले जातात आणि त्यावरून प्रत्येक समभागासाठी एकच अंतिम किंमत निश्चित केली जाते.

पहिल्याच दिवशी ही प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे पार पडली. क्लोजिंग ऑक्शनची पद्धत वापरणाऱ्या इतर बाजारपेठांमध्ये जसा अनुभव आला आहे, तसाच अनुभव भारतातही दिसून आला. सर्वाधिक तरलता असलेल्या एक्स्चेंजवरच बहुतांश व्यवहार केंद्रित झाले. दिवसअखेरीस क्लोजिंग ऑक्शनमधील जवळपास सर्व व्यवहार NSE वर झाले. त्यामुळे बाजारातील सर्व क्लोजिंग ऑर्डर्स एका व्यासपीठावर एकवटल्या.

एकत्रित खरेदी-विक्रीच्या कलानुसार क्लोजिंग किंमत निश्चित झाली. खरेदीचा दबाव अधिक असल्यास किंमत वाढली, तर विक्रीचा दबाव अधिक असल्यास ती घसरली. नियोजनानुसार राबविलेल्या क्लोजिंग ऑक्शनने आपले मूलभूत उद्दिष्ट यशस्वीपणे साध्य केल्याचे यातून स्पष्ट झाले.

व्यवहारांचा मोठा हिस्सा एका एक्स्चेंजवर केंद्रित होणे अपेक्षितच होते. कारण ऑक्शनमध्ये प्रत्येक एक्स्चेंजवर प्रत्येक समभागासाठी एकच किंमत निश्चित होते आणि त्या किमतीचे महत्त्व व्यवहाराच्या खंडावर अवलंबून असते. त्यामुळे ज्या व्यासपीठावर समोरचा व्यवहारकर्ता सहज उपलब्ध होईल. तिकडेच बाजारातील सहभागी आपले क्लोजिंग ऑर्डर्स वळवतात. व्यवहाराचा मोठा खंड आणखी व्यवहारांना आकर्षित करतो. अधिकृत क्लोजिंग किमतीवर व्यवहार करणे आवश्यक असलेल्या इंडेक्स फंड्स आणि ETF साठीही व्यवहार अनेक एक्स्चेंजमध्ये विभागण्यापेक्षा अधिक तरलता असलेल्या व्यासपीठावर राहणे अधिक सोयीचे ठरते.

हाँगकाँगमध्ये क्लोजिंग ऑक्शन सुरू झाल्यानंतर आणि त्याआधी युरोपातील अनेक एक्स्चेंजमध्येही हाच अनुभव आला होता. SEBI च्या समान नियामक चौकटीत काम करणाऱ्या भारतीय एक्स्चेंजमध्येही सहभागी तरलतेच्या आधारेच व्यवहाराचे व्यासपीठ निवडत असल्याचे दिसून आले.

डेरिव्हेटिव्ह्ज विभागात मात्र चित्र काहीसे वेगळे होते. क्लोजिंग विंडोदरम्यान फ्युचर्स विभागातील सहभाग आणि व्यवहाराची खोली रोखीच्या ऑक्शनच्या तुलनेत कमी होती. त्यामुळे फ्युचर्स बाजाराची क्लोजिंग किंमत रोखीच्या बाजाराशी अपेक्षेप्रमाणे पूर्णपणे सुसंगत राहिली नाही.

रोख आणि फ्युचर्स बाजारातील किमतींमध्ये समतोल राखणाऱ्या ट्रेडिंग डेस्कनी सावध भूमिका घेतली. प्रत्यक्ष व्यवहारात यापूर्वी कधीही न वापरलेल्या व्यवस्थेत मोठी जोखीम घेण्यास त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांनी आपला सहभाग मर्यादित ठेवला आणि संपूर्ण प्रक्रिया प्रथम निरीक्षणाखाली ठेवली. या व्यवस्थेची सवय झाल्यानंतर त्यांचा नियमित सहभाग पुन्हा वाढेल. त्यानंतर रोख आणि फ्युचर्स बाजारातील सुसंगतीही पूर्ववत होईल.

जगातील प्रत्येक बाजारपेठेत क्लोजिंग ऑक्शनची अंमलबजावणी प्रथमच करताना असा अल्पकालीन विलंब दिसून आला आहे आणि तो काही दिवसांतच दूर झाला आहे. कार्यान्वयनाच्या दृष्टीने हा दिवस पूर्णपणे सुरळीत पार पडला. एवढ्या मोठ्या बदलासाठी याहून चांगला प्रारंभ अपेक्षित असू शकत नाही.

कोणतीही तांत्रिक अडचण किंवा ताळमेळातील त्रुटी आढळली नाही. क्लोजिंग ऑक्शनने दिवसअखेरीस बाजारातील सर्व व्यवहारांचे यशस्वीपणे एकत्रीकरण केले. त्यानंतर क्लोजिंग किंमतींची गणना करून त्या तातडीने प्रसारित करण्यात आल्या. दलाल, क्लिअरिंग हाऊस आणि डिपॉझिटरीज यांच्यासाठी आवश्यक असलेल्या अंतिम फाइल्सही पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या पाठविण्यात आल्या. मात्र, ही केवळ पहिली ट्रेडिंग सत्र होती, हे लक्षात घ्यायला हवे.

बहुतांश ट्रेडिंग डेस्कनी किंमत कशी निश्चित होते, हे प्रथम पाहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बहुतेक ऑर्डर्स ऑक्शनच्या अखेरच्या टप्प्यात दाखल झाल्या. सर्व विभागांतील सहभागही नेहमीपेक्षा अधिक सावध होता. पहिल्या दिवशी अशी परिस्थिती निर्माण होणे स्वाभाविक आहे. व्यवस्थेची सवय झाल्यानंतर हे चित्र बदलेल.

ट्रेडिंग डेस्क लवकर ऑर्डर्स देऊ लागतील, बाजारातील व्यवहाराचा खंड वाढेल, फ्युचर्स आणि रोख बाजारातील संबंध अधिक मजबूत होतील आणि क्लोजिंग ऑक्शनची प्रक्रिया दैनंदिन व्यवहाराचा नियमित भाग बनेल. ज्या बाजारपेठांमध्ये ही व्यवस्था लागू करण्यात आली, तेथे काहीच सत्रांमध्ये अशी स्थिरता निर्माण झाली आहे.

गुंतवणूकदारांच्या दृष्टीने हा बदल सूक्ष्म असला तरी त्याचे महत्त्व मोठे आहे. म्युच्युअल फंडांच्या NAV, निर्देशांकांची गणना आणि सेटलमेंटसाठी वापरली जाणारी क्लोजिंग किंमत आता केवळ गणिती सरासरी राहिलेली नाही. ती बाजारातील सर्व सहभागींच्या एकत्रित व्यवहारातून ठरलेली प्रत्यक्ष बाजारभाव आहे.

मागणी आणि पुरवठ्याच्या शक्तीवर तिची निर्मिती होते. त्यामुळे तिची पडताळणी करता येते आणि त्या किमतीमागे प्रत्यक्ष खरेदीदार व विक्रेते उभे असतात. पहिल्याच दिवशी हा बदल सुरळीतपणे अमलात आला. आगामी सत्रांमध्ये ही पद्धत बाजाराच्या दैनंदिन व्यवहाराचा अविभाज्य भाग बनेल. त्यातून भारतीय भांडवली बाजार जागतिक सर्वोत्तम पद्धतींशी अधिक सुसंगत होईल.

(डॉ. शण्मुगम यांनी कृषी अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. ते कमोडिटी बाजार, आर्थिक नियमन आणि भांडवली बाजार धोरणाचे अभ्यासक आहेत.)



Source link