Saturday, September 19, 2026
Homeफलटणकॅनॉलमध्ये उडी घेऊन दाम्पत्याला वाचवणारे गोविंद बोडरे; जीवाची पर्वा न करता दाखवले...

कॅनॉलमध्ये उडी घेऊन दाम्पत्याला वाचवणारे गोविंद बोडरे; जीवाची पर्वा न करता दाखवले अद्वितीय धाडस

फलटण (साहस टाईम्स): सातारा जिल्ह्यातील फलटण येथील फलटण–पंढरपूर पालखी मार्गावर रावरामोशी पुलाजवळ एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणारी इनोव्हा गाडी नियंत्रण सुटून निरा उजव्या कॅनॉलमध्ये कोसळली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली, मात्र अनेकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.
याच वेळी गिरवी येथील व सध्या मुंजवडी येथे वास्तव्यास असलेले गोविंद दिलीप बोडरे हे आपल्या गावी जात असताना त्यांनी हा अपघात पाहिला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी कोणताही विलंब न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट कॅनॉलमध्ये उडी घेतली.
पाण्यात बुडणाऱ्या इनोव्हा गाडीत अडकलेल्या पती-पत्नीला वाचवण्यासाठी बोडरे यांनी प्रथम गाडीची काच फोडली. त्यांनी सर्वप्रथम पतीला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर पत्नीला बाहेर काढताना ती भीतीने बोडरे यांना घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत होती. मात्र प्रसंगावधान राखत बोडरे यांनी त्या महिलेला आपल्या पाठीवर घेतले आणि प्रचंड पाण्याच्या प्रवाहातून तिला सुखरूप बाहेर आणले.
बाहेर आल्यानंतर धक्क्यामुळे ती महिला रडू लागली. रडताना तिने सांगितले की, “आज आम्ही आमच्या मुलांनाही सोबत घेणार होतो, पण ते घरीच राहिले. त्यामुळे त्यांच्या प्राण वाचले.”
विशेष म्हणजे, एवढे धाडसी कार्य करूनही गोविंद बोडरे यांनी कोणताही गाजावाजा न करता शांतपणे तेथून निघून गेले. त्यांच्या या निस्वार्थ धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, मुंजवडी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते गोविंद दिलीप बोडरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच फलटण नगर परिषदेचे नगर विकास वसंतराव काकडे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव व स्मारक समिती आणि ग्रामस्थांच्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला.
तथापि, त्यांच्या या शौर्याची अद्याप प्रशासनाने अधिकृत दखल घेतलेली नाही. त्यामुळे शासनाने गोविंद बोडरे यांना सन्मानित करून योग्य तो पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी सर्व स्तरांतून जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments