डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण व समाजविषयक अमूल्य विचार
फलतण : मंगळवार पेठ, फलटण येथे मूकनायक तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शिक्षण व समाजविषयक विचारांचे संकलन करण्यात आले. या माध्यमातून समाजाला प्रेरणा देणारे अनेक मौल्यवान संदेश समोर आले. डॉ. आंबेडकरांनी शिक्षणाला अत्यंत पवित्र आणि परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. “शीलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे” असे सांगत त्यांनी केवळ पदवी नव्हे तर चारित्र्य, सौजन्य आणि नैतिकता यांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत नागरिक बनतो, आणि समाजाच्या उन्नतीसाठी ते अत्यावश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रज्ञा, शील, करुणा, विद्या आणि मैत्री या पंचतत्त्वांवर आपले व्यक्तिमत्व घडवण्याचा संदेश दिला. तसेच मुला-मुलींना शिक्षण देणे, अंधश्रद्धा आणि परंपरागत बंधनांपासून मुक्त करणे हे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समाजासाठी दिलेल्या संदेशांमध्ये त्यांनी स्वाभिमानाला भाकरीपेक्षा अधिक महत्त्व देण्याचे आवाहन केले. जातीभेद, वर्गभेद आणि विभागीयतेपासून दूर राहून एकी राखण्यावर त्यांनी भर दिला. “हक्क मागून मिळत नाहीत, त्यासाठी संघर्ष करावा लागतो” या विचारातून त्यांनी समाजाला जागृत राहण्याचा संदेश दिला. यावेळी स्वच्छता, नैतिकता आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर चालण्याचे आवाहन करण्यात आले. आपल्या समाजाचे ऋण फेडणे, एकजूट राखणे आणि पुढील पिढीला शिक्षित करणे हीच खरी त्यांना आदरांजली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. ✍️ संकलन: बापू ढावरे (मूकनायक, मंगळवार पेठ, फलटण)
मौजे राजाळे येथे भीम गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
फलटण : मौजे राजाळे येथे भीम गीतांचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून परिसरात प्रबोधनाचा उत्साहपूर्ण माहोल निर्माण झाला.
यावेळी माजी सनदी अधिकारी श्री. विश्वासराव भोसले यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात त्यांनी महामानवांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत समाज परिवर्तनासाठी त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. तसेच राजाळे येथील जयंती महोत्सव समितीतील महिला पदाधिकाऱ्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास माजी सनदी अधिकारी श्री. विश्वासराव भोसले, राजाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. शरद निंबाळकर, माजी सरपंच सौ. सविता अर्जुन शेंडगे, ग्रामपंचायत सदस्य श्री. दिलीप भालेराव, श्री. अर्जुन शेंडगे सर, तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व) चे सोमीनाथ घोरपडे सर, फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप सर, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे सर, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष बजरंग गायकवाड सर, संघटक आनंद जगताप सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव महिला समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळ प्रबोधनात्मक बौद्ध धम्म गीतांच्या माध्यमातून ज्वलंत व जिवंत ठेवणाऱ्या “जलसा परिवर्तनाचा” या उपक्रमांतर्गत सम्राट समाज प्रबोधन गायन पार्टी यांनी प्रभावी सादरीकरण केले. या गायन पार्टीचे प्रबोधनकार वैभव गायकवाड व अनिकेत जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतांद्वारे गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, तसेच माता रमाई यांच्या विचारांचा जागर घडवला. त्यांच्या सादरीकरणातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देत समाजप्रबोधनाची प्रभावी चळवळ उभी करण्यात आली.
या कार्यक्रमामुळे भीम जयंती केवळ उत्सव न राहता विचारांची आणि प्रबोधनाची जाणीव जागवणारा उपक्रम ठरली.
माळीनगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त महिलांसाठी “स्टार मिनिस्टर” स्पर्धा उत्साहात संपन्न
माळीनगर : माळीनगर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खास महिलांसाठी “स्टार मिनिस्टर” या खेळाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून स्पर्धेला रंगत आणली. कार्यक्रमाचे सादरकर्ते अभिनेते प्रकाश हातकर यांनी आपल्या खास शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेत विविध खेळ आणि मनोरंजनपर उपक्रम राबविण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती. विजेत्यांसाठी एक सुंदर पेठणीसह एकूण ११ बक्षिसे ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे ही सर्व बक्षिसे तांबवे गावचे बाळासाहेब भोसले यांनी आपल्या पत्नी कालकथित. मंगलाताई (अक्कासाहेब ) बाळासाहेब भोसले यांच्या स्मरणार्थ दिली होती. त्यांच्या या उपक्रमामुळे कार्यक्रमाला सामाजिक व भावनिक स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या महिलांना सन्मानचिन्हे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
नातेपुते येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रम संपन्न
नातेपुते :-नातेपुते येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती व क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त प्रा. सुकुमार कांबळे यांच्या व्याख्यानाचा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रा. सुकुमार कांबळे यांनी समाजजागृती, शिक्षणाचे महत्त्व व महापुरुषांच्या विचारांचे आचरण यावर प्रभावी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद अमर (शेठ) सोरटे यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या विचारांचे आजच्या समाजातील महत्त्व अधोरेखित करत तरुणांनी त्यांच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी नातेपुते येथील अनेक प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभली. तसेच फलटण नगर परिषदेचे नगरसेवक विकास काकडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. त्यांच्या परिश्रमामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने पार पडला. उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त फलटणमध्ये अभिवादन; मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती
फलटण :दि. ११ एप्रिल २०२६ रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी फलटण येथील महात्मा फुले चौकात भेट देऊन अभिवादन केले. यावेळी मंत्री गोरे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान सामाजिक कार्याचे स्मरण केले. समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करत, त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. अभिवादनप्रसंगी फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील तसेच फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला शहरातील अनेक नगरसेवक, नगरसेविका तसेच फलटण शहर व तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार आणि त्यांच्या कार्यातून समाजाला दिशा देण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी; रामराजे नाईक निंबाळकर यांचा समतेचा संदेश
फलटण :- ११ एप्रिल २०२६ रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी फुले यांना अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त केली आणि समाजाला समता व शिक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
आपल्या संदेशात रामराजे साहेबांनी फुले यांच्या विचारांचा संदर्भ देत समाजात शिक्षण, समानता आणि बंधुता यांची गरज अधोरेखित केली. “फुले यांच्या आदर्शांनुसार आपण सर्वांनी शिक्षणाचा प्रसार करून समाजातील विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विचारप्रधान संदेशामुळे कार्यक्रमाला एक सकारात्मक आणि दिशादर्शक वळण मिळाले. कार्यक्रमावेळी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. साधेपणाने आणि आदरपूर्वक फुले यांना अभिवादन करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला एक गंभीर आणि प्रेरणादायी वातावरण लाभले. प्रमुख आकर्षण – 3D सेल्फी पॉईंट: कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या 3D सेल्फी पॉईंटने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत फुले यांच्या प्रतिमेसोबत सेल्फी काढत हा क्षण संस्मरणीय केला. विशेषतः तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता.
Satara Crime News : साताऱ्याच्या कराड (Karad) तालुक्यातील शिवडे गावतूनएकअतिशयखळबळजनकबातमीसमोरआलीआहे. गावच्या हद्दीतील कृष्णा नदी पात्रात मागील महिन्यात 18 मार्चला सकाळी एका चिमुकल्याचा मृतदेह संशयास्पद (Satara Crime News) अवस्थेत आढळला होता. याघटनेचातपासकरतअसतानापोलिसांनाकाहीधक्कादायकमाहितीहातीलागलीआहे. सोबतचयामृतदेहाची (Crime News) ओळखपटवण्यातपोलिसांना (Satara Police) यशआलेआहे. तर नराधम बापानेच चिमुकल्याचा काटा काढाल्याचे पोलीसतपासातनिष्पन्नझालेआहे. यासंतापजनकघटनेनेपरिसरातमोठीखळबळउडालीअसूनपोलिसांनीआरोपीबापालाअटककेलीआहे. सध्यापोलीसपुढीलकारवाईकरतआहे. मात्र जवळपास 20 दिवसांनी या चिमुकल्याच्या मृत्यूचे गुढ अखेर उकलले असूनभयावहसत्यसमोरआलंआहे.
Karad Crime News : कोणी नसल्याची संधी साधत थेट कृष्णा नदीत फेकून दिले
मिळालेल्यामाहितीनुसार, घटनेतील मृतदेह कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील नागठाणे गावातील सिद्धार्थ आरेकरी या चिमुकल्याचा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सिद्धार्थचा बाप मल्लिकार्जुन आरेकरी याला त्याचे काही मित्र सिद्धार्थ हा तुझा मुलगा नाही, असे म्हणत चिडवत असत. सिद्धार्थ तुझ्यासारखा दिसत नाही, असे म्हणून मित्र चिडवत असल्याने मल्लिकार्जुन हा आपली पत्नी भाग्यश्री यांच्यावर संशय घेत होता. तसेच तो मागील एक ते दीड वर्षापासून पत्नीशी सातत्याने भांडत होता. मागील महिन्यात 16 मार्चला त्याने सिद्धार्थला शाळेत ॲडमिशन घेण्याचा बहाणा करत घरातून विजापूरहून साताऱ्याच्या उंब्रजमध्ये आणले आणि तेथून तो सिद्धार्थला घेऊन शिवडे गावच्या हद्दीत कृष्णा नदीकाठी आला होता. कोणी नसल्याची संधी साधत त्याने सिद्धार्थला थेट नदीत फेकून दिले, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. विजापूर पोलिसांनी नराधम मल्लिकार्जुन आरेकरी याला ताब्यात घेतले आहे.
सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा पडला आहे. रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटले आहे. मिरज लोहमार्ग पोलीसांकडून या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. कराड तालुक्यातील शेणोली स्टेशन परिसरातील घटनेने खळबळ उडाली आहे. कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर कराड तालुक्यातील शेणोली स्टेशनजवळ दरोडा पडला आहे. सातारा व सांगली जिल्हा हद्दीपासून काही अंतरावर मध्यरात्री घटना घडली आहे. सिग्नलशी संशयितांनी छेडछाड करत हा सिग्नल बंद पडला होता. सिग्नल बंद असल्याने रेल्वे थांबल्याचे पाहून संशयितांनी प्रवाशांचे सोने व मोबाईल लंपास केला आहे. घटनेनंतर माहिती समजताच मिरज लोहमार्ग रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
फलटणमध्ये महात्मा फुले जयंतीनिमित्त नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था
फलटण (प्रतिनिधी) — क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथील महात्मा फुले चौकात अभिवादनासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समिती आणि साहस क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमामुळे अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंड पाणी व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देत आयोजकांनी सामाजिक बांधिलकी जपली. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन अशा उपक्रमांतून समाजसेवेचा आदर्श घालावा, असे मत अनेकांनी व्यक्त केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे पदाधिकारी व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
फलटणमध्ये महात्मा फुले जयंतीनिमित्त 3D सेल्फी पॉईंटचे आकर्षण; सामाजिक जागृतीचा अभिनव उपक्रम
फलटण : फलटण येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महात्मा फुले यांना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर समाजात अधिक प्रभावीपणे व्हावा, यासाठी पुढाकार घेतला.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते खास उभारण्यात आलेले 3D सेल्फी पॉईंट. या सेल्फी पॉईंटमध्ये महात्मा फुले यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे वास्तवदर्शी चित्रण करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना केवळ फोटो काढण्याचा आनंदच नाही, तर त्यांच्या कार्याची आणि संघर्षाची झलक अनुभवण्याची संधी मिळाली. कार्यक्रमस्थळी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे वातावरण अधिक प्रसन्न झाले. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदर व्यक्त केला. विशेषतः तरुणांनी 3D सेल्फी पॉईंटमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवत सामाजिक संदेश आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. आयोजकांच्या मते, अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे नव्या पिढीला समाजसुधारकांच्या कार्याची ओळख होण्यास मदत होते. महात्मा फुले यांच्या शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकूणच, पारंपरिक अभिवादनासोबत आधुनिक माध्यमांचा वापर करून समाजप्रबोधन करण्याचा हा प्रयत्न नागरिकांच्या पसंतीस उतरला आहे.
महात्मा ज्योतीराव फुले : बहुजनांच्या मुक्तीचा २०० वर्षांचा प्रवास
महात्मा ज्योतीराव फुले : बहुजनांच्या मुक्तीचा २०० वर्षांचा प्रवास
भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्थान अत्यंत अग्रगण्य आहे. ११ एप्रिल १८२७ रोजी जन्मलेल्या या महान विचारवंताच्या कार्याला ११ एप्रिल २०२७ रोजी २०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७ हा कालावधी त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरा करणे ही समाजासाठी एक मोठी प्रेरणादायी संधी आहे.
महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते एक क्रांतिकारक विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि शेतकरीहिताचे पुरस्कर्ते होते. त्यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, जातिभेद आणि अन्याय यांच्या विरोधात निर्भीडपणे लढा दिला. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू मानवतेचा आणि समतेचा पुरस्कार हा होता. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी अभूतपूर्व कार्य केले. त्यांनी १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची मोठी साथ लाभली. सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घालून महिलांना सशक्त बनवण्याचा मार्ग मोकळा केला.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८८२ मध्ये हंटर कमिशनसमोर (शिक्षण आयोग) साक्ष देऊन प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे, अशी आग्रही मागणी केली. त्यांनी उच्चवर्गीयांचे शिक्षण न झिरपता, बहुजन, स्त्रिया व शोषित वर्गाच्या शिक्षणावर भर देण्याचे, तसेच शिक्षणाचे मराठीकरण करण्याची ऐतिहासिक शिफारस केली. फुलेंनी उच्च शिक्षणापेक्षा प्राथमिक शिक्षणासाठी सरकारी निधी खर्च करावा, असे स्पष्ट मत मांडले. त्यांनी ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी शिक्षण सक्तीचे व मोफत असावे, अशी शिफारस केली. ग्रामीण भागातील शेतकरी आणि मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत, असे त्यांनी सुचवले. स्त्री शिक्षणावर विशेष भर देत, महिला शिक्षिकांची नियुक्ती करण्याची मागणी केली. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून (मराठी) असावे, तसेच शिक्षकांसाठी ग्रामीण भागात योग्य प्रशिक्षण व पगार असावा, अशी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे मागणी केली.
महात्मा जोतिराव फुले यांनी स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य सुरू केल्यावर सनातनी लोकांनी त्यांना मारण्यासाठी धोंडीराम नामदेव कुंभार आणि रामोशी जातीचे रोढे हे दोन मारेकरी पाठवले होते. मात्र, फुलेंच्या निर्भय आणि प्रेमळ स्वभावामुळे या मारेकऱ्यांचे हृदयपरिवर्तन झाले. पुढे हेच मारेकरी फुलेंचे अनुयायी बनून त्यांच्या सामाजिक कार्यात मदत करू लागले.
महात्मा जोतिबा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. समाजातील शोषित, दलित, बहुजन आणि महिलांना अन्यायातून मुक्त करणे, जातीय भेदभावाचे निर्मूलन करणे आणि शिक्षण-समानतेचा प्रसार करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. या समाजाचे पहिले अध्यक्ष व खजिनदार महात्मा फुले स्वतः होते.
महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या समस्या अधोरेखित करत त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. त्यांच्या “शेतकऱ्याचा आसूड” या ग्रंथातून त्यांनी शेतकऱ्यांची दुर्दशा आणि सत्ताधाऱ्यांची बेफिकिरी यावर कठोर टीका केली. तसेच त्यांनी धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणाला विरोध करून सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली, ज्याचा उद्देश समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करणे हा होता.
जातिव्यवस्था आणि पुरोहितशाहीविरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली. त्यांनी माणसाच्या जन्मावर नव्हे, तर त्याच्या कर्तृत्वावर त्याचे मूल्य ठरावे, हा विचार मांडला. त्यांच्या कार्यामुळे समाजात परिवर्तनाची नवी लाट निर्माण झाली.
महात्मा जोतीराव फुले हे एक द्रष्टे आणि यशस्वी उद्योजकही होते. त्यांनी कंत्राटदार म्हणून खडकवासला धरण, कात्रजचा तलाव आणि पुण्याच्या अनेक ऐतिहासिक इमारतींच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी ‘पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी’ (Pune Commercial & Contracting Company) च्या माध्यमातून व्यवसाय केला. व्यवसायातून मिळवलेला नफा त्यांनी स्वतःच्या चैनीसाठी न वापरता बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आणि समाजकार्यासाठी खर्च केला.
१८८९ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील नाभिक समाजाला संघटित करून विधवांच्या केशवपनाविरुद्ध एक ऐतिहासिक आणि यशस्वी ‘नाभिक संप’ घडवून आणला होता. या सामाजिक आंदोलनाद्वारे ब्राह्मण विधवांचे केशवपन थांबवून त्यांना सन्मान मिळवून देणे हा मुख्य उद्देश होता. विधवा महिलांचे केस कापून त्यांना विद्रूप करण्याच्या अनिष्ट प्रथेला विरोध करणे हा या संपाचा हेतू होता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी नाभिक बांधवांचे प्रबोधन करून या अन्यायी प्रथेविरुद्ध एकत्र आणले. हा संप केवळ एक आंदोलन नव्हता, तर सामाजिक समता आणि स्त्रीसन्मान प्रस्थापित करण्यासाठी उचललेले एक मोठे पाऊल होते. अमेरिकेतील स्त्रीवादी चळवळींकडून त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. त्यांनी तार पाठवून जोतिबांचे अभिनंदन केले.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक विचारांवर आधारित ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा आसूड’ – जातीव्यवस्थेवर आणि गुलामगिरीवर कडक प्रहार करणारे ग्रंथ, जे त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केले. ‘सार्वजनिक सत्यधर्म’, ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘इशारा’ आणि ‘सत्सार’ यांसारखी क्रांतीकारक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी ‘अखंड’, ‘छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा’ (१८६९), ‘मराठी ग्रंथागार सभेस पत्र’ (१८८५), ‘सत्यशोधक समाजाचा पूजेचा विधी’ या लेखनाच्या माध्यमातून स्त्री शिक्षण, सामाजिक समानता व शूद्रातिशूद्रांच्या हक्कांसाठी लढा उभारला. त्यांच्या याच विचार व कार्याचा आदर्श घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले.
आज त्यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या विचारांचे स्मरण करून ते आचरणात आणणे गरजेचे आहे. शिक्षण, समानता, स्त्रीसक्षमीकरण आणि सामाजिक न्याय या मूल्यांची जोपासना करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. महात्मा फुले यांचे जीवन आपल्याला शिकवते की समाज बदलायचा असेल तर विचार बदलावे लागतात आणि त्यासाठी धैर्य, चिकाटी व निःस्वार्थ भाव आवश्यक असतो. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपण एक समताधिष्ठित आणि प्रगत समाज घडवू शकतो.
आयु. सोमीनाथ पोपट घोरपडे, सामाजिक कार्यकर्ता संस्कार सचिव, भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) मोबाईल नं. ९२८४६५८६९०