महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश; ग्रामस्थांकडून जल्लोषात सत्कार
पानवण, ता. माण : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत पानवण, ता. माण येथील आदित्यराज राजाराम तोरणे यांनी उल्लेखनीय यश संपादन करून विक्रीकर अधिकारी पदावर नियुक्ती मिळवली. त्यांच्या या यशामुळे पानवण गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदित्यराज तोरणे यांच्या यशाबद्दल पानवण येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात व उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी आदित्यराज तोरणे यांचा संजय दिनकर खरात, जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना, सातारा तसेच सातारा जिल्हा बॅकवर्ड संघटना समन्वयक यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आदित्यराज यांच्या यशाचे कौतुक करून पुढील प्रशासकीय सेवेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
अत्यंत स्पर्धात्मक असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून विक्रीकर अधिकारीपदापर्यंत मजल मारल्याबद्दल आदित्यराज तोरणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश संपादन करण्याचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
#आदित्यराजतोरणे #विक्रीकरअधिकारी #MPSC #महाराष्ट्रलोकसेवाआयोग #स्पर्धापरीक्षा #पानवण #माण #सातारा #भव्यमिरवणूक #सत्कार #यशोगाथा #अभिनंदन
