Friday, September 11, 2026
Homeफलटणपालखी सोहळ्याच्या तयारीची विभागीय आयुक्तांकडून पाहणी; सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना

पालखी सोहळ्याच्या तयारीची विभागीय आयुक्तांकडून पाहणी; सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना

फलटण  : संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळा सुखकर, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे तसेच पालखी मार्गावरील आणि मुक्कामाच्या ठिकाणांची सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिल्या.
आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी लोणंद ते फलटण दरम्यानच्या पालखी मार्गाची तसेच विविध पालखी तळांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम, प्रांताधिकारी योगेश खरमाटे, प्रियांका आंबेकर, तहसीलदार रविराज जाधव, अभिजीत जाधव, फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर पादुका निरास्नान स्थळ, चांदोबाचे लिंब, तरडगाव पालखी तळ, राव रामोशी पूल, फलटण पालखी मार्ग आणि बरड पालखी तळ येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश देताना त्यांनी लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड या मार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करण्यास सांगितले. पालखी मार्गावरील अतिक्रमणे आणि तात्पुरती बांधकामे हटवून वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पालखी तळांवर स्वच्छता, सपाटीकरण, चिखल टाळण्यासाठी मुरूम टाकणे आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात तात्पुरती व फिरती शौचालये उपलब्ध करून स्वच्छतेसाठी २४ तास पथके तैनात ठेवण्यास सांगण्यात आले.
नगरपालिका आणि जिल्हा परिषदेमार्फत टँकर्सद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा तसेच उपलब्ध पाणी स्रोतांची तपासणी करून पाणी पिण्यायोग्य असल्याची खात्री करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी दिल्या. आरोग्य विभागाने फिरते दवाखाने, रुग्णवाहिका आणि आवश्यक औषधसाठा सज्ज ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महावितरणने पालखी मुक्काम स्थळी अखंड वीजपुरवठा ठेवण्याची दक्षता घ्यावी तसेच गर्दी नियंत्रण आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस विभागाने काटेकोर नियोजन करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
रस्त्याच्या रुंदीकरणावेळी हटविण्यात आलेल्या झाडांचे पालखी मार्गावर पुनर्रोपण करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी दिल्या.
फलटण शहराजवळील राव रामोशी पुलाची पाहणी करताना सदर काम ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात पोलिसांच्या मदतीने कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या सुविधा आणि तयारीची माहिती विभागीय आयुक्तांना दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments