Sunday, September 13, 2026
Homeसातारारोडरोलरच्या गतीने परिवर्तनाचा मार्ग: राजू शेट्टींचे गर्जन

रोडरोलरच्या गतीने परिवर्तनाचा मार्ग: राजू शेट्टींचे गर्जन

फलटण:”शेतकरी, गरीब, आणि दलितांना न्याय देण्यासाठी ग्रामीण भागात प्रस्थापितांविरोधात उभे राहून परिवर्तनाचा नवा मार्ग तयार करायचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे आपले सर्वांत मोठे शस्त्र आहे. सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभ्या असलेल्या लोकांना पराभवाची भीती असण्याचे कारण नाही. चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रा. रमेश आढाव यांना विजयी करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत,” असे भावनिक आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून रोडरोलर या चिन्हावर लढणाऱ्या संविधान समर्थन समिती आणि परिवर्तन महाशक्ती आघाडी पुरस्कृत स्वाभिमानी पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा. रमेश आढाव यांच्या प्रचारार्थ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

“आपला रोडरोलर हा बाबासाहेबांच्या विचारांचे व्हिजन पुढे घेऊन चालला आहे, ज्याला थोपवण्याची शक्ती अजून जन्माला आलेली नाही. सामान्य माणसाचा स्वाभिमान जागवण्यासाठी हा रोडरोलर प्रस्थापित राजकारण्यांच्या घढ्या जमिनदोस्त करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजू शेट्टी पुढे म्हणाले, “बाबासाहेबांच्या संविधानाने सर्वसामान्य नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. त्याचा योग्य उपयोग करून बौद्ध समाजाला विधानसभेत प्रतिनिधित्वाची संधी देण्याची हीच वेळ आहे. परिवर्तन महाशक्तीने सामान्यांसाठी उभे राहून ही लढाई अधिकृत केली आहे.”

सभेत प्रा. रमेश आढाव यांनी निवडणुकीत मिळालेल्या संधीचे महत्त्व विशद करत जनतेला प्रामाणिक काम करण्याचा शब्द दिला. “निवडणुकीचे शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. मेहनतीने काम करा आणि मला एकदा संधी द्या,” असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, प्रवक्ते प्रमोद गाडे, नगरसेवक सचिन अहिवळे, सनी काकडे यांचीही भाषणे झाली. सभेला तालुक्यातील महत्त्वाच्या व्यक्तींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
सभा आनंद पवार आणि विशाल बंडगर यांच्या सूत्रसंचालनाने पार पडली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments