
फलटण प्रतिनिधी :- जनतेच्या ऋणानुबंधातून घडलेलं लोकाभिमुख नेतृत्व
लोकशाहीच्या लोकोत्सवात जनतेच्या विश्वासावर उभं राहिलेलं, लोकमान्य आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे आजही महाराष्ट्र पाहतो आहे. समाजकारण आणि राजकारणातील एक दीपस्तंभ म्हणून ओळख असलेल्या रामराजेंना जनसागऱ्याच्या साक्षीने “पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय विद्यापीठांचे कुलगुरू” असे संबोधले जाते, हेच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे.
जनतेच्या ऋणातून मुक्त व्हावं असं त्यांना कधीच वाटलं नाही, कारण हे ऋण म्हणजे दुष्काळी परिस्थितीवर मात करत पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केलेल्या अटोकाट प्रयत्नांची जबाबदारी. शिवारात वाहणारे पाणी, कालवे आणि खळखळून वाहणारे बंधारे हे त्या संघर्षाचं जिवंत प्रतीक आहेत.
वयाच्या ८० व्या वर्षांकडे वाटचाल करत असतानाही तालुक्यातील प्रत्येक प्रश्नावर सतत कार्यरत असलेलं, अद्ययावत तंत्रज्ञानाशी नातं जपणारं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यातही खंबीरपणे उभं राहणारं हे नेतृत्व आजही तितकंच लढवय्यं आहे. डीपफेक बातम्यांचं पेव फुटलेलं असतानाही विश्वासार्हतेचा किल्ला अजूनही अभेद्य आहे.
आजची युवापिढी दुष्काळ पाहिलेला नाही, पण त्या पाण्यामागचा संघर्ष मात्र रामराजेंच्या कर्तृत्वात कोरलेला आहे. सातारा जिल्हा, फलटण, लोणंद, खडाळा परिसरातील सामान्य माणूस आणि युवक आजही मोठ्या विश्वासाने व आशेने त्यांच्या नेतृत्वाकडे पाहतो आहे.
महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नावर विचारांशी तडजोड न करता केलेला संघर्ष, शासनदरबारी उठवलेला बुलंद आवाज आणि जनतेचा आशिर्वाद यामुळे सातारा जिल्हा व फलटण तालुक्याचं नाव राज्याच्या नकाशावर सुवर्ण अक्षरांनी नोंदवलं गेलं, हे नाकारता येणार नाही.
उर्वरित काळात फलटण तालुक्याचा कायापालट करण्याचा निर्धार त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट दिसतो आहे. काही मंडळी वैफल्यग्रस्त होऊन आरोप-प्रत्यारोपांची मॅरेथॉन सुरू ठेवत असली, तरी जनतेच्या मनातील नवचैतन्याचं वारं आजही महाराज साहेबांच्या अवतीभोवतीच घोंगावत आहे.
म्हणूनच, लवकरच फलटण तालुक्यात जनसागऱ्याच्या साक्षीने विकासात्मक सहस्त्रचंद्रदर्शनाचे विविध, विलक्षण आणि विलोभनीय परिवर्तनाचे किरण रेखाटले जातील, अशी ठाम भावना जनतेतून व्यक्त होत आहे.
माझं सुंदर फलटण…. स्वच्छ फलटण….मी फलटण कर…!







