Mahesh Shinde vs Uday Samant :  “माझं नाव घेण्याएवढं त्यांचं धैर्य नाही”, महेश शिंदे यांचा पक्षविरोधी कारवाई वरुन निशाणा साधणाऱ्या उदय सामंत यांच्यावर पलटवार

0
3


Mahesh Shinde on Uday Samant सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सातारा जिल्ह्यात गट तट पुन्हा एकदा समोर आले आहेत. शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फलटण येथे बोलताना  “काही मतदारसंघांमध्ये ‘माझ्याशिवाय पदाधिकारी होऊच शकत नाही’  ,असे काही मतदारसंघ आजू बाजूला आहेत, असं म्हणत उदय सामंत यांनी आमदार महेश शिंदे यांचं नाव न घेता टीका केली होती. या टीकेला महेश शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “माझं नाव घेण्याएवढं त्यांचं धैर्य नाही”; साताऱ्यात शिवसेनेतच विरोधकांना मदत करणारा गट असल्याचा खळबळजनक दावा महेश शिंदे यांनी केला.

माझं नाव घेण्याएवढं त्यांचं धैर्य नाही : महेश शिंदे

आमदार महेश शिंदे म्हणाले की, “पक्षाविरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, ही प्रत्येक राजकीय पक्षाचीच भूमिका असते. मात्र, फलटण येथील शिवसेना मेळाव्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या विधानाशी माझा काहीही संबंध नाही. त्यांनी माझं नाव घेतलेलं नाही आणि मुळात माझं नाव घेण्याएवढं त्यांचं धैर्य असेल, असं मला वाटत नाही,” अशा अत्यंत कडक आणि थेट शब्दांत कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी उदय सामंत यांच्या विधानाचा समाचार घेतला. एवढ्यावरच न थांबता साताऱ्यामध्ये शिवसेनेचा एक गट विरोधकांना मदत करत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. 

मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

फलटण येथे शिवसेना मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता आमदार महेश शिंदे यांना इशारा दिला होता यामध्ये त्यांनी शिवसेनेचे पदाधिकारी तयार करण्यात जर कोणी अडथळा आणत असेल तर मी स्वतः आणि माजी खासदार राहुल शेवाळे तिथे जाऊन ठाण मांडून बसणार आहे. स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा पदासाठी पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला बांधायचा धंदा या पुढील काळात शिवसेनेत चालणार नाही. पक्षाच्या वाढीला आणि अस्मितेची बाधक ठरणारे कोणतेही छुपे संबंध अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले होते.

शिवसेनेतील अंतर्गत संघर्षात वाढ

कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यातील वाद सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी दिसून आला होता. महेश शिंदे समर्थक शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान केलं होतं. महेश शिंदे  यांच्या पत्नी प्रिया शिंदे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील साताऱ्यातील वादाचा नवा अंक उदय सामंत आणि महेश शिंदे यांच्यातील वार पलटवारावरुन दिसून येतो. 
 

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link