फलटण : भारतीय बौद्ध महासभेच्या BSI मिशन २५ अंतर्गत BBM Family च्या वतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणारे डॉ. प्रणित उज्वला किरण घोरपडे यांचा त्यांच्या राहत्या घरी जाऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
डॉ. प्रणित घोरपडे यांनी रशियातील वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी संपादन केली आहे. परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली Foreign Medical Graduate Examination (FMGE) ही पात्रता परीक्षा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) यांच्यामार्फत घेतली जाते. ही परीक्षा उत्कृष्ट गुणांसह उत्तीर्ण केल्याबद्दल BBM Family च्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा समाजप्रबोधनकार आयु. महावीर भालेराव सर, माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप सर, माजी खजिनदार आयु. विठ्ठल निकाळजे सर, माजी संस्कार उपाध्यक्ष आयु. बजरंग गायकवाड सर, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे सर, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमिनाथ घोरपडे तसेच घोरपडे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
यावेळी शुभेच्छा देताना माजी संस्कार उपाध्यक्ष आयु. बजरंग गायकवाड यांनी डॉ. प्रणित आणि त्यांच्या आई-वडिलांनी घेतलेल्या कठोर परिश्रमांचे, जिद्दीचे आणि चिकाटीचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस तथा उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि वक्ते आयु. बाबासाहेब जगताप सर यांनी डॉ. प्रणित यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाचा आणि त्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा गौरव केला. या यशामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचेही मोठे योगदान असल्याचे सांगत संपूर्ण घोरपडे परिवाराचे अभिनंदन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून अशाच प्रकारे प्रगती साधावी आणि स्वतःच्या कुटुंबाच्या विकासासोबतच समाजाच्या प्रगतीसाठीही आपले योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रणित उज्वला किरण घोरपडे यांनी BBM Family च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. आपल्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासातील अनुभव आणि त्यादरम्यान आलेल्या अडचणी कथन करताना, आज मिळालेले यश हे आपल्या आई-वडिलांनी घेतलेल्या अपार कष्टांचे, त्यागाचे आणि मेहनतीचे फलित असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
डॉ. प्रणित यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले हे यश निश्चितच तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षण, जिद्द, चिकाटी आणि कुटुंबीयांच्या पाठबळाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. त्यांच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी सर्व उपस्थितांनी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
