महिला व पुरुष मिळून १० जणांनी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, तर १२ जणांनी बौद्धाचार्य परीक्षा दिली
फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व यांच्या अंतर्गत रविवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CET) व बौद्धाचार्य परीक्षा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. फलटण येथील बुद्ध विहार कोळकीमधील शाहू-फुले-आंबेडकर सभागृहात या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
या परीक्षेमध्ये सातारा जिल्हा पूर्वमधील एकूण १० परीक्षार्थींनी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा दिली. यामध्ये ५ महिला व ५ पुरुषांचा समावेश होता. तसेच १२ व्यक्तींनी बौद्धाचार्य परीक्षा दिली. अशा प्रकारे एकूण २२ परीक्षार्थींनी या दोन्ही परीक्षांमध्ये सहभाग नोंदविला.
सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत परीक्षेचे कामकाज चालले. परीक्षेसाठी मुख्य परीक्षक म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका आयु. सुषमा कसबे आणि केंद्रीय शिक्षक आयु. ज्ञानोबा कांबळे यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
परीक्षेच्या व्यवस्थापनाची मुख्य जबाबदारी सातारा जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष आयु. नानासो मोहिते व महिला जिल्हाध्यक्षा आयु. सुजाता गायकवाड यांनी सांभाळली. सहव्यवस्थापक म्हणून जिल्हा पूर्वचे सरचिटणीस आयु. सुनील कदम यांनी काम पाहिले.
या परीक्षेच्या आयोजनासाठी उपाध्यक्ष संस्कार सातारा जिल्हा पूर्व आयु. अविनाश बारसिंग, संस्कार सचिव आयु. अनिल कांबळे आणि संस्कार सचिव आयु. सोमिनाथ घोरपडे, संघटक अर्जुन ननावरे यांनी विशेष पुढाकार घेतला.
भारतीय बौद्ध महासभेच्या धम्मप्रसाराच्या कार्यात प्रशिक्षित केंद्रीय शिक्षक, शिक्षिका आणि बौद्धाचार्य यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. धम्माचे तात्त्विक ज्ञान, बुद्धविचारांची शास्त्रीय मांडणी, त्रिशरण-पंचशीलाचे आचरण आणि समाजामध्ये प्रबोधनाचे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी अशा परीक्षा व प्रशिक्षण प्रक्रिया महत्त्वपूर्ण ठरतात. या माध्यमातून धम्मकार्याची जबाबदारी सक्षमपणे पेलणारे प्रशिक्षित कार्यकर्ते घडण्यास मदत होते.
सातारा जिल्हा पूर्वमधील २२ परीक्षार्थींनी सहभाग नोंदविल्याने जिल्ह्यातील धम्मप्रसार, संघटनात्मक बांधणी आणि प्रशिक्षित कार्यकर्ते निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
