प्रत्येक जनावरासाठी चारा-पाण्याचे थेट अनुदान देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी
अकलूज : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांसमोर चारा आणि पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले असून, पशुधन वाचवण्यासाठी शासनाने तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध होत नसून पाण्याचीही मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांना जनावरे सांभाळणे आर्थिकदृष्ट्या कठीण होत आहे. अनेक शेतकरी आणि पशुपालकांचा उदरनिर्वाह पशुधनावर अवलंबून असल्याने शासनाने या संकटाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे खासदार मोहिते-पाटील यांनी म्हटले आहे.
प्रत्येक जनावरासाठी चारा आणि पाण्याकरिता थेट अनुदान पशुपालकांच्या बँक खात्यात जमा करावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे पशुपालकांना आवश्यकतेनुसार चारा व पाण्याची व्यवस्था करता येईल आणि दुष्काळाच्या काळात पशुधनाचे संरक्षण करणे शक्य होईल.
तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने प्रति लिटर १५ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणीही खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली आहे. दुष्काळामुळे जनावरांच्या संगोपनाचा खर्च वाढत असताना दूध उत्पादनातून मिळणारे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना अनुदान मिळाल्यास त्यांना आर्थिक आधार मिळू शकतो.
पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून, दुष्काळाच्या काळात जनावरांची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रभावी मदत यंत्रणा उभी करावी, अशी मागणी खासदार मोहिते-पाटील यांनी केली आहे.
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांना चारा, पाणी आणि आर्थिक मदत वेळेत उपलब्ध करून देऊन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
