Friday, June 26, 2026
Home Blog Page 22

फलटणच्या वैशालीताई चोरमले यांना जिल्हास्तरीय अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान

0
फलटणच्या वैशालीताई चोरमले यांना जिल्हास्तरीय अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान


फलटण : महात्मा शिक्षण संस्थेच्या सचिव तथा फलटण नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ. वैशालीताई कृष्णाथ (दादासाहेब) चोरमले यांना सन २०२०-२१ चा “पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त सातारा येथील शाहू स्टेडियमवर आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक पिंगळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील तसेच जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
ठाकूरकी (ता. फलटण) येथील महात्मा शिक्षण संस्थेच्या मूकबधीर विद्यालयाच्या माध्यमातून वैशालीताई चोरमले यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती.
मूकबधीर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच लघुउद्योग, क्रीडा, संगीत व कला क्षेत्राचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. स्वतःच्या निधीतून विद्यालयासाठी सुसज्ज इमारत, क्रीडांगण, वसतीगृह, स्कूल बस तसेच आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना यशस्वी बनविण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
गेल्या अनेक वर्षांपासून चोरमले दाम्पत्य मूकबधीर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून, शासकीय अनुदानाशिवाय वसतीगृह चालवणे, शिक्षकांचे प्रशिक्षण याकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. नगरसेविका म्हणूनही त्यांनी फलटण शहरातील विशेषतः महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी ठोस भूमिका घेतली.
या पुरस्काराबद्दल पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

फलटण–पंढरपूर पालखी मार्गावर भीषण अपघात; गोविंद बोडरे यांचे धाडसी बचावकार्य

0
फलटण–पंढरपूर पालखी मार्गावर भीषण अपघात; गोविंद बोडरे यांचे धाडसी बचावकार्य

फलटण ( साहस Times) : फलटण–पंढरपूर पालखी मार्गावरील रावरामोशी पुलाजवळ आज एका भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने जाणारी इनोव्हा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट निरा उजव्या कॅनॉलमध्ये कोसळली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती. मात्र अनेक जण फक्त बघ्याची भूमिका घेत होते.
याच दरम्यान गिरवी येथील व सध्या मुंजवडी येथे वास्तव्यास असलेले गोविंद दिलीप बोडरे हे आपल्या गावी जात असताना त्यांनी हा अपघात पाहिला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट पाण्यात उडी घेतली.
कॅनॉलमध्ये बुडालेल्या इनोव्हा गाडीत अडकलेल्या पती–पत्नीला वाचवण्यासाठी बोडरे यांनी सर्वप्रथम गाडीची काच फोडून पतीला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर पत्नीला बाहेर काढताना ती घाबरून बोडरे यांना घट्ट पकडत होती. मात्र मोठ्या प्रसंगावधानाने त्यांनी त्या महिलेला आपल्या पाठीवर घेऊन जोरदार प्रवाहातून तिला सुरक्षित बाहेर आणले.
अपघातातून बाहेर आल्यानंतर त्या महिलेला धक्का बसल्याने ती रडू लागली. तिने सांगितले की, “आज आम्ही आमच्या मुलांनाही सोबत घेणार होतो, पण ते घरीच राहिले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.”
विशेष म्हणजे, इतके मोठे आणि धाडसी बचावकार्य करूनही गोविंद बोडरे यांनी कोणताही गाजावाजा न करता शांतपणे तेथून निघून जाणे पसंत केले. त्यांच्या या निस्वार्थ व धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या धाडसाबद्दल तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समिती, साहस क्रिडा मंडळ तसेच फलटण नगर परिषदेचे नगरसेवक विकास वसंतराव काकडे (सर) आणि साहस टाईम्स यांच्या वतीने गोविंद बोडरे यांचा विशेष सन्मान व अभिनंदन करण्यात आले.

कॅनॉलमध्ये उडी घेऊन दाम्पत्याला वाचवणारे गोविंद बोडरे; जीवाची पर्वा न करता दाखवले अद्वितीय धाडस

0
कॅनॉलमध्ये उडी घेऊन दाम्पत्याला वाचवणारे गोविंद बोडरे; जीवाची पर्वा न करता दाखवले अद्वितीय धाडस

फलटण (साहस टाईम्स): सातारा जिल्ह्यातील फलटण येथील फलटण–पंढरपूर पालखी मार्गावर रावरामोशी पुलाजवळ एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणारी इनोव्हा गाडी नियंत्रण सुटून निरा उजव्या कॅनॉलमध्ये कोसळली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली, मात्र अनेकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.
याच वेळी गिरवी येथील व सध्या मुंजवडी येथे वास्तव्यास असलेले गोविंद दिलीप बोडरे हे आपल्या गावी जात असताना त्यांनी हा अपघात पाहिला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी कोणताही विलंब न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट कॅनॉलमध्ये उडी घेतली.
पाण्यात बुडणाऱ्या इनोव्हा गाडीत अडकलेल्या पती-पत्नीला वाचवण्यासाठी बोडरे यांनी प्रथम गाडीची काच फोडली. त्यांनी सर्वप्रथम पतीला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर पत्नीला बाहेर काढताना ती भीतीने बोडरे यांना घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत होती. मात्र प्रसंगावधान राखत बोडरे यांनी त्या महिलेला आपल्या पाठीवर घेतले आणि प्रचंड पाण्याच्या प्रवाहातून तिला सुखरूप बाहेर आणले.
बाहेर आल्यानंतर धक्क्यामुळे ती महिला रडू लागली. रडताना तिने सांगितले की, “आज आम्ही आमच्या मुलांनाही सोबत घेणार होतो, पण ते घरीच राहिले. त्यामुळे त्यांच्या प्राण वाचले.”
विशेष म्हणजे, एवढे धाडसी कार्य करूनही गोविंद बोडरे यांनी कोणताही गाजावाजा न करता शांतपणे तेथून निघून गेले. त्यांच्या या निस्वार्थ धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, मुंजवडी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते गोविंद दिलीप बोडरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच फलटण नगर परिषदेचे नगर विकास वसंतराव काकडे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव व स्मारक समिती आणि ग्रामस्थांच्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला.
तथापि, त्यांच्या या शौर्याची अद्याप प्रशासनाने अधिकृत दखल घेतलेली नाही. त्यामुळे शासनाने गोविंद बोडरे यांना सन्मानित करून योग्य तो पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी सर्व स्तरांतून जोर धरत आहे.

तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त फलटणमध्ये खीरदान व खाऊ वाटप

0
तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त फलटणमध्ये खीरदान व खाऊ वाटप

तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त फलटणमध्ये खीरदान व खाऊ वाटप

फलटण, — भगवान तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त फलटण नगरपरिषदेच्या वतीने म्युनिसिपल कामगार वसाहत (महात्मा फुले नगर) येथे उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक सचिन अहिवळे, अशोकराव जाधव, नगरसेविका सुपर्णाताई अहिवळे, नगरसेविका मीनाताई काकडे तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी बुद्धांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत समाजात समता, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कांबळे पाटील यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांकडून खीरदान व जिलेबी वाटप करून जयंती महोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला म्युनिसिपल कामगार वसाहतीतील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरदादा नाईक निंबाळकर, आरोग्य सभापती सचिन अहिवळे व अशोक जाधव यांनी कामगार कॉलनीतील लहान मुलांना खाऊ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिकांनी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे समाजात सौहार्द व मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

फलटणमध्ये बुद्ध जयंती महोत्सव जल्लोषात; मध्यरात्री अभिवादनापासून भव्य मिरवणुकीपर्यंत उत्साहाचा महासागर

0
फलटणमध्ये बुद्ध जयंती महोत्सव जल्लोषात; मध्यरात्री अभिवादनापासून भव्य मिरवणुकीपर्यंत उत्साहाचा महासागर

फलटणमध्ये बुद्ध जयंती महोत्सव जल्लोषात; मध्यरात्री अभिवादनापासून भव्य मिरवणुकीपर्यंत उत्साहाचा महासागर

फलटण : फलटण शहरात समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारी तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती यंदा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समितीच्या सहकार्याने आणि साहस क्रीडा मंडळाच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवात शहर व परिसरातील हजारो बौद्ध उपासक-उपासिका आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

महोत्सवाची सुरुवात ३० एप्रिल रोजी रात्री ११ .३० वाजता सर्व बौद्ध अनुयायांनी एकत्र येत तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून केली. यावेळी नगरसेविका सुपर्णा सनी अहिवळे, नगरसेविका मीना जीवन काकडे, नगरसेवक तथा आरोग्य सभापती सचिन रमेश अहिवळे, नगरसेवक विकास वसंतराव काकडे, प्रा. अजय अहिवळे, दत्ता अहिवळे ( सर ) तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीचे अध्यक्ष हरीष काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी उपस्थितांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आकर्षक बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती तसेच पंचशील ध्वजांनी सुंदर सजावट करण्यात आली होती.

यानंतर सकाळी ९ वाजता क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक येथून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. युवकांच्या मोठ्या सहभागाने निळे झेंडे, घोषणांचा जयघोष आणि एकतेचा संदेश देत रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. यानंतर सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पारंपरिक लेझीम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. लेझीमच्या तालावर सादर झालेल्या आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

या महोत्सवाचे उद्घाटन आयु. तुषार शांताराम मोहिते (सह आयुक्त, मुंबई – भारत सरकार, IRS), आयु. रावसाहेब पोपटराव मोरे (कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण), आयु. रत्नरंजन दिनकर गायकवाड (नगर अभियंता, नगर परिषद, फलटण), आयु. सागर अरविंद कांबळे (शाखा अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण), आयु. विजय पत्रोजी रामटेके (वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण विभाग, फलटण), आयु. सागर चंद्रकांत अहिवळे (Managing Director, Green Solution Group of Industries), आयु. लक्ष्मण सुभाष अहिवळे (सहाय्यक महसूल अधिकारी, तहसील कार्यालय, कोरेगाव), आयु. प्रतीक्षा गौतम काकडे (सहाय्यक कृषी अधिकारी, कडेगाव), आयु. डॉ. धनंजय सुभाष गायकवाड (MS, General Surgery), आयु. डॉ. सुमित दयानंद गायकवाड (MS, General Surgery ISM), आयु. डॉ. आदित्य लक्ष्मण अहिवळे (BDS), आयु. अमृता बाळासाहेब अहिवळे (उद्योग निरीक्षक), आयु. विशाखा चंद्रकांत कांबळे (महाराष्ट्र पोलीस, रत्नागिरी) आणि आयु. प्रतीक्षा सागर अहिवळे (ग्रामपंचायत अधिकारी) यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आयु. वैशाली संदीप कांबळे (सातारा जिल्हा परिषद सदस्य), आयु. सचिन रमेश अहिवळे (नगरसेवक, फलटण), आयु. विकास वसंतराव काकडे (नगरसेवक, फलटण), आयु. सुपर्णा सनी अहिवळे (नगरसेविका, फलटण), आयु. मीना जीवन काकडे (नगरसेविका, फलटण) आणि आयु. अस्मिता भीमराव लोंढे (नगरसेविका, फलटण) आदी मान्यवर उपस्थित होते.

सायंकाळी ७ वाजता पंचशील चौक, मंगळवार पेठ येथून भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. महिलांच्या सहभागाने सुरू झालेली ही मिरवणूक बालक, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागाने पुढे सरकत होती. घोषणांद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले तस तसेच यामध्ये पारंपरिक वाद्या आणि बुद्ध-आंबेडकरांच्या जीवनावर आधारित देखावे सादर करण्यात आले. यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सुंदर असे तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्तीच्या देखावा तयार करण्यात आला होता तसेच मिरवणूकी मध्ये अंजठा लेण्यातील भगवान बौद्ध यांच्या देखावा तसेच अखंड भारत चक्रवती अशोक सम्राट यांचे अखंड मौर्य सम्राज्य  देखावा तसेच महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त च्या देखावा खास आकर्षण म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२५ यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेली तथागत गौतम बुद्ध यांची २५० किलो वजन असलेले तथागत भगवान गौतम बौद्ध यांची मुर्ती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली

मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने मंगळवार पेठ धम्मयान चौक येथे विसर्जित झाली. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुशासनभंग न होता उत्सव यशस्वीरीत्या पार पडला.

या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व राजकीय व सामाजिक गटांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत एकतेचा संदेश दिला. यामुळे फलटण शहरातील सामाजिक सलोखा आणि ऐक्य अधोरेखित झाले.

जगभरातील सुमारे १८० देशांमध्ये साजरी होणारी बुद्ध पौर्णिमा हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. गौतम बुद्ध यांचा जन्म, बोधीप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही घटना याच दिवशी घडल्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समिती व साहस क्रिडा मंडळ आयोजक, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदाची बुद्ध जयंती फलटण शहरात संस्मरणीय ठरली.

फलटणमध्ये बुद्ध जयंती मिरवणुकीत तणाव; पोलीस निरीक्षक व कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक चकमक, व्हिडिओ व्हायरल

0
फलटणमध्ये बुद्ध जयंती मिरवणुकीत तणाव; पोलीस निरीक्षक व कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक चकमक, व्हिडिओ व्हायरल

फलटणमध्ये बुद्ध जयंती मिरवणुकीत तणाव; पोलीस निरीक्षक व कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक चकमक, व्हिडिओ व्हायरल

फलटण : शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे आणि सामाजिक कार्यकर्ते हरिश (आप्पा) काकडे यांच्यात झालेल्या शाब्दिक वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेवर टीका होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुद्ध जयंतीची मिरवणूक शांततेत सुरू असताना पोलीस निरीक्षकांनी हस्तक्षेप करत वाद्ये बंद करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मिरवणूक काही काळ थांबली. “पारंपरिक वाद्यांना वेळ असतानाही पोलीस जाणीवपूर्वक अडथळा आणत आहेत,” असा आरोप करत हरिश काकडे यांनी पोलिसांना जाब विचारला. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाली.
या घटनेनंतर पोलिसांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मिरवणुकीदरम्यान गर्दीतून दुचाकी वाहनांची ये-जा सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तसेच मिरवणुकीच्या अगदी पुढे पोलीस गाड्या चालत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त झाली. शांततेत सुरू असलेल्या मिरवणुकीत अशा प्रकारे पोलिसांची भूमिका का होती, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, बुद्ध जयंती हा शांतता आणि संयमाचा संदेश देणारा पवित्र दिवस मानला जातो. अशा प्रसंगी प्रशासनाने सहकार्य करण्याऐवजी अडथळा निर्माण केल्याचा आरोप बौद्ध अनुयायांकडून करण्यात येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची लाट उसळली आहे.
या प्रकारामुळे काही काळ फलटणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र नागरिकांच्या संयमी भूमिकेमुळे कोणताही अनर्थ टळला. आता या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकारी काय दखल घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फलटणमध्ये बुद्ध जयंती मिरवणुकीत तणाव; पोलीस निरीक्षक व कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक चकमक, व्हिडिओ व्हायरल

शिस्तबद्ध बुद्ध जयंती मिरवणुकीवर अनपेक्षित हस्तक्षेप; नियम आणि संवेदनशीलतेचा प्रश्न ऐरणीवर

0
शिस्तबद्ध बुद्ध जयंती मिरवणुकीवर अनपेक्षित हस्तक्षेप; नियम आणि संवेदनशीलतेचा प्रश्न ऐरणीवर

फलटण (जि. सातारा) — शहरात साजऱ्या करण्यात आलेल्या बुद्ध जयंती उत्सवादरम्यान पोलिस प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे वाद निर्माण झाला असून, कायद्याची अंमलबजावणी आणि सामाजिक संवेदनशीलतेचा समतोल राखण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.8
फलटण येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली. मिरवणूक पूर्णपणे शांततेत, कोणालाही त्रास न देता आणि कायद्याचे पालन करत पार पडत होती. पारंपरिक वाद्यांसह कमी आवाजातील बुद्ध वंदना गीते वाजवत सामाजिक ऐक्य, समता आणि प्रबोधनाचा संदेश देण्यात येत होता.
मात्र, रात्री १० नंतर पोलिसांकडून ध्वनीप्रदूषण नियमांचा हवाला देत वाद्ये आणि गीते बंद करण्याचे आदेश देण्यात आले. या अचानक हस्तक्षेपामुळे आयोजक आणि उपस्थित नागरिकांमध्ये नाराजी पसरली.
या संदर्भात संबंधित पोलिस निरीक्षक (PI) यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, “फलटणमध्ये सर्व गोष्टी नियमांनुसारच चालतील आणि कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य वर्तन सहन केले जाणार नाही.” कायद्याचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, आयोजकांचे म्हणणे आहे की, मिरवणूक पूर्णपणे शांततेत आणि नियमांचे पालन करत सुरू असताना असा अचानक हस्तक्षेप करणे योग्य नाही. “नियम सर्वांसाठी समान असावेत, मात्र त्यांची अंमलबजावणी करताना स्थानिक परंपरा, सामाजिक भावना आणि परिस्थिती यांचाही विचार व्हावा,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
बुद्ध जयंती हा केवळ उत्सव नसून समता, बंधुता आणि विचारांचा जागर आहे. त्यामुळे अशा प्रसंगी प्रशासनाने अधिक संवेदनशीलता आणि समजूतदारपणा दाखवणे अपेक्षित असल्याचे नागरिकांनी नमूद केले.
या घटनेनंतर भविष्यात अशा प्रसंगी प्रशासन आणि आयोजक यांच्यात अधिक समन्वय आणि संवाद होण्याची गरज अधोरेखित झाली आहे. सामाजिक सौहार्द अबाधित ठेवत कायद्याचा सन्मान राखण्यासाठी संतुलित भूमिका आवश्यक असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.

फलटणमध्ये बुद्ध पौर्णिमा मिरवणुकीत पोलिसांचा हस्तक्षेप; जातीय भेदभावाचे गंभीर आरोप

0
फलटणमध्ये बुद्ध पौर्णिमा मिरवणुकीत पोलिसांचा हस्तक्षेप; जातीय भेदभावाचे गंभीर आरोप

फलटणमध्ये बुद्ध पौर्णिमा मिरवणुकीत पोलिसांचा हस्तक्षेप; जातीय भेदभावाचे गंभीर आरोप


फलटण (जि. सातारा) — दिनांक 1 मे 2026 रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मिरवणुकीत पोलिसांकडून झालेल्या हस्तक्षेपामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समिती व भीम अनुयायांनी या घटनेबाबत गंभीर आक्षेप नोंदवत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केलीत आहे.
                                                           मिळालेल्या माहितीनुसार, मिरवणूक पूर्णपणे शांततेत व कायद्याच्या चौकटीत सुरू असताना शंकर मार्केट परिसरात पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी “वेळ संपली” या कारणावरून डीजेवरील “बुद्धम् शरणम् गच्छामि” ही वंदना जबरदस्तीने बंद करण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे, तर पारंपरिक वाद्य वाजवण्यासही बंदी घालण्यात आली, जरी मिरवणूक संपण्यासाठी अवघे काही मिनिटे शिल्लक होती.
यानंतर पोलिसांनी कोणताही संयम न ठेवता धरपकड सुरू केली आणि मिरवणूक तात्काळ थांबवून नागरिकांना घरी जाण्यास भाग पाडले. उपस्थित पदाधिकाऱ्यांशी अपमानास्पद, धमकीखोर व अर्वाच्य भाषेत संवाद साधण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच अनुसूचित जातींबाबत अत्यंत आक्षेपार्ह व जातीय वक्तव्ये करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
घटनेच्या वेळी मोठ्या संख्येने महिला, वृद्ध व लहान मुले उपस्थित असताना पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा आरोप करण्यात आला आहे. उलट, त्यांच्या कृतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक चिघळल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
समितीने असा आरोप केला आहे की, इतर धार्मिक कार्यक्रमांना सवलत देण्यात येते; मात्र बौद्ध व आंबेडकरी कार्यक्रमांवरच निर्बंध लादले जातात, ज्यामुळे दुजाभावाची भावना वाढीस लागते.
या घटनेविरोधात समितीने अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 तसेच भारतीय दंड संहिता अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तसेच, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांवर तातडीने फौजदारी कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
समाधानकारक कारवाई न झाल्यास प्रकरण राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राज्यस्तरीय तक्रार प्राधिकरणांकडे नेण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सोनगावात फुले-आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा उत्साहात; विचारप्रवर्तक भाषण, भीम गीतांची सुरेल मैफल आणि सेवापूर्ती सत्काराने कार्यक्रमाला उंची”

0
सोनगावात फुले-आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा उत्साहात; विचारप्रवर्तक भाषण, भीम गीतांची सुरेल मैफल आणि सेवापूर्ती सत्काराने कार्यक्रमाला उंची”

“सोनगावात फुले-आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा उत्साहात; विचारप्रवर्तक भाषण, भीम गीतांची सुरेल मैफल आणि सेवापूर्ती सत्काराने कार्यक्रमाला उंची”

फलटण : सोनगाव (ता. फलटण) येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य, दिमाखदार व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सामाजिक जागृती, बौद्धिक प्रेरणा आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचा सुरेख संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. प्रास्ताविकातून फुले-आंबेडकरांच्या समतावादी विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करत समाज परिवर्तनासाठी शिक्षणाची भूमिका स्पष्ट करण्यात आली.

यानंतर सुप्रसिद्ध लेखक, कवी व व्याख्याते मा. नितीन सुभाष चंदनशिवे यांनी आपल्या प्रभावी, ओजस्वी आणि विचारप्रवर्तक भाषणातून उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यांनी “शिक्षण, संघटन आणि संघर्ष” या त्रिसूत्रीचा सखोल ऊहापोह करत, फुले-आंबेडकर विचारसरणी हीच सामाजिक समतेची खरी वाट असल्याचे ठामपणे मांडले. सामाजिक विषमता, शिक्षणाचे अपरिहार्य महत्त्व आणि युवकांनी जबाबदारीने नेतृत्व स्वीकारण्याची गरज यावर त्यांनी केलेले विश्लेषण उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेली “प्रज्ञा सूर्यास स्वरांजली” ही सुरेल संगीत मैफल प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली. सुप्रसिद्ध गायक श्री. अनिकेत हुंबरे यांनी आपल्या दमदार, मधुर आणि भावस्पर्शी आवाजातून सादर केलेल्या गीतांनी संपूर्ण वातावरण भारावून टाकले. “नवरदेव B.Sc Agri” या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या हुंबरे यांच्या सादरीकरणात सामाजिक संदेश, भक्तीभाव आणि प्रेरणादायी विचारांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री. विठ्ठल निकाळजे सर यांच्या सेवापूर्ती निमित्त त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. त्यांच्या दीर्घकालीन शैक्षणिक सेवेमुळे घडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा गौरव करत उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना मानवंदना दिली.

कार्यक्रमाचे प्रभावी व ओघवते सूत्रसंचालन प्रा. राजेश निकाळजे यांनी केले. त्यांच्या नेटक्या व आकर्षक शैलीमुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीत व देखण्या पद्धतीने पार पडला.

या कार्यक्रमासाठी सौ. ज्योतीताई गौतम मोरे (सदस्या, पंचायत समिती), सौ. पुष्पा रामचंद्र चोपडे (सदस्या, पंचायत समिती), आयु. महावीर भालेराव, कपिल काकडे, दत्ता भोसले, बाळासाहेब अहिवळे, अमोल लोंढे, धनाजी मोरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावातील अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये पोपटराव बुरुंगले, जयवंत खरात, सौ. रंजना कांबळे (प्रशासक सरपंच, सोनगाव), राजश्री लोंढे, अश्विनी निकाळजे, आशा ढोबळे, दीपक लोंढे, पोलीस पाटील संदीप पिंगळे, दत्तात्रय ननावरे, हनुमंत थोरात, हनुमंत ननवरे, बाळासाहेब ओवाळ, अरुण लांडगे, रामहरी पिंगळे, कांतीलाल चव्हाण, संतोष गोरवे, सुरेश पवार, सुधीर ओवाळ, अविनाश गोरे, अतुल लोंढे, सोमनाथ गायकवाड, लखन पिंगळे, गणेश कांबळे, अमोल सस्ते, मनोज लोंढे, संकेत बुरुंगले, गणेश नामदास, अमर भोसले, रमेश मदने, ज्ञानदेव शेंडे, शिवाजी ढवळे, सचिन शेंडे, संतोष आडके, युवराज लोंढे, बाळकृष्ण रिटे, सुनील रिटे, सुरज गुरवे, यश नामदास आदींचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात येऊन सोहळ्याचा समारोप करण्यात आला. या भव्य उपक्रमातून महापुरुषांचे विचार जनमानसात रुजवण्याचा आणि सामाजिक समता, बंधुता व प्रबोधनाची ज्योत प्रज्वलित ठेवण्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

फलटणमध्ये निवासी अतिक्रमण नियमितीकरणाचा मोठा निर्णय

0
फलटणमध्ये निवासी अतिक्रमण नियमितीकरणाचा मोठा निर्णय

फलटणमध्ये निवासी अतिक्रमण नियमितीकरणाचा मोठा निर्णय
फलटण शहर व तालुक्यात शासकीय जागांवर बांधकाम केलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत 500 ते 1500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या निवासी अतिक्रमणांना शासनाच्या धोरणानुसार नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पंचायत समिती फलटण येथे झालेल्या या बैठकीत सर्व शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. अतिक्रमण नियमित करताना नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे निंबाळकर यांनी अधोरेखित केले.
आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा स्तरावर आढावा समिती स्थापन केली जाणार असून, अतिक्रमण नियमितीकरणासाठी आमदारांची शिफारस आवश्यक असेल. भूमी अभिलेख विभागाला खासगी मोजणीदारांच्या मदतीने तातडीने मोजणी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तालुक्यातील एकही पात्र घर या योजनेपासून वंचित राहू नये, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेर सिंह यांनी शहरातील खुल्या जागांची (ओपन स्पेस) मोजणी करून त्या नगरपालिकेच्या ताब्यात घेण्याचे आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याचे निर्देश दिले. प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांनीही संबंधित विभागांच्या संयुक्त प्रयत्नातून हे काम पूर्ण केले जाईल, असे सांगितले.
यावेळी प्रशासनाला अतिक्रमणाबाबत पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. काही नागरिक अतिक्रमित घरे भाड्याने देऊन स्वतः इतरत्र राहत असल्याचेही निदर्शनास आले असून, अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी महसूल विभागाकडून सर्व आवश्यक सहकार्य दिले जाईल, असे स्पष्ट केले.