फलटण नगरपरिषद व स्वराज्य फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम; नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पुढाकारातून आयोजन
फलटण : फलटण नगरपरिषद आणि स्वराज्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिनगर येथे आज, सोमवार दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य नागपंचमी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पुढाकारातून हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपत नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी दिली.
नागपंचमीचे महत्त्व विशद करताना कु. सिद्धाली शहा म्हणाल्या की, श्रावण महिन्यातील नागपंचमी हा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गातील प्रत्येक घटकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची मनोभावे पूजा केली जाते. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या सापाचे संरक्षण आणि निसर्गाचा समतोल राखण्याचा संदेश या सणातून दिला जातो.
नागपंचमीनिमित्त महिला एकत्र येऊन फेर धरतात, झोके घेतात, पारंपरिक खेळ खेळतात आणि आनंदोत्सव साजरा करतात. याच पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने शनिनगर येथे या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांना श्री नागदेवतेच्या पूजनासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी जातीने लक्ष घातले असून, आवश्यक त्या सुविधा व विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पूजेनंतर महिलांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य ‘लकी ड्रॉ’ तसेच आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाचा नागपंचमी सोहळा महिलांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
या सोहळ्यास महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग राहावा यासाठी माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. फाउंडेशनच्या संचालिका फलटणच्या जुन्या गावठाण परिसरात घरोघरी जाऊन महिलांना सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि युवा नेत्या सौ. मनीषाताई नाईक-निंबाळकर यांच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण देत आहेत.
दरम्यान, आज सायंकाळी ५ वाजता शनिनगर येथे होणाऱ्या या भव्य नागपंचमी सोहळ्यास फलटण शहरासह परिसरातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी केले आहे.
