Tuesday, August 11, 2026
Homeफलटणप्रा. रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी :...

प्रा. रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बं

प्रा. रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी

फलटण प्रतिनिधी : लेखणीच्या सामर्थ्यावर समाजप्रबोधन, सामाजिक न्याय आणि लोकहिताची चळवळ उभी राहू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रा.रमेश आढाव यांची पत्रकारिता होय. पत्रकारितेला लोकसेवेचे प्रभावी माध्यम मानत त्यांनी समाजातील विविध घटकांच्या समस्या सातत्याने मांडल्या. वंचित, उपेक्षित आणि अन्यायग्रस्तांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका घेत आदर्श पत्रकारितेचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. त्यांच्या स्मरणार्थ गरजू विद्यार्थ्यांना एक लाख वह्यांचे मोफत वाटप करण्याचा आढाव कुटुंबीयांनी घेतलेला संकल्प प्रेरणादायी आहे, असे मत कै.भाऊसाहेब दैठणकर प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुपुत्र बंडी यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन म्हणून शालेय साहित्य वाटप व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन निंभोरे (ता. फलटण) येथील प्राथमिक शाळेत करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शाळेचे अधीक्षक अनिल महामुनी, मोहनराव माळवे, दस्तगीर पठाण, संजय इंगळे, चंदाराणी जगताप यांच्यासह आढाव कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

सुपुत्र बंडी म्हणाले, प्रा.रमेश आढाव यांनी सामाजिक, शैक्षणिक कार्यासह पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय व मौलिक योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे. प्रा.आढाव यांनी लोकहितासाठी जपलेली मूल्ये समाजाला दिशा देणारी आहेत. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा जपणे आपली जबाबदारी आहे. त्यांनी जोपासलेली लोकाभिमुखता, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

शाळेचे अधीक्षक अनिल महामुनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, प्रा. रमेश आढाव यांचे विचार, कार्य आणि समाजहिताची भूमिका व्यापक व प्रेरणादायी होती. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम करणे, हा त्यांच्या कार्याचा उद्देश होता. त्यांच्या स्मरणार्थ राज्यभरातील गरजू विद्यार्थ्यांना एक लाख वह्यांचे मोफत वाटप करण्याचा संकल्प आढाव कुटुंबीयांनी हाती घेतला आहे. हा उपक्रम म्हणजे प्रा.रमेश आढाव यांच्या कार्याला आणि विचारांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल.

दरम्यान, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी भाषणे केली. त्यानंतर ऋषिकेश आढाव व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, लेखनसाहित्य आणि अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. रमेश आढाव यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मोहनराव माळवे यांनी केले, अधीक्षक अनिल महामुनी यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, पत्रकार, विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments