Friday, November 13, 2026
Homeमहाराष्ट्रप्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याला मारहाण, पत्नीला जबरदस्तीने नेले; अंनिसच्या हस्तक्षेपानंतर प्रेमविवाहाला मिळाला न्याय!

प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याला मारहाण, पत्नीला जबरदस्तीने नेले; अंनिसच्या हस्तक्षेपानंतर प्रेमविवाहाला मिळाला न्याय!

नाशिक : प्रेमविवाहाला कुटुंबीयांचा विरोध झाल्याने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे एका सज्ञान जोडप्याला मारहाण आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडूनही मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) हस्तक्षेपानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतली. त्यानंतर संबंधित तरुणीने पतीसोबत राहण्याचा जबाब दिला आणि बुधवारी रात्री उशिरा पोलिसांसमक्ष तिला पतीच्या ताब्यात देण्यात आले.

संतोष आणि संगीता (दोघांची नावे बदललेली आहेत) हे दिंडोरी येथील रहिवासी असून संतोष संगणक अभियंता आहे, तर संगीताने औषधनिर्माणशास्त्राची पदवी घेतली आहे. गेल्या चार वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच जातीतील असूनही समाजातील उच्च-नीचतेच्या अवैज्ञानिक समजुतींमुळे संगीताच्या कुटुंबीयांनी त्यांच्या विवाहाला विरोध केला. अखेर दोघांनी ३१ ऑक्टोबर रोजी आपल्या इच्छेने वैदिक पद्धतीने विवाह केला.

विवाहानंतर संगीताच्या नातेवाईकांनी तिच्या अपहरणाची तक्रार दिंडोरी पोलिसांत दाखल केली. त्यानंतर संतोष आणि संगीता स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी विवाहाची कागदपत्रेही पोलिसांना सादर केली. मात्र, संतोषच्या म्हणण्यानुसार, संगीताच्या नातेवाईकांनी जमाव जमा करून स्थानिक राजकीय व्यक्तीच्या मदतीने पोलिसांवर दबाव आणला.

यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने संतोषला अपमानास्पद भाषा वापरून शिवीगाळ केली व कानाखाली मारल्याचा आरोप आहे. तसेच महिला पोलीस अधिकाऱ्याने संगीताला मारहाण केल्याचेही सांगण्यात आले. संतोषच्या वडिलांनाही पोलीस ठाण्याच्या आवारात जमावाकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर जोडप्याला पुन्हा मारहाण करून संगीताला जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप संतोषने केला आहे.

भोंदूबाबाकडून अंधश्रद्धेचा आधार घेतल्याचा आरोप

संगीताला तिच्या नातेवाईकांनी सिन्नर तालुक्यातील शहापांचाळे येथील एका कथित भोंदूबाबाकडे नेल्याचे समोर आले आहे. संतोषसोबत राहिल्यास दोन महिन्यांत संतोषचा मृत्यू होईल, अशी भीती तिला दाखवण्यात आली. तिला पाण्यातून उदी पिण्यास देणे, धागा आणि मंत्रोच्चारित लिंबू नदीत सोडण्यास सांगणे तसेच अघोरी विधी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, संगीताने संतोषसोबत राहण्याचा निर्णय कायम ठेवला.

अंनिसच्या हस्तक्षेपामुळे तरुणीची सुटका

या घटनेनंतर संतोषने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जातपंचायत मुठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी संतोष आणि त्याच्या नातेवाईकांसह अतिरिक्त पोलीस आयुक्त विमला एम. यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरण मांडले.

अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दिंडोरी पोलिसांना जाब विचारला आणि संगीताला तत्काळ पोलीस ठाण्यात हजर करून तिचा जबाब नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी रात्री उशिरा नाशिक तालुका पोलीस ठाण्यात संगीताने संतोषसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर पोलिसांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तिला संतोषच्या ताब्यात दिले.

जोडप्याच्या सुरक्षेसह दोषींवर कारवाईची मागणी

या घटनेनंतर जोडप्याने अंनिसच्या कार्यकर्त्यांकडे समाधान व्यक्त करत क्रौर्यावर प्रेमाचा विजय झाल्याची भावना व्यक्त केली. मात्र, दोघांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना सेफ होममध्ये सुरक्षित निवास द्यावा, संतोषला मारहाण व दमदाटी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी आणि संबंधित कथित भोंदूबाबावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

या मोहिमेत अंनिसचे राज्य प्रधान सचिन डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्री, रंजन लोंढे आणि अॅड. विद्या चांदगुडे यांनी सहभाग घेतला.

अधिक माहितीसाठी : कृष्णा चांदगुडे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
मो. ९८२२६३०३७८

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments