नागदिवाळी, बौद्ध संस्कार आणि २२ प्रतिज्ञांच्या अनुषंगाने सोमिनाथ घोरपडे यांचे समता नगर येथे मार्गदर्शन
समता नगर (विडणी) : भारतीय बौद्ध महासभेच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या बुद्ध-धम्माच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने मौजे समता नगर, विडणी येथे दर रविवारी ‘चला बुध्दविहाराकडे’ या उपक्रमांतर्गत बुद्धवंदना व धम्मदेसनेचे आयोजन करण्यात येते. भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या माजी कार्यकारिणीच्या वतीने आणि पंचशील तरुण मित्र मंडळाच्या सौजन्याने हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत आहे.
या रविवारच्या धम्मदेसनेमध्ये भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमिनाथ घोरपडे यांनी ‘दीपदान उत्सव, नागवंशांची नागदिवाळी आणि बहुजनांच्या सांस्कृतिक इतिहासाचे वास्तव’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना सोमिनाथ घोरपडे यांनी दीपदान उत्सवाचा बौद्ध धम्मातील प्रथा-परंपरांशी नेमका संबंध काय, याविषयी चिकित्सक भूमिका मांडली. दीपदान आणि दिवाळी यांची सरमिसळ न करता बौद्ध धम्मातील प्रज्ञा, करुणा आणि मैत्रीच्या मूल्यांच्या प्रकाशात या परंपरांकडे पाहण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. बाह्य स्वरूपातील दिव्यांपेक्षा मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून प्रज्ञेचा प्रकाश निर्माण करणे, हाच बुद्धांच्या विचारांचा खरा आशय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच नागवंशीय समाजाच्या सांस्कृतिक परंपरेतील नागदिवाळी, तिचे ऐतिहासिक संदर्भ आणि बहुजन समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेचा प्रश्न यावर त्यांनी विवेचन केले. दानशूर राजा बळीचे राज्य, त्याच्याशी जोडल्या गेलेल्या लोकपरंपरा आणि दिवाळीच्या प्रचलित सांस्कृतिक कथनातून निर्माण झालेले सामाजिक संदर्भ यांची चर्चा करताना इतिहासाकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन त्यांनी केले. मनुवादी व धर्मांध विचारसरणीने बहुजन समाजाच्या मूळ सांस्कृतिक परंपरांवर कशा प्रकारे प्रभाव निर्माण केला, याविषयीही त्यांनी आपले विचार मांडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारताना दिलेल्या २२ प्रतिज्ञांचा संदर्भ देत, बौद्ध उपासकांनी आपल्या आचार-विचारांतून या प्रतिज्ञांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अविवेकी परंपरांपासून दूर राहून बुद्धांच्या विवेकनिष्ठ, समतावादी आणि मानवतावादी विचारांनुसार सण-उत्सव साजरे करण्याची सूचना त्यांनी केली. नागदिवाळीसारख्या सांस्कृतिक परंपरांचे स्वरूप समजून घेताना बुद्धांच्या धम्मसंस्कारांशी सुसंगत आनंदोत्सव साजरा करण्यावर त्यांनी भर दिला.
या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा समाजप्रबोधनकार बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव सर, माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप सर, माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पंचशील तरुण मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, बौद्ध उपासक-उपासिका तसेच बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुद्धवंदना, धम्मदेसना आणि वैचारिक प्रबोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये बुद्ध-धम्माचे संस्कार रुजविण्याचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांचा जागर करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.
